मुंबई : कृषी विभागाची विविध कामे ऑनलाईन पद्धतीने केली जात आहेत. विविध संकेतस्थळांवर शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन भरावी लागत आहे. त्यासाठी कृषी विभागाचे कर्मचारी मागील दहा वर्षापासून लॅपटॉपची मागणी करत आहेत. लॅपटॉपच्या मागणीसाठी गतवर्षाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी संप केला होता. त्यावेळी तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीने देण्याचे मान्य केले होते. प्रत्यक्षात एक वर्ष लोटले तरीही अद्याप लॅपटॉप वितरण झालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.
कृषि विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना योजनांची माहिती ऑनलाईन संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपद्वारे भरावी लागते. विविध शासकीय अहवालांसह ॲग्रीस्टॅक, महाडीबीटी, पीएम किसान, नमो शेतकरी सन्मान सारख्या योजनांची माहितीही ऑनलाइन भरावी लागते. हे
कामकाज सुलभपणे पार पाडण्यासाठी लॅपटॉपची आवश्यकता आहे. सध्या क्षेत्रीय कर्मचारी वरील योजनांच्या कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरतात तसेच संकेतस्थळावरील माहिती क्षेत्रीय स्तरावर गोळा करून नंतर मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील संगणकावर भरण्यात येते. या कामासाठी लॅपटॉपची मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना मागील दहा वर्षांपासून करत आहे. गतवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर तेरा दिवसांचा संप कृषी कर्मचाऱ्यांनी केला होता त्यानंतर सहायक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी व कृषी अधिकारी यांना एकूण १३,२७५ लॅपटॉप खरेदी व त्यासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. याबाबतचा शासन आदेश नोव्हेंबर २०२५ मध्ये निघाला होता मात्र त्यानंतर अद्याप पर्यंत कृषी विभागाला कर्मचाऱ्यांना लॅपटॉप मिळालेला नाही.
त्यामुळे लॅपटॉपच्या प्रमुख मागणीसह कृषी विभागाचा नव्याने होत असलेला आकृतीबंध कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा नसावा. उप कृषी अधिकारी पदांची संख्या कमी करू नये. ऑनलाइन कामांचा भार कमी करावा. ऑनलाईन कामातील जाचक अटी कमी कराव्यात आदी विविध मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाईल, असा इशारा कृषी विभागाच्या कर्मचारी संघटनेने दिला आहे.
तर ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकणार
कृषी विभागाचे कर्मचारी गत दहा वर्षांपासून लॅपटॉपची मागणी करत आहेत. मागील वर्षी तेरा दिवसांचा संप केल्यानंतर तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी लॅपटॉप देण्याचे मान्य केले होते. वर्ष होत आले तरी आम्हाला लॅपटॉप मिळालेला नाही. ऑनलाइन काम आणि त्याच्या जाचक अटींमुळे कर्मचारी हैराण झाले आहेत, असा इशारा महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे यांनी दिला आहे.
तांत्रिक अडचणीमुळे दिरंगाई
काही तांत्रिक अडचणींमुळे लॅपटॉप वितरणाला दिरंगाई झाली आहे. पण, आता कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच लॅपटॉप दिले जातील. त्यांच्या अन्य मागण्यांबाबत संघटनेशी चर्चा केली जाईल, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
