रत्नागिरी : हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी सायंकाळी रत्नगिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पडलेल्या या पावसाने सर्वांची तारांबळ उडवली. सुमारे तासभर पडलेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणीही साठले.

अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे १६ नोव्हेंबरपर्यंत कोकण किनारपट्टीसह राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. त्याप्रमाणे गेले दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रविवारी सकाळपासूनच प्रचंड उष्मा जाणवत होता. सकाळी सूर्यदर्शन फारसे झालेच नव्हते. दुपारी उन पडायला सुरवात झाली; मात्र सायंकाळी पुन्हा पावसाळी वातावरण होऊन हलका वाराही वाहायला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह विजा चमकू लागल्या आणि भरुन आलेल्या आभाळातून पावसाच्या सरी कोसळू लागल्या.

अशा प्रकारे अचानक पाऊस पडायला लागल्यामुळे रत्नगिरी शहरासह गणपतीपुळेसारख्या पर्यटनस्थळी फिरायला आलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ करावी लागली. मंडणगड, दापोली, खेडसह चिपळूण, रत्नगिरी, लांजा, राजापूर, संगमेश्?वर इत्यादी बहुतेक सर्व तालुक्यांमध्ये सुमारे एक तास या पावसाचा जोर होता. निवळी—जयगड परिसरात मुसळधार पावसाने जास्त झोडपले. रत्नगिरी शहरातील मजगाव, शिळ, मिरजोळे पंचRोशीत जोरदार पडलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणी वाहत होते. रत्नगिरी शहरात नवीन पाणी योजनेच्या वाहिन्या आणि भूमिगत गॅस वाहिनीसाठी ठिकठिकाणी खोदाई सुरु आहे. त्यामुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले . त्यामधून वाहन चालवताना नागरिकांना कसरतच करावी लागत होती.

गेले आठ दिवस जिल्ह्यात थंडी पडायला सुरवात झाली होती. त्यामुळे समुद्र किनारी असलेल्या हापूसच्या बागांना मोहोर येऊ लागला होता. तो किड रोगांपासून वाचवण्यासाठी आंबा बागायतदारांनी किटकनाशकांची फवारणी केली; मात्र मुसळधार पाऊस पडल्यामुळे ती वाया गेली असून बागायतदारांना भुर्दंड बसला आहे.

सावंतवाडीत पावसाने धावपळ

सावंतवाडी : सावंतवाडी शहर आणि परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. दिवाळी सणाच्या काळात गुलाबी थंडीची चाहूल लागली असतानाच गेल्या दोन दिवसापासून हवामानातील बदलामुळे उष्णता निर्माण झाली होती. आंबा काजू झाडांना मोहोर येण्याची शक्यता असणारे वातावरण निर्माण होत असतानाच अवेळी पावसामुळे आता परिणाम जाणवतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. आज सायंकाळी हवामानात बदल होवून दमटपणा आला आणि साडेपाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. या दरम्यान ढगांचा गडगडाट देखील सुरू झाला.