पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (2 मे) जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या निकालाकडे डोळे लावून बसलेल्या पालक, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी राज्य मंडळाने बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर केला होता. त्यामुळे यंदा राज्य मंडळाकडून थोडा लवकरच निकाल जाहीर केला जाणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबत अधिकृत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेसाठी १० हजार ६६४ शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थ्यांची संख्या २७ हजारांनी वाढली होती.
यंदाच्या परीक्षेसाठी नोदणी केलेल्या १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख २० हजार २२९ मुले, ७ लाख १२ हजार २४० मुली, तर १८ तृतीयपंथी विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यात कला शाखेचे ३ लाख ८० हजार ६९२, वाणिज्य शाखेचे ३ लाख २० हजार १५२, विज्ञान शाखेचे ७ लाख ९९ हजार ७७३, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे २७ हजार ३७८, तर आयटीआयचे ४ हजार ४९२ विद्यार्थी समाविष्ट होते.
राज्य मंडळाने यंदा परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या होत्या. त्यात परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही लावणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, राज्यातील १७२ परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही नसल्याने या केंद्रावरील कर्मचाऱ्यांची अदलाबद करण्यात आली होती. तसेच २७१ भरारी पथकांसह परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त, बैठी पथके अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, आणि mahahsscboard.in या संकेतस्थळांवर ऑनलाइन पाहता येणार आहे.
गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.८८ टक्के लागला होता. त्यामुळे यंदा निकालात वाढ होणार की घट होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
