भारतीय हवामान विभागासह जगभरातील अनेक हवामान विषयक संस्था यंदा एल निनोची स्थिती निर्माण होईल, असे भाकीत वर्तवित आहेत, त्याची तीव्रता जास्त असेल असाही अंदाज आहे. या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
जून महिना कोरडा गेला आहे. जुलैच्या सुरुवातीपासून पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन चांगला पाऊस राज्यभरात पडत आहे. एकीकडे धरणातील पाणीसाठयाने तळ गाठला आहे. दुसरीकडे पावसाअभावी पेरण्या थांबल्या आहेत. सरासरीच्या २८ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. गतवर्षी याच काळात साधारण एक कोटी हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या होत्या, तर यंदा जमते आणि ४० लाख हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या आहेत. साधारण जुलै मध्यापर्यंत खरीपाच्या पेरण्या उरकतात आणि जुलैअखेर पर्यंत १४५ लाख हेक्टर पर्यंत पेरणी होते. याच काळात साधारण १० ते १३ लाख हेक्टर पर्यंत उसाची लागवड होते.
सध्या पडलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर वाहून जात असतानाचे चित्र आपण पाहत आहोत. पडलेल्या पावसाचे पाणी पूर्णपणे अडवणे शक्य नाही किंवा हे पाणी धरणांत साठविणे सुद्धा शक्य नाही. पण पावसाचे पडलेले पाणी समुद्राला वाहून जाणे पहात बसणे सुद्धा योग्य होणार नाही. त्यामुळे पावसाच्या पडलेल्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज आहे, ते केल्याशिवाय शाश्वत शेती शक्य नाही.
धरणांनी तळ गाठताच राज्य सरकारने शेतीचे पाणी बंद करून पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते. कोणतीही सरकार पाणीटंचाईच्या काळात हीच भूमिका घेणार, त्याला पर्याय नाही. पण मग शेतीसाठीच्या पाण्याची कशी करायची असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कधीकाळी आपल्याकडे उन्हाळ्यात बांधबंधिस्ती केली जायची. शेतकरी स्वतःच्या खिशातून पैसे घालून शेत जमिनीची बांध-बंधिस्ती करायचा आणि शेतात पडलेले पावसाचे पाणी शेतीच्या एका कोपऱ्यातून काढून द्यायचा. है करत असताना ठराविक पाणी शेतात साचून राहील आणि ते जमिनीत मुरेल यांची व्यवस्था करायचा आणि बाकी पाणी काढून द्यायचा. ही पाणी आडवा पाणी जिरवाची पारंपारिक पद्धत होती.
आता जलसंधारणाच्या नवनवीन योजना आल्या आहेत. नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. पण गावोगावी जलसंधारणाची अपेक्षित काम होताना दिसत नाहीत. उलट जलसंधारणाच्या कामातील भ्रष्टाचार समोर येताना दिसतो आहे. या पार्श्वभूमीवर पावसाच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. एकीकडे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढत आहे. त्यामुळे हवामान बदलाला अनुकूल बियाणं किंवा अनुकूल पीक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे, अशी पीक पद्धती अवलंबणे तत्काळ, तातडीने शक्य नाही. ही प्रक्रिया हळूहळूच करावी लागणार आहे. शेती विषयक संशोधन संस्थांनी पाण्याचा ताण सहन करणारे अति पाण्यात तग धरणारे वाणांचे संशोधन करण्याची गरज आहे. हवामान अनुकूल शेती
च्या दिशेने आपल्याला जायचे असेल तर संरक्षित शेतीचा एक पर्याय आहे. पण, संरक्षित शेती हा खर्चिक भाग आहे. शेतीमालाला सध्या मिळणारा भाव पाहता संरक्षित शेतीवर खर्च करणे शेतकऱ्याला परवडणारे नाही. दुसरीकडे प्रत्येक गोष्टीवर सरकारकडून अनुदान मागणे ही योग्य नाही. त्यामुळे यातील मध्यम मार्ग काढण्याची गरज आहे. हवामान अनुकूल आणि आर्थिक दृष्ट्या समतोल साधणारी शेती केली तरच आपण शाश्वत शेतीच्या दिशेने पाऊल टाकू शकू.
dattatray.jadhav@expressindia.com
