मुंबई : राज्यभरात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. समाधानकारक पावसामुळे खरीप पेरण्यांचा टक्का वाढला असून, राज्यात रविवारी, बारा जुलैअखेर ८४ लाख ६१ हजार ६९ हेक्टरवर म्हणजेच ५९ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गतवर्षी याच काळात ८२ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. कोकण, पुणे, कोल्हापूर विभाग पिछाडीवर असून, अमरावती विभागात सर्वाधिक ८१ टक्के पेरणी झाली आहे.

जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे जुलैच्या सुरुवातीपर्यंत राज्यभरात जेमतेम २८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. पण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर पाऊस पडला, त्यामुळे पेरण्यांचा टक्का वाढल्याचे दिसून येत आहे. रविवारीपर्यंत राज्यात एकूण ८५ लाख ६१ हजार ६९ हेक्टरवर म्हणजेच एकूण ५९ टक्के पेरणी झाली आहे. गतवर्षी याच काळात १ कोटी १८ लाख ६२ हजार ६०० हेक्टरवर म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाले होती.

पेरण्यांमध्ये विदर्भाची आघाडी

राज्यात अमरावती विभागाने खरीप पेरण्यांमध्ये आघाडी घेतली असून सरासरीच्या ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्या खालोखाल छत्रपती संभाजी नगरमध्ये ६५ टक्के, लातूर विभागात ६३ टक्के, नाशिक विभागात ५६ टक्के, नागपूर विभागात ५३ टक्के पेरणी झाली आहे.

कोकण विभागात भात लागवड रखडली

जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दडी दिल्यामुळे कोकणात जूनच्या पहिल्या आठवड्यात टाकलेली भात रोपे वाया गेली. जुलैमध्ये चांगला पाऊस पडल्यानंतर पुन्हा नव्याने भात रोपे टाकली आहेत, ही रोपे लावणीला येईपर्यंत कोकण विभागात पेरणीची टक्केवारी वाढणार नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरावड्यात कोकणात भात लागवडीला गती येईल, अशी माहिती कृषी विभागाचे संचालक रफिक नायकवडी यांनी दिली.

पेरणीची घाई करू नये

पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे पेरण्यांची टक्केवारी वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यात समाधानकारक पेरणी झाली असली तरी, पुणे, कोल्हापूर, कोकण विभागात अपेक्षित लागवड झाली नाही. चांगला पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे.