मुंबई : जगभरातून तसेच प्रामुख्याने मध्य पूर्व आशियातील डेटा सेंटर क्षेत्रातील अनेक नामांकित कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूकीसाठी उत्सुक आहेत. या पार्श्वभूमीवर करार झाल्यानंतर संबंधित कंपन्यांना त्वरित जागा, वीज उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उद्योग विभागास दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे विदा (डेटा सेंटर्स) संदर्भात बैठकीत फडणवीस बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आदी उपस्थित होते.
डेटा सेंटर क्षेत्रातील जगभरातील अनेक नामांकित कंपन्या राज्यात गुंतवणूकीसाठी उत्सुक असून या कंपन्यांच्या प्रकल्प उभारणी संदर्भातील सर्व अत्यावश्यक कामे व प्रामुख्याने जमीन उपलब्ध करून देण्याची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच या संबंधित कंपन्यांना वीजेची उपलब्धताही प्राधान्याने करुन द्यावी.संबंधित यंत्रणांनी ही कामे त्वरित होतील याबाबत दक्षता घ्यावी. सिडकोने यासाठी लॅण्डबॅंक विकसित करावी. ऊर्जा विभागाने सब स्टेशनसाठी जागा त्वरित उपलब्ध करून घेण्याचे आदेशही फडणवीस यांनी यावेळी दिले.
डेटा सेंटरसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या वतीने तर डेटा सेंटर क्षेत्रातील कंपन्यांसाठी पुरेश्या विजेची उपलब्धता करून देण्यात येत असल्याची माहिती ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली.
एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उच्चशिक्षण संधी
एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. जगभरातील नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी उत्सुकता दर्शवली असल्याने संबंधित विभाग व यंत्रणांनी कालबद्ध वेळेत या प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.
एज्युसिटी व मेडिसिटी संदर्भात आढावा बैठकीत फडणवीस यांनी एज्युसिटी व मेडिसिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील असे सांगत जागतिक पातळीवरील अनेक नामांकित विद्यापीठांनी यासंदर्भात उत्सुकता दर्शवली असल्याने या नामांकित विद्यापीठांनी येथे त्यांचे कॅम्पस सुरु करण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांनी त्वरित कार्यवाही करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एज्युसिटी व मेडिसिटी प्रकल्पासाठी जागा संपादित करण्यात येत असल्याची तसेच मेडीसीटीसाठीही आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली.
