अकोले: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राज्यात एकल महिलांच्या हस्ते १८३ ठिकाणी झेंडावंदन करण्यात आले. कोठे शाळा, महाविद्यालयात तर कोठे गावाच्या प्रमुख चौकात, ग्रामपंचायत कार्यालयात एकल महिलांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. साउ एकल महिला संघटनेचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
साऊ एकल महिला समितीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात एकल महिलांना सन्मान देण्यासाठी एकल महिलांच्या हस्ते झेंडावंदन करावे, यासाठी आवाहन केले होते. त्याला राज्यात प्रतिसाद मिळाला. एकूण १८३ ठिकाणी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात एकल महिलांच्या हस्ते झेंडावंदन पार पडले.
एकल महिलांना सन्मान दिला जातो आहे, हे खूप आश्वासक आहे. या उपक्रमामागे एकल महिलांना गावांमध्ये सन्मानाची वागणूक मिळावी, हाच हेतू आहे. एकल महिला अनेकदा घरातल्या कार्यक्रमातही सहभागी केल्या जात नाही. चांगले आवरून गावातील कोणत्याच कार्यक्रमालाही एकल महिला फारशा जात नाहीत. रूढी, परंपरा यामुळे त्यांना सन्मानाने कार्यक्रमांमध्ये सहभागी केले जात नाही व त्याही सातत्याने बाजूला राहतात. याला छेद देण्यासाठी गावातील सर्वात महत्त्वाच्या कार्यक्रमात, सर्वात महत्त्वाचा सन्मान त्यांना द्यावा असा यामागे प्रयत्न असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
या मोहिमेच्या अंतर्गत अकोले तालुक्यातील रुंभोडी या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच रवी मालुंजकर यांनी पुढाकार घेऊन एकल महिलेच्या हस्ते झेंडावंदन केले. एकल महिला मंगल सावंत यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. यावेळी कुलकर्णीही उपस्थित होते. राज्यातील २८ जिल्ह्यांमध्ये साउ एकल महिला संघटनेच्या या आवाहनाला कमीअधिक प्रतिसाद मिळाला. जालना जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २२ ठिकाणी तर अहिल्यानगर जिल्ह्यात १९ ठिकाणी याप्रमाणे झेंडावंदन झाले.
वाशिम १८, गोंदिया व सातारा प्रत्येकी १३, सोलापूर १२ ठिकाणी या मोहिमेला प्रतिसाद मिळाला. सांगली, अमरावती, गडचिरोली, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यात प्रत्येकी १ गावात या प्रमाणे झेंडावंदन झाले. अन्य जिल्ह्यांचा तपशील पुढीलप्रमाणे- परभणी २, अकोला ४, वर्धा ५, भंडारा ४, नंदुरबार ४, मुंबई ६, रायगड २, नांदेड ४, यवतमाळ ४, संभाजीनगर ६, धुळे ५, नाशिक १०, कोल्हापूर ३, नागपूर व पुणे प्रत्येकी ४.
