कराड : यंदाच्या तप्त उन्हाळ्यामुळे कोयना धरणातून २०२५-२६ या तांत्रिक जलवर्षात ८.१३ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले. एकूण धरण क्षमतेच्या हे प्रमाण ७.७२ टक्के आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण तब्बल १ टीएमसीने जास्त आहे. बाष्पीभवन झालेले हे पाणी एखाद्या मध्यम आकाराच्या जलसिंचन प्रकल्पाच्या क्षमतेएवढे प्रचंड आहे.

कोयना हे एक महाराष्ट्रातील प्रमुख धरण मानले जाते. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणातून राज्यासाठी वीज निर्मितीबरोबरच सिंचन आणि पाणीयोजनाही चालवल्या जातात. यामुळे या धरणातील जलसाठ्याबाबत सतत लक्ष ठेवले जाते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या कडाक्याच्या उन्हाळ्यामुळे धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात झालेले बाष्पीभवन लक्षवेधी ठरले आहे. यंदाच्या कमी पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर हा फटका चिंता वाढवणारा आहे.

वीजनिर्मिती अंशत: सुरू

‘कोयना’च्या नव्या तांत्रिक जलवर्षाचा प्रारंभ १ जूनपासून झाला असून, पावसाच्या नोंदी, जलव्यवस्थापन, पूरनियंत्रणासाठी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. सध्या सिंचनासाठी पाण्याची मागणी झाल्याने कोयनेची वीजनिर्मिती पायथा वीजगृहातून अंशत: सुरू ठेवण्यात आली आहे.

यंदाचे जलवर्ष आव्हानात्मक

१०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात आजमितीला १५.४१ टीएमसी (धरण क्षमतेच्या १४.६४ टक्के) पाणीसाठा असून, तो गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ३२ टक्यांनी कमी आहे. गतवर्षी आजच्या तारखेला २२.७३ टीएमसी (२१.६० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या तुलनेत मर्यादित जलसाठा असताना, ‘एल निनो’चा प्रभाव तसेच कमी पावसाच्या इशार्‍यामुळे कोयना धरणाची कामगिरी आव्हानात्मक राहणार आहे.

कोयना धरणाच्या जलसाठ्याला नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या जलवर्षात तीव्र उष्म्याचा फटका बसला. गेल्या चार वर्षांतील सर्वाधिक ८.१३ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन या जलवर्षात झाले आहे. सर्वात तप्त उन्हाळ्यामुळे हे बाष्पीभवन झाले असून, ही बाब चिंताजनक आहे. – आशिष जाधव, कोयना प्रकल्प उपअभियंता.

चार वर्षांतील बाष्पीभवन

  • २०२२-२३ : ७.५४ टीएमसी
  • २०२३-२४ : ६.९७ टीएमसी
  • २०२४-२५ : ७.७७ टीएमसी
  • २०२५-२६ : ८.१३ टीएमसी