मुंबई : अंदाज समितीच्या धुळे दौऱ्याच्या वेळी शासकीय निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळल्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात प्रकारांना पायबंद बसावा यासाठी नितीमूल्य समिती स्थापण्याची घोषणा दोन्ही सभागृहात झाली हाेती. अखेर या समितीचे नुकतेच गठन करण्यात आले असून शासकीय दौऱ्यावर असताना विधिमंडळ सदस्यांचे आचरण कसे असावे, यासंदर्भात समिती आचारसंहिता बनवणार आहे.
समितीच्या प्रमुखपदी भाजपचे आमदार चैनसुख संचेती आहेत. भाजपचे सुधीर मुनगंटीवार, विजयकुमार देशमुख, अमरीश पटेल, शिवसेना शिंदे गटाचे दिपक केसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील, रामराजे नाईक निंबाळकर, शिवसेना ठाकरे गटाचे सुनिल प्रभू, काँग्रेसचे अमीन पटेल हे समितीचे ८ सदस्य आहेत. आश्चर्य म्हणजे समितीचे प्रमुख चैनसुख संचेती आणि सदस्य सुधीर मुनगंटीवार हे त्या वादग्रस्त ठरलेल्या अंदाज समितीचे सदस्य होते.
मे महिन्यात विधिमंडळाच्या अंदाज समितीचा धुळे जिल्हा दौरा होता. अंदाज समितीचे प्रमुख शिंदे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर होते. तेव्हा धुळे शासकीय विश्रामगृहावर १ कोटी ८४ लाख रुपये आढळून आले हाेते. माजी आमदार अनिल गोटे यांनी सदर प्रकार उघडकीस आणला होता. समिती सदस्यांना देण्यासाठी ही रक्कम जिल्हातील शासकीय ठेकेदार व शिधा दुकानदार यांच्याकडून गोळा केली होती. ती रक्कम पाच कोटी होती, असा आरोप गोटे यांनी केला होता. याप्रकरणाचा खटला अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे.
याप्रकरणी अंदाजी समितीचे सचिव व अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना विधिमंडळाने निलंबित केलेले आहे. ही घटना उघडकीस येताच याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात पडले हाेते. तेव्हा सभापती राम शिंदे आणि अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी असे प्रकार भविष्यात उद् भवू नयेत यासाठी नितिमूल्य समिती स्थापन केली जाईल, असे सभागृहात जाहीर केले होते. अखेर ४ फेब्रुवारी रोजी आचरण समितीचा आदेश जारी केला आहे.
दौऱ्याचे नियम बनणार :
राज्य विधिमंडळाच्या २५ समित्या आहेत. पैकी २० समित्या राज्यात दौऱ्यावर जातात. एका समितीमध्ये सुमारे ३० आमदार असतात. सभागृहात सदस्यांसाठी वर्तनाचे लिखीत नियम आहेत. आता शासकीय दौऱ्याचे नियम बनवले जाणार असून समितीमधील आमदारांना ते पाळावे लागणार आहेत. राज्यसभेत १९९७ पासून आणि लोकसभेत २००० पासून नितीमूल्य समिती स्थापन करण्यात येते.

