महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडूनही वादग्रस्त वक्तव्ये सुरूच आहेत. अशातच काल बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांना सूचक इशारा दिला आहे.

राज ठाकरे म्हणाले, ‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.’

Kolhapur A Y Patil
कोल्हापूर राष्ट्रवादीतील वाद उफाळला; हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांनी माझे राजकारण संपवण्याचे काम केले – ए. वाय. पाटील कडाडले
CM Sukhwinder Singh Sukhu
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खूंचा राजीनामा? विरोधकांच्या दाव्यावर सुक्खूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Sharad pawar devendra Fadnavis (1)
“मनोज जरांगे शरद पवारांची स्क्रिप्ट वाचतायत”, फडणवीसांच्या आरोपांवर पवार म्हणाले, “मी आंतरवालीला जाऊन…”
What Uddhav Thackeray Said?
“आम्ही मनोज जरांगेंच्या मागे असू तर मागच्या महिन्यात गुलाल कुणी उधळला? देवेंद्र फडणवीस यांनी..”, उद्धव ठाकरेंचं उत्तर

हेही वाचा – बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

याशिवाय राज ठाकरे यांनी याच संदर्भात ट्विटर आणि फेसबुकवर एक पत्रही पोस्ट केलं आहे. ज्यामध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तत्काळ थांबवा.’

तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल-

याशिवाय ‘हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल की त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.’ असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

…महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं –

याचबरोबर ‘अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधंसोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.’ असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर … –

‘मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.’ असं शेवटी राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे.