Maharashtra Hotel Industry Crisis: अमेरिका, इस्त्रायल, इराण युध्दाचा सर्वाधिक फटका आता हाॅटेल व्यवसायिकांना बसू लागला आहे. राज्यातील ४० टक्के हाॅटेल बंद झाले असून, आणखी बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कोळश्याची शेगडी, इलेक्ट्रीक इंडक्शन, आणि केरोसिनवर व्यवसाय करणे मुश्किल झाले आहे. खाणे, पिणे, राहणे हाॅटेल होत असल्याने हाॅटेलला घर मानणाऱ्या हजारो कामगारांनी गावाची वाट धरल्याने हाॅटेल मालकांचे धाबे दणाणले आहेत.

राज्यात छोटे मोठे पाच लाख हाॅटेल आहेत. यातील २० हजार हाॅटेल एकटया मुंबईत आहेत. या हाॅटेल व्यवसायावर अवलंबून असलेल्या रोजगाराची संख्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन कोटीच्या घरात आहे. अमेरिका, इस्त्रायल, इराण युध्द सुरु झाल्यानंतर पहिल्या दहा दिवसातच गॅस पुरवठयावर परिणाम झाला. त्याचा पहिला फटका गॅसचा जास्त वापर होणाऱ्या हाॅटेल व्यवसायिकांना बसला. केंद्र सरकारने सात मार्च रोजी काढलेल्या आदेशानुसार घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर रुग्णालय, शाळा, वसतीगृहचा क्रमांक आहे.

लाखो लोकांचे पोट भरणारे हाॅटेल व्यवसायिक या साखळीत शेवटचा क्रमांकवर आहेत. हाॅटेल कामगार हे हाॅटेल मध्ये किंवा हाॅटेल मालकांनी दिलेल्या घरात एकत्र राहतात. त्यांची सर्वस्वी जबाबदारी हाॅटेल मालकांची असते. सरकारने हाॅटेलमध्ये राहणाऱ्या त्या लाखो कामगाराच्या पोटापाण्याचा विचार केलेला नाही. मुंबईतील हाॅटेल मालकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षातील प्रमुख नेते यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन हाॅटेल व्यवसायिकांची कैफियत मांडली. हाॅटेल व्यवसायाचा नाही तर किमान एका परिवाराप्रमाणे राहणाऱ्या हाॅटेल कामगारांचा तरी विचार करा. त्यांच्या स्वयंपाकासाठी ५० टक्के गॅस दया, असा आग्रह ‘आहार’ या हाॅटेल व्यवसायिक संघटनेने केला.

राज्यातील या नेत्यांनी आमच्या हातात काही नाही सांगत केंद्राकडे बोट दाखविले. ‘आहार’ ने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांना मेल केले पण त्याला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. कोविड काळात अन्नसाठा संपल्यानंतर हाॅटेल कामगारांनी गाव गाठले. ते नंतर पाच सहा महिने काही वर्षभर परत आलेच नाहीत. त्याने हाॅटेल व्यवसायाची पूर्ण मांडणी विस्कटून गेली. तिच स्थिती आता पुन्हा निर्माण झाली असल्याची भीती हाॅटेल व्यवसायिकांना लागली आहे. युध्द आणखी काही काळ सुरु राहिल्यास हाॅटेल मध्ये पुरेसे जेवण मिळत नाही म्हणून गावी जाण्याच्या तयारीत कामगार आहेत. अनेक हाॅटेल व्यवसायिकांनी मेनू कार्ड वरील पदार्थ कमी केले आहेत. हाॅटेलच्या वेळामध्ये घट केली आहे. यानंतर हाॅटेलला टाळे लावणे हा एक प्रकार शिल्लक राहिला असून ४० टक्के हाॅटेल आजच्या घडीला बंद पडले आहेत.

राज्यातील हाॅटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. शेगडी, इंडक्शन यावर जास्त काळ हाॅटेल चालवणे शक्य नाही. हाॅटेल व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दोन कोटीचा रोजगार आहे. हजारो कामगार हे हाॅटेलला ‘घर’ मानतात. त्यांचा विचार सरकारने केलेला नाही. त्यांचा पगार, कर, पाणी व वीज बील देणे आम्हाला चुकलेले नाहीत. युध्द लांबल्यास करोना काळाची पुर्नरावृत्ती होईल.- विजय शेट्टी, अध्यक्ष, आहार