मुंबई: नाशिक येथील टीसीएस कंपनीत झालेल्या प्रकारामुळे राज्याचा कामगार विभाग अलर्ट झाला आहे. आय टी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे धावपळीचे जीवन आणि त्यांना कार्यालयात येणाऱ्या समस्या यांचा सरकार अभ्यास करणार आहे. राज्यातील आयटी क्षेत्रातील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध उपाय योजना सुचविणारा एक अभ्यास गट स्थापन करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.
पुणे शहरातील हिंजवडी येथील आय टी पार्क मधील विविध आय टी कंपन्यांमध्ये असलेल्या कामगारांच्या समस्यांबाबत बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले होते.आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर होणारी जबरदस्ती, अन्यायकारक राजीनामा घेण्याची प्रक्रिया, एचआर नियमांमधील त्रुटी दूर करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहेत. या संदर्भात सखोल चौकशी करण्यासोबतच विशेष अभ्यास गट गठीत करण्यात यावा. आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर जबरदस्तीने राजीनामा देण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटनांची सखोल चौकशी करावी. एचआर नियम आणि कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या पद्धतींचे नियमन झाले पाहिजे. कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते असलेले आणि जुन्या कंपनीने सेवा बंद न केलेल्या कर्मचाऱ्यांच्याबाबत भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला कळविण्यात यावे. याबाबत पत्रव्यवहार करून अशा कर्मचाऱ्यांना मदत करावी.
शॉप ॲक्ट परवाना असलेल्या नोकऱ्या देणाऱ्या संस्थांची माहिती घ्यावी. अनेकदा या संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या नियुक्तीत अनियमितता आढळते. त्यामुळे अशा सर्व एजन्सींच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची सत्यता तपासण्यात यावी. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी. कामगार विभागाच्या सीआयएस प्रणालीचा वापर करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या तक्रारी कशा नोंदवता येतील, याची माहिती कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना फुंडकर यांनी दिल्या.
