पुणे : राज्यातील केंद्र शाळांतील केंद्रप्रमुख अर्थात समूह साधन समन्वयक पदासाठी चुरस होणार आहे. एका पदासाठी पंधरा शिक्षक असून, परीक्षा दिलेल्या शिक्षकांचे परीक्षेच्या निकालाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यातील समूह साधन केंद्रातील (केंद्रशाळा) समूह साधन केंद्र समन्वयकांच्या (केंद्रप्रमुख) २ हजार ४१० पदांसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५’ ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षा परिषदेने २०२३ मध्येही केंद्रप्रमुख पदासाठी ही परीक्षा आयोजित केली होती. त्यावेळीही शिक्षक उमेदवारांनी अर्ज भरून नोंदणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव त्यावेळीही परीक्षा होऊ शकली नव्हती. त्यानंतर पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया राबवून ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा घेण्यात आली. २ हजार ४१० पदांपैकी  पुणे जिल्ह्यात १५१, नाशिक जिल्ह्यात १२२, रत्नागिरी जिल्ह्यात १२५, अहिल्यानगर जिल्ह्यात १२३, रायगड जिल्ह्यात ११४ पदे उपलब्ध आहेत. त्याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्येही पदे उपलब्ध आहेत. त्यामुळे राज्यभरातील शिक्षकांचे या परीक्षेकडे लक्ष लागले होते.

परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ४६ हजार ६८ शिक्षकांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. दोन सत्रांत झालेली ही परीक्षा ३८ हजार ५५९ शिक्षकांनी दिली. तर ७ हजार ५०९ शिक्षक अनुपस्थित राहिले. मात्र, या परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणात नोंदणी झाल्यामुळे निवडीसाठी चुरस होणार असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे १५ उमेदवारांतून एका उमेदवाराची या पदासाठी निवड होणार असल्याचे चित्र आहे.

समूह साधन केंद्र समन्वयक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाची प्रक्रिया सुरू आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न आहे, असे राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.

दरम्यान, परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, समूह साधन समन्यावयक (केंद्रप्रमुख) पदासाठी जिल्हा परिषद शाळांतील कार्यरत शिक्षक पात्र आहेत. परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल, त्याच जिल्ह्यातील निवडीसाठी पात्र राहील. परीक्षेमध्ये १०० गुणांसाठी बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता, १०० गुणांसाठी शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम, शैक्षणिक नवविचार प्रवाह असे विषय असतील, असे स्पष्ट करण्यात आले होते.