रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांसह राज्यातील अनेक भागात पुरामुळे हाहाकार उडाला. रायगड, सातारा जिल्ह्यात तर निसर्गाचं रौद्र रुप बघायला मिळालं. अनेक गावांत… असंख्य घरांवर दरडी कोसळल्या… क्षणार्धात घरं असलेल्या ठिकाणी फक्त मातीचे ढिगारे दिसू लागले. असंख्य कुटुंबं उद्ध्वस्त झाली. अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावलं. पुराच्या तडाख्यामुळे दुःखात बुडालेल्या पुरग्रस्तांना छत्रपती उदयनराजे भोसले यांनी धीर दिला आहे. उदयनराजे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. तसंच या पोस्टमधून प्रशासनाला इशाराही दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेसबुक पोस्टमध्ये उदयनराजे भोसले काय म्हणाले?

“महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत. वित्तहानी कितीही झाली तरी आज ना उद्या ती भरून काढता येईल परंतु या परिस्थितीत आपण आपल्या परिवाराची काळजी घेऊन बाधित भागातील मदत कार्यात सहभाग घेणं आवश्यक आहे. तसेच मदत कार्य वेगाने व प्रामाणिकपणे सुरु करावे, मदत कार्य करताना जनतेला कमीत कमी त्रास होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी अन्यथा पुरग्रस्त जनतेचे श्राप-अश्राप भोगावे लागतील”, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

“संसदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्ली येथे असलो तरी देखील आमचं लक्ष पूरपरिस्थितीच्या पार्श्वभुमीवर पूर्णपणे महाराष्ट्र आणि विशेष करुन कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. या भागातील पूरस्थितीची आणि भौगोलिक परिस्थितीची माहिती आम्ही केंद्रीय गृहमंत्रालय आणि मदत मंत्रालयाला दिली असून, केंद्राकडून भरीव मदत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. पूर बाधित जिल्ह्यातील बाधितांना आणि अतिवृष्टीबाधित कुटुंबियांना भक्कम आधार देण्यासाठी आवश्यक ते सर्व मदत कार्य पोहोचलं पाहिजे यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत. महाराष्ट्रात विशेष करून कोकण, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये दगफुटीसारख्या सतत कोसळणाऱ्या पावसामुळे विविध कारणाने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. पूर येणं, दरडी कोसळणं, पुराच्या पाण्यात सर्वकाही वाहून जाणं, रस्त्यांवर पाणी साचून वाहतुक विस्कळीत होणं, अशा अनेक घटना घडल्या आहेत. वित्तहानी प्रचंड प्रमाणात झाली आहे. काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. सरकारनं मारलं आणि आभाळ फाटलं तर दाद कुठे मागायची असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे”, असं उदयनराजे म्हणाले.

पाऊसबळी १४५ वर : दरडी कोसळून तीन जिल्ह्यांत ७४ नागरिकांचा मृत्यू

“निसर्गाच्या आणि भोंगळ कारभाराचे असे अनेक फटके दुर्दैवाने गेल्या काही वर्षात काही अंतराने जरा जास्तच बसु लागले आहेत. त्यातच गेल्या सुमारे दीड वर्षापासून असलेल्या का नसलेल्या करोनानं जनता त्रासून गेली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानं जनजीवन पूर्णपणे विस्कटले आहे. संपूर्ण यंत्रणा कोलमडून गेली आहे. परंतु कोणीही खचून जावू नका, निसर्गानं संकटं दिली तरी त्यातून मार्ग काढण्याची जिद्द आणि विवेक देखील निसर्गच देत असतो. सर सलामत तो पगड़ी पचास वा उक्तीप्रमाणे आपले आणि आपल्या कुटुंबाचं बहुमूल्य जीवन महत्वाचे आहे म्हणून सावधानता बाळगुन संयम ठेवा. संसार पुन्हा उभा करता येईल, त्यासाठी आम्ही स्वतःतातडीने शक्य ते सर्वप्रकारचे मदतकार्य सुरु करीत आहोत”, अशा शब्दात उदयनराजे यांनी पुरग्रस्तांचं सांत्वन केलं आहे.

दरडींचा धोका असलेल्या गावांचे पुनर्वसन; दुर्घटनाग्रस्त तळयेच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

“राज्य सरकारच्या पाठीशी केंद्र सरकार आहे. विविध अशासकीय संस्था मदतकार्यासाठी पुढे आल्या आहेत. पूर येऊन गेलेल्या ठिकाणी रोगराई पसरू नये म्हणून आम्ही स्वच्छता दूतांचा समावेश असलेली पथकं तयार केली आहेत. आर्थिक, सहाय्याबरोबरच श्रम सहाय्य देखील पुरविण्याचा आराखडा आम्ही हाती घेतला आहे. शासन कार्यवाहीला पूरक ठरेल असे कार्य हाती घेण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत पूरस्थितीत सापडलेल्यांना आधार देण्याचे काम केले जाईल; निसर्गातील पाण्याला पुरेशी वाट मिळाली नाही तर आजुबाजूला पूरपरिस्थिती निर्माण होते. तर मग आपल्या कार्यक्षेत्रातील नद्या, नाले, ओहोळ हे अरुंद झाले आहेत काय याची शोध मोहीम प्रशासनाने हाती घेणं आवश्यक आहे. गेल्या काही दशकातील पर्जन्यमान आणि अलिकडच्या काळातील पर्जन्यमान याचा विचार करता, पाऊस पूर्वीपेक्षा कमी-कमी होत आहे. असे असताना अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमधून आपण बोध घेणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे”, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

“पूर परिस्थिती निर्माण होण्याची वास्तववादी कारणं प्रशासनानं जाहीर केली पाहिजेत. वाहून गेलेले पूल आणि रस्त्यांची कामे कशी झाली होती. त्या त्या वेळी क्वालिटी कंट्रोल टेस्टिंग झाले आहे काय? स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे काय? इत्यादी बाबतची संपूर्ण माहिती सध्याची आपत्कालीन परिस्थिती निवळल्यावर का होईना पण जनतेला द्यावी. पूर येण्याची जर मानवनिर्मित कारणे असतील, तर त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, तत्पूर्वी मदतकार्य वेगाने करावे अन्यथा जनतेचे श्राप-अश्राप सहन होणार नाहीत”, असा इशारा उदयनराजे यांनी शासन आणि प्रशासनाला दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra landslides floods update udayanraje bhosale facebook post maharashtra govt bmh
First published on: 25-07-2021 at 09:25 IST