कराड : महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सातारा व सांगली जिल्ह्यातील पहिलवानांनी बुधवारी (दि. ११) कराड येथून मुंबईच्या दिशेने आक्रोश मोर्चा काढत, आपला संताप व्यक्त केला. आक्रोश मोर्चात ४० महाराष्ट्र केसरी, १० हिंद केसरी यांचेसह असंख्य पहिलवानांनी आपल्या मानाच्या गदांसह सहभाग घेतला.
देशाला ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक मिळवून देणारे, ख्यातनाम मल्ल खाशाबा जाधव यांच्या कराडमधील स्मारकाला अभिवादन करून, आक्रोश मोर्चास प्रारंभ करण्यात आला. आणि आंदोलक पहिलवान आक्रमकपणे मुंबईकडे रवाना झाले.
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या स्मारकस्थळी मोर्चाच्या प्रारंभी झालेल्या कार्यक्रमात डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील, कोल्हापूरचे महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सांगलीचे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, महाराष्ट्र केसरी नामदेव मुळे, सातारचे महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे यांच्यासह सातारा व सांगली जिल्ह्यातील पहिलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चंद्रहार पाटील यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या परंपरेबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, सुमारे साठ वर्षांपासून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची एकसंध परंपरा सुरू आहे. मात्र, यावर्षी राज्यात वेगवेगळ्या चार महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असल्याने कुस्ती क्षेत्रात संभ्रम निर्माण झाला आहे. हा प्रकार तातडीने थांबवणे आवश्यक असल्याची मागणी पाटील यांनी केली.
पहिलवानांसाठी शासनाकडून अनेक सुविधा जाहीर असल्या तरी प्रत्यक्षात त्या मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या प्रश्नांवर लवकर तोडगा न निघाल्यास ‘महाराष्ट्र केसरी’च्या मानाच्या गदा सरकारकडे जमा करण्याचा निर्वाणीचा इशाराही चंद्रहार पाटील यांनी दिला.
पहिलवानांच्या या आक्रोश मोर्चामुळे कुस्ती क्षेत्रातील असंतोष पुन्हा एकदा उघड झाला असून, शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आग्रही मागणी पहिलवान मंडळींकडून केली जात आहे.
