अहिल्यानगर: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ‘एल-निनो’च्या प्रभावामुळे मान्सूनवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यातील पशुधन संरक्षण व संभाव्य चारा टंचाई टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यात सरासरी पर्जन्यमानात घट होण्याची शक्यता असून हिरव्या चाऱ्याचे प्रमाण कमी होऊन टंचाई निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा नियोजन व विकास समितीमार्फत नियोजन करून चारा टंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
मका, ज्वारी व बाजरीसारख्या चारा पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच राज्य चारा विकास महामंडळाच्या माध्यमातून चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. दि. ४ मे पूर्वी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन करण्यात येत असून चारा उत्पादन वाढीसाठी शाश्वत शेती पद्धती, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, टीएमआर व कडबाकुट्टी यांसारख्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पशुधन संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करावा, यामध्ये नवीन पाणलोट क्षेत्रांमध्ये चारा लागवडीसाठी विशेष मोहिम राबविणे, टंचाईच्या काळात चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना करणे व भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी चारा साठवणुकीचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
पशुसंवर्धन विभागाने जिल्हा उपआयुक्त व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या मोहिमेला प्राधान्य द्यावे व पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पशुधन संरक्षण ही सर्वोच्च प्राथमिकता असून कोणत्याही परिस्थितीत पशुपालकांच्या पाठीशी विभाग उभा राहिल, असेही त्यांनी सांगितले.
पशुधनासाठी खबरदारीचे उपाय
संभाव्य उष्णतेची लाट व प्रतिकूल हवामानाचा परिणाम लक्षात घेऊन पशुधनाचे संरक्षण व व्यवस्थापनासाठी पशुपालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. पाटील यांनी केले आहे. वाढत्या तापमानामुळे पशुधनावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी सर्व पशुवैद्यकीय संस्थांनी सतर्क राहावे, पशुपालकांनी जनावरांसाठी स्वच्छ व भरपूर पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, संतुलित आहार व उष्णतेपासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था, जनावरांना सकाळी व संध्याकाळीच कामासाठी वापरणे तसेच दुपारच्या उष्णतेपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या काळात गोठ्यांवर उष्णता रोखणारे छत बसविणे, पंखे किंवा फवारणीद्वारे थंडावा राखणे उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करावेत. घटसर्प, फुफ्फुसदाह व अँथ्रॅक्स यांसारख्या रोगांविरुद्ध लसीकरण व जंतनाशक उपाययोजना करणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
