मुंबईः दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेमध्ये झालेल्या करारांमधून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) येत असून यंदा सुमारे ३१ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीची ‘भगवी पत्रिका’ प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. आतापर्यंत श्वेतपत्रिका काढण्याची प्रथा होती, पण पहिल्यांदाच भगवी पत्रिका काढण्यात येणार आहे.
विरोधी पक्षांनी दोवोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून सरकार राज्यातीच गुंतवणुकदारांशी करार करीत असल्याचा आरोप करीत विधानसभेत चर्चा उपस्थित केली होती. त्यावर बोलताना परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र सलग तीन वर्षे देशात अव्वल ठरल्याचा दावा सामंत यांनी केला. दावोस दौऱ्यातील करारांमुळे राज्यात उद्योगवाढ आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. यावर्षी झालेले करार केवळ एमआयडीसीपुरते मर्यादित नसून उद्योग विभाग, मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांच्या माध्यमातूनही मोठ्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. उद्योग विभागामार्फत १५ लाख १५ हजार कोटी रुपयांचे, एमएमआरडीएमार्फत १५ लाख १० हजार कोटी रुपयांचे आणि एमएसआरडीसीमार्फत एक लाख कोटी रुपयांचे करार झाल्याची माहिती त्यांनी दिली. इतर राज्यांमध्ये करार अंमलबजावणीचा दर ३५ ते ४० टक्के असताना राज्यात हा दर ७५ ते ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला असल्याचेही सामंत यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या गुंतवणुकीबाबत सविस्तर भगवी पत्रिका काढण्यात येणार असून त्यातून विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील असेही त्यांनी सांगितले.
एमआयडीसीच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र धोरण आणण्याची तयारी सुरू असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या धर्तीवर एमआयडीसी क्षेत्रातील झोपडपट्ट्यांसाठी येत्या दोन महिन्यांत धोरण आणेल जाईल. या धोरणामुळे एमआयडीसीच्या जमिनीवर वर्षानुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेच्या ठेवी घटल्याची कबुली
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुदतठेवी सुरक्षित असून विकासकामांसाठी निधीचा योग्य वापर केला जात आहे. या ठेवीमध्ये ९२ हजार कोटींवरुन ७९ हजार कोटींपर्यंत घट झाल्याची कबुली सामंत यांनी यावेळी दिली.
गेल्या वर्षभरात या ठेवींमध्ये दीड हजार कोटींची भर पडल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. शहरात रस्त्यांची कामे जोरात सुरु असून आतापर्यंत २७८ .८३ किलोमीटर लांबीचे १ हजार ४८ रस्ते पूर्ण झाले आहेत. पहिल्या टप्प्यातील सुमारे ५४ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५६ टक्के काम पूर्ण झाल्याचे सामंत यांनी सांगितले.
मिठी नदी प्रकल्पाबाबतही माहिती देताना त्यांनी सांगितले की, या कामात पूर्वी काही अनियमितता आढळून आल्याने चौकशी सुरू आहे. चौकशीत सुमारे ६५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला असून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. शहर सुशोभिकरणाच्या कामात घोटाळयाचा आरोप झाल्यानंतर १२०० कोटींच्या कामाच्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आणखी एका प्रकल्पांच्या३८० कोटींच्या निविदा रद्द करून नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
