मुंबई: राज्यातील पायाभूत कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत यासाठी आता कंत्राटदारांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या ५०० कोटी रुपयांवरील कामांसाठी निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना गुण दिले जाणार असून १०० पैकी ८०हून अधिक गुण मिळवणाऱ्या कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे, तर ६० पेक्षा कमी गुण मिळवणारे कंत्राटदार निविदा प्रक्रियेतूनच बाद ठरणार आहेत. त्यामुळे निविदा भरताना कंत्राटदारांना कामगिरी प्रमाणपत्र (परफॉर्मन्स सर्टिफिकेट) सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पायाभूत सुविधांची निकष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांमुळे प्रकल्पांना विलंब, खर्चात वाढ, न्यालयीन प्रकरणे तसेच नागरिकांची गैरसोय होते. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रकल्पांचे काम देताना आता कंत्राटदाराची तांत्रिक आणि आर्थिक क्षमता पाहण्याऐवजी त्याने यापूर्वी प्रत्यक्षात केलेल्या कामांची गुणवत्ता, वेळेचे पालन, सुरक्षा, करारातील अटींची पूर्तता आणि एकूण प्रकल्प व्यवस्थापन यांचा विचार केला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याविषयीचा शासननिर्णय काढण्यात आला असला तरी त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, एमएमआरडीए, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, जलसंपदा विभाग, महामेट्रो, म्हाडा, ग्रामविकास व नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांचा समावेश आहे.

प्रत्येक प्रकल्पासाठी कामगिरी प्रमाणपत्र

निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराला प्रत्येक पात्र प्रकल्पासाठी वैध कामगिरी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. प्रत्येक सुरू असलेल्या प्रकल्पासाठीही हे प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे. हे प्रमाणपत्र मुख्य अभियंता किंवा त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याने जारी केलेले असणे आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र केवळ वर्षभरासाठीच वैध राहणार असून ते नसल्यास संबंधित प्रकल्पाचा अनुभव तांत्रिक क्षमता ठरविताना ग्राह्य धरला जाणार नाही. पूर्ण झालेल्या प्रकल्पांमध्ये दोष दायित्व कालावधीतील देखभालीचा विचार केला जाईल, तर सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये एकूण कामगिरी, नवीन तंत्रज्ञान, पर्यावरणीय उपाययोजना आणि डिजिटल अहवाल प्रणाली आदींचे मूल्यमापन होईल.

प्रमाणपत्रात काय तपासले जाणार?

कंत्राटदाराच्या कामगिरीचे मूल्यमापन तीन प्रमुख निकषांवर केले जाणार आहे. त्यासाठी एकूण १०० गुण निश्चित करण्यात आले असून वेळेत काम पूर्ण करणे – ३० गुण, कामाची गुणवत्ता – ६० गुण, देखभाल अथवा एकूण कामगिरीसाठी १० गुण दिले जाणार आहेत. सर्व पात्र प्रकल्पांच्या कामगिरी प्रमाणपत्रांच्या आधारे कंत्राटदाराचे अंतिम गुणांकन निश्चित केले जाईल. त्यानुसार कंत्राटदारांचे तीन गट करण्यात येतील ८० पेक्षा अधिक गुण असलेल्यांना हिरव्या श्रेणीत, ६० पेक्षा अधिक गुण आणि ८० पेक्षा कमी गुण पिवळ्या श्रेणीत तर ६० पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या कंत्राटदारांना लाल श्रेणीच्या गटात स्थान मिळणार आहे. लाल श्रेणीतील कंत्राटदार अपात्र ठरणार असून तर पिवळ्या श्रेणीतील कंत्राटदारांकडून सुरक्षा रक्कम १.१० पट अधिक घेतली जाणार आहे.