रत्नागिरी – कोकणात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर असणा-या ४० संवेदनशील ठिकाणी २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. यासाठी ६३६ प्रशिक्षित कर्मचारी नेमण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालन संतोषकुमार झा आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी गिरीश करंदीकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोकण रेल्वेचे पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून लागू होत आहे. तसेच मुसळधार पावसामुळे रेल्वेचा वेग ताशी ४० किलोमीटरने कमी करण्याच्या सूचना लोको पायलटसना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच अतिवृष्टीत कोकण रेल्वेमार्गावर प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी देखभाल दुरुस्तीवर भर देण्यात आला आहे. दऱ्याखोऱ्यातून जाणाऱ्या रेल्वेमार्गाशेजारील पाणी निचरा होण्यासाठीची गटारे स्वच्छ करण्यात येत आहेत. लोको पायलट आणि गार्डना वॉकीटॉकी दिलेल्या आहेत. सर्व रेल्वेस्थानकावर २५ वॅटचे व्हीएचएफ सेट असून, त्याद्वारे ट्रेन क्रू आणि स्टेशन मास्टर्स यांच्यामध्ये सतत संवाद ठेवता येतो.
आपत्कालीन परिस्थितीत पेट्रोलमन, वॉचमन, लोको पायलट गार्ड आणि नियंत्रण कार्यालयांसह इतर फील्ड देखभाल कर्मचाऱ्यांमध्ये तत्काळ संपर्क साधण्यासाठी दर एक कि.मी. अंतरावर आपत्कालीन संप्रेषण सॉकेट्स बसवलेले आहेत. मुसळधार पावसामुळे कमी दृश्यमानता असल्यास ट्रेनचा वेग ताशी ४० कि.मी. कमी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
पाण्याचा वेग १०० मि.मी. पेक्षा जास्त असल्यास ट्रेन सेवा तात्पुरती स्थगित केली जाईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे. कमी प्रकाश आणि धुक्याच्या परिस्थितीत दृश्यमानता वाढवण्यासाठी एईडी सिग्नल बसवण्यात आले आहेत. स्वयं रेकॉर्डिंग पर्जन्यमापक स्थानकांवर बसवले आहेत. स्वयं रेकॉर्डिंग पर्जन्यमापक स्थानकांवर बसवले आहेत.
पाण्याची पातळी धोकादायक पातळीपर्यंत पोहोचल्यास अधिकाऱ्यांना सतर्क करण्यासाठी काली नदी, सावित्री नदी आणि वशिष्ठी नदी या प्रमुख पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यरत आहेत. वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी पानवल (रत्नागिरी आणि निवसर दरम्यान), मांडवी पूल (थिविम आणि करमाळी दरम्यान), झुआरी पूल (करमाळी आणि वेर्ना) आणि शरावती पूल (होन्नावर आणि माणकीदरम्यान) या चार ठिकाणी वाऱ्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी प्रमुख व्हायाडक्ट आणि पुलांवर अनिमोमीटर बसवले आहेत.
पावसाळी वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होणार असून २० ऑक्टोबरपर्यंत लागू असेल, अशी माहिती कोकण रेल्वेच्या पत्रकातून देण्यात आली आहे..