तब्बल २१ वर्षा नंतर कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात महाराष्ट्र केसरीची प्रतिष्ठेची गदा पृथ्वीराज पाटील यांच्या रूपाने आली आहे. या दैदीप्यमान यशानंतर कोल्हापुरात पृथ्वीराजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. साखर पेढे वाटून या यशाचा आनंद व्यक्त करण्यात आला. त्याने आता ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवून मिळवावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. इचलकरंजीतील व्यंकोबा कुस्ती मैदान कुस्ती आखाड्यातील मल्लांनी आणि नवमहाराष्ट्र आखाडा गारगोटी येथे नागरिकांनी एकमेकांना साखर, पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
Maharashtra Kesari 2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी!
सातारा येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील यांने विजेतेपद मिळवले. २१ वर्षांपूर्वी हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा दोन्ही प्रतिष्ठेच्या केसरीचा मानकरी असलेल्या विनोद चौगुले यांच्यानंतर पृथ्वीराजने हे यश कोल्हापूरला खेचून आणले आहे. याच बरोबर गेल्या दोन दशकांचा पदकाचा वनवास संपला असून कोल्हापूरकरांच्या प्रतीक्षेला पृथ्वीराजच्या रूपाने गोड फळ मिळाले आहे.
अशी घेतली झेप –
पन्हाळा तालुक्यातील देवठाणे या गावच्या पृथ्वीराजने शाहू कुस्ती केंद्र शिंगणापूर येथे सुरुवातीला कुस्तीचा सराव केला. त्याची सुरुवात कोल्हापुरातील मोतीबाग तालीम मध्ये २२ किलो वजनी गटातून झाली होती. त्याचे काका संग्राम पाटील, जालिंदर मुंडे आदींनी त्यास मार्गदर्शन केले. जागतिक कुमार स्पर्धेत कास्यपदक मिळाल्याने त्यास सैन्यदलात नोकरीची संधी मिळाली. तर दुसरीकडे ट्रिपल महाराष्ट्र केसरी, पोलीस उपाधीक्षक नरसिंग यादव यांच्यासोबत भारतीय कुस्ती शिबिरात त्याचा सराव सुरू असतो.
पृथ्वीराजचे आजोबा मारुती गणपती पाटील कुस्तीपटू होते. गावातल्या तालमीत त्याने कुस्तीचे धडे घेतले. पृथ्वीराजचे वडील बाबासाहेब पाटील यांना कुस्तीत लक्ष देता आलं नाही, ते शेतीत रमले. मुलाने चांगला पैलवान व्हावं अशी त्यांची इच्छा होती. भाऊ संग्राम व धनाजी पाटील मोतीबाग तालमीतले नावाजलेले पैलवान होते. पृथ्वीराज २००९ ला मोतीबाग तालमीत दाखल झाला. महान भारत केसरी दादू चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा कुस्तीतला प्रवास सुरू झाला.
२०१४ ला तो शिंगणापुरातील शाहू कुस्ती केंद्रात दाखल झाला. वस्ताद जालंदर मुंडे यांनी प्रशिक्षण दिले. त्याने २०२१ ला झालेल्या सिनियर नॅशनल स्पर्धेत सुवर्ण आणि २०२२ ला कास्यपदक पटकावले. याचबरोबर खेलो इंडिया २०२० ला सुवर्णपदक पटकावले. तर, २०१९ ला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ९२ किलो गटातही त्याने सुवर्णपदक पटकावले होते.
सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव –
आज पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी पदक मिळाल्यानंतर त्याच्यावर समाज माध्यमातून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. ‘रक्ताचे पाणी करावे लागते तेव्हा असे यश मिळते. ध्येय गाठण्यासाठी जिद्द महत्त्वाची’ असा आशय व्यक्त करीत अनेकांनीकडून पृथ्वीराजचा लहानपणीचा कुस्तीच्या आखड्यामधील फोटो देखील शेअर केला जात आहे. तर नवोदित मल्लांनी साखर पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.
आता पृथ्वीराजने ऑलिम्पिकची तयारी करावी –
पृथ्वीराजच्या यशाबद्दल बोलतान कामगार केसरी विजेते मल्ल अमृत भोसले यांनी सांगितले की, ”पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरी मिळवून कोल्हापूरची दीर्घकाळची प्रतीक्षा संपवली आहे. मानाची चांदीची गदा मिळवणार्या पृथ्वीराजमुळे कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापुरात आनंदाचा क्षण आला आहे. गेली अनेक वर्ष मी तसेच नंदू आबदार, अशोक माने, कौस्तुभ डाभळे अशा अनेक मल्लांनी महाराष्ट्र केसरी मिळवण्यासाठी कसून सराव केला. दुर्दैवाने आणि नशिबाने साथ मिळाली नाही. पण पृथ्वीराजच्या रुपाने कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा ‘किताब मिळाल्याचा हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आता पृथ्वीराजने इथेच न थांबता ऑलिम्पिकचे पदक मिळवण्याचे ध्येय बाळगले पाहिजे.”