मुंबई: देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्हा मुख्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण होईल. नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते तर अमरावती येथे दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
सामान्य प्रशासन विभागाकडून याविषयीचे परिपत्रक जारी करण्यात आला असून राज्यातील जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पालकमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल.
शिवसेनेच्या नाराजीमुळे रायगड आणि नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणाबाबत परिपत्रक जारी केले. त्यानुसार पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होईल. राज्याचा मुख्य प्रशासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी ध्वजारोहण होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बीड जिल्ह्यात, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्यात, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अहिल्यानगर जिल्ह्यात, वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पालघर जिल्ह्यात ध्वजारोहण होईल.
रायगडमध्ये आदिती तटकरे यांच्या हस्ते याआधी ध्वजारोहण केले जात असे. पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे व गोगावले यांच्यात चुरस आहे. महाराष्ट्र दिनापाठोपाठ स्वातंत्रदिनी ध्वजारोहणास गोगावले यांनाच संधी देण्यात आली आहे. यामुळेच गोगावले हे पालकमंत्री होणार, असे शिवसेनेच्या गोटातून दावा करण्यात येत आहे.
जिल्हा आणि ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची नावे
जळगाव: गुलाबराव पाटील, अमरावती: दादाजी भुसे, यवतमाळ: संजय राठोड, रत्नागिरी: उदय सामंत, धुळे: जयकुमार रावल, जालना: पंकजा मुंडे, नांदेड: अतुल सावे, चंद्रपूर: डॉ. अशोक उईके, सातारा: शंभुराज देसाई, मुंबई उपनगर: ॲड. आशिष शेलार, वाशिम: दत्तात्रय भरणे, लातूर: शिवेंद्रसिंह भोसले, नंदुरबार: हसन मुश्रीफ , सोलापूर: जयकुमार गोरे, हिंगोली: नरहरी झिरवाळ, भंडारा: माधुरी मिसाळ , छत्रपती संभाजीनगर: संजय शिरसाट, धाराशिव: प्रताप सरनाईक, बुलढाणा: मकरंद जाधव (पाटील), सिंधुदुर्ग: नितेश राणे, अकोला: आकाश फुंडकर, कोल्हापूर: प्रकाश आबिटकर, गडचिरोली: ॲड.आशिष जयस्वाल, वर्धा: डॉ. पंकज भोयर आणि परभणी: मेघना दीपक साकोरे-बोर्डीकर, गोंदिया-इंद्रनील नाईक
