नांदेड: तीन दिवसांच्या नांदेड दौर्‍यावर आलेल्या विधिमंडळ अंदाज समितीने गुरुवारी (दि.९) रोजी दूपारपर्यंत जिल्हा नियोजन समिती सभागृहात विभागप्रमुखांची झाडाझडती घेतल्यानंतर समिती अध्यक्षांसह सदस्य जिल्हा दौर्‍यावर निघाले. विशेष म्हणजे त्यांचा दौरा माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातून सुरू झाला.

नांदेड जिल्ह्यात विविध विकास कामांवर शासनाने दिलेला निधी प्रशासनाने व्यवस्थित खर्च केला किंवा नाही, यासाठी महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती बुधवारी (दि.८) समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वात नांदेडला दाखल झाली. बुधवारचा दिवस त्यांनी नियोजन समितीतील सभागृहात संयुक्त बैठक घेऊन घालवल्यानंतर गुरूवारी दूपारपर्यंत त्यांनी एका एका विभागाचा आढावा घेतला.

या आढाव्यादरम्यान विभागावर झालेला खर्च, परत गेलेला निधी याबाबतची चौकशी करत अनेक मुद्यांवरून विभागप्रमुखांना धारेवर धरत चांगलीच झाडाझडती घेतली. त्यानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास ही समिती नांदेड शहराबाहेर पडली. विशेषतः या समितीने माजी मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर मतदारसंघातील मुदखेड तालुक्यातून आपला अंदाज दौरा सुरू केला.

या दौर्‍यात त्यांनी चिखली या गावाच्या जिल्हा परिषद शाळेला अचानक भेट दिली. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी समिती अध्यक्ष व सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. याच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात देण्यात येणारा हिरवा चना नोंदवहीत नमूद असताना पांढरा चना दिल्याचे आढळून आले. तसेच या शाळेतील स्वच्छतागृह बंद असल्याचे दिसून आले. या नंतर अंदाज समिती अध्यक्ष व सदस्यांनी येळी घाटाला भेट दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आढळून आला.

या प्रकरणात कडक कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिल्या असल्याचे सांगण्यात आले. या भेटीदरम्यान भोकर मतदारसंघात समितीचे अध्यक्ष आ.अर्जुन खोतकर, आ.सदाभाऊ खोत, आ.हेमंत पाटील, आ.आनंद बोंढारकर यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते. यानंतर ही समिती नायगाव तालुक्याच्या दिशेने रवाना झाली.

(जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विभागप्रमुखांची समिती अध्यक्ष व सदस्यांनी झाडाझडती घेतली.)