Premium

“महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत, हे तिघेही..”; संजय राऊत यांची बोचरी टीका

घाशीराम कोतवाल याच्यावर पेशवे काळात पुण्याच्या सुरक्षेची जबाबदारी होती त्याने लूटमार आणि दरोडेखोरी वाढवली असंही राऊत म्हणाले आहेत.

What Sanjay Raut Said?
महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवालांचं राज्य (फोटो-अमेय येलमकर, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)

महाराष्ट्रावर तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. पेशवे काळात घाशीराम कोतवालावर पुण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र तो लूटमार करायचा, अनागोंदी माजवली होती. तशाच प्रकारे सध्याच्या घडीला राज्यकारभार सुरु आहे असं म्हणत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. काही वेळापूर्वीच माध्यमांशी चर्चा करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

“पुण्यात पेशवेकाळात घाशीराम कोतवाल होता. सरकार तीन घाशीराम कोतवाल सरकार चालवत आहेत. त्यांना कुठली नैतिकता आहे? दुसऱ्यांवर हे बोट उचलत आहेत. महाराष्ट्रात तीन घाशीराम कोतवाल राज्य करत आहेत. घाशीराम कोतवालाचा कार्यकाळ बघा, त्याच्या काळात लूटमार, दरोडेखोरी, कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत अनागोंदी होती. घाशीराम कोतवालावर पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी होती. त्याने ज्या पद्धतीने लूटमार सुरु करुन आपल्या बॉसेसना पैसे आणि सगळंच पोहचवत होता. घाशीराम कोतवाल हे नाटक फार गाजलं महाराष्ट्रात. घाशीराम कोतवाल ही विकृती होती. आज या राज्यावर घाशीराम कोतवालांचं राज्य आहे.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का?

भाजपा हा नैतिकतेचे फुगे छाती फुटेपर्यंत फुगवतो. यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का? भाजपाच्या नैतिकतेचं ऑडिट झालं पाहिजे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहिण्याचं जे काही नाटक केलं आहे ते प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी का नाही? दोघांचे अपराध सारखे आहेत. प्रफुल्ल पटेल हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. इकडे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही म्हणतात. आज शिंदे गटाचा पोपट बोलला की नवाब मलिकच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही. हे सगळे बोलणारे नवाब मलिकांचे बाप आहेत. गद्दारांच्या मागे ईडी लागली होती म्हणून अटकेच्या भीती तिकडे गेले असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन मंत्री सहभागी आहेत. सरकारने त्यांच्यावर कारवाई केली का? आमच्या पक्षाचे जे लोक घेतले आहेत, राष्ट्रवादीचे जे लोक घेतलेत त्यांच्यावर आरोप आहेत.प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादीचे खासदार आहेत ते मंत्री असताना भाजपाने मुद्दा उपस्थित केला होता की इक्बाल मिर्चीशी संबंध असलेले मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात कसे? आता प्रफुल्ल पटेल कुठे आहेत? नवाब मलिक चालत नाहीत म्हणत आहात. मी मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर असं नाटक सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या सफाईचा आढावा घेण्यापेक्षा आपल्या मंत्रिमंडळातल्या भ्रष्ट मंत्र्यांची सफाई केली पाहिजे असंही राऊत म्हणाले.

ड्रग्ज रॅकेटमध्ये दोन मोठे मासे

ललित पाटीलला तुरुंगातून ससूनमध्ये आणून त्याची बडदास्त ठेवण्यात आली. त्याच्या ड्रग्जच्या साम्राज्याला फोफावण्यासाठी मदत केली. दोन कॅबिनेट मंत्री आहेत शिंदे गटाचे जे यामागे आहेत. किरकोळ लहान मासे पकडू नका, दोन मोठे मासे मंत्रिमंडळात बसले आहेत त्यांना पकडण्याची हिंमत दाखवा असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra is ruled by three ghashiram kotwals said thackeray group mp sanajy raut scj

First published on: 09-12-2023 at 10:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा