मुंबई : मोसमी पावसाने ओढ दिल्याचा परिणाम पेरण्यांवर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा चार जुलै अखेर ४४.३९ लाख हेक्‍टरवर पेरणी झाली असून, गतवर्षी याच काळात १.०५ कोटी हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यातील खरीप हंगामातील ऊस वगळून एकूण पेरणी क्षेत्र सरासरी १.४४ कोटी हेक्टर आहे.

राज्यात मागील चार दिवसांपासून सर्वदूर पाऊस पडत आहे. पण, संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यामुळे पेरण्यांवर परिणाम झाला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्याला सुरुवात होते. काही भागांत धूळ वाफ पेरण्या होतात. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे धूळवाफ पेरण्याही अत्यंत कमी झाल्या. शिवाय जूनअखेरपर्यंत पाऊस न पडल्यामुळे बहुतांश भागात पेरण्यांना सुरुवातच झाली नव्हती. जूनअखेरपर्यंत जमतेम दहा टक्केही पेरण्या झाल्या नव्हत्या.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून किनारपट्टी आणि सह्याद्री घाटमाथ्याच्या परिसरात काही प्रमाणात पावसाला सुरुवात झाल्यामुळे पेरण्याला गती आली आहे. चार जुलैअखेर राज्यात सरासरीच्या तुलनेत २८ टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. यंदा ४४,३९,१८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी याच काळात १,०५,०५,९६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. राज्यातील खरीप हंगामातील गत पाच वर्षांतील सरासरी पेरणी क्षेत्र १,५७,४७,८६२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यात सुमारे दहा ते तेरा लाख हेक्टर ऊस लागवडीचा समावेश असतो.

मका, सोयाबीन, कापसाची पेरणीत आघाडी

अन्य पिकांच्या तुलनेत मका, सोयाबीन, कापूस लागवडीने आघाडी घेतली आहे. खरीप हंगामात सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र प्रत्येकी सुमारे ५० लाख हेक्टर आहे, तर मका लागवड खालील क्षेत्र मागील काही वर्षात दहा लाख हेक्टर गेले आहे. यंदा ३.२३ लाख हेक्टर क्षेत्रावर मक्याची, सोयाबीनची १३.३४ लाख हेक्टरवर तर कापसाची २०.६० लाख हेक्टर पेरणी झाली आहे.

ऊस लागवड रखडली

राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र साधारण 10 ते 13 लाख हेक्टर आहे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते पण यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे ऊस लागू लागवडीवर अत्यंत गंभीर परिणाम झाला आहे सरासरीच्या तुलनेत फक्त चार टक्क्यांवर ऊस लागवड झाली आहे जूनपर्यंत फक्त ५१,८३६ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे.

यवतमाळ, जळगाव आघाडीवर

राज्याची खरीप पेरण्यांची टक्केवारी सरासरी २८ टक्के असली तरी यवतमाळ आणि जळगाव जिल्हे पेरण्यांमध्ये आघाडीवर आहेत. यवतमाळमध्ये जिल्ह्याच्या सरासरीच्या ६५ टक्के तर जळगावमध्ये जिल्ह्याच्या सरासरीच्या ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यांच्या खालोखाल वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा नंबर लागतो.

जुलैअखेर पेरण्या पूर्ण होतील

मागील चार-पाच दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पाऊस पडला आहे. बऱ्याच ठिकाणी पेरणी योग्य पाऊस झाला आहे. पेरणी योग्य पाऊस झालेल्या ठिकाणी वाफसा येताच वेगाने पेरण्या होतील. ग्रामीण भागातील सद्यस्थिती पाहता जुलैअखेर पेरण्या सरासरी इतक्या पेरण्या होतील, अशी माहिती कृषी विभागाचे विकास आणि विस्तार विभागाचे संचालक रफिक नायकवडी यांनी दिली.