Ladki Bahin Yojana e-KYC last date April 30: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑनलाईन ग्राहक ओळख (ई केवायसी) प्रक्रियेसाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. ई केवायसी साठी महिला विकास विभागाने आतापर्यंत तीन वेळा मुदतवाढ दिली आहे. आता ३० एप्रिल ही शेवटची मुदत असणार आहे. राज्यातील २६ लाख ३४ हजार लाडक्या बहीणींनी ई केवायसी केलेली नाही. काही अपवाद वगळता २६ लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची चिन्हे आहेत.

महायुती सरकारची लाडकी बहीण ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीला चांगला फायदा झाला. या योजनेची सध्या पडताळणी जोरात सुरु आहे. दोन कोटी ४७ लाख लाभार्थींपैकी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. अपात्र ठरलेल्या लाडक्या बहीणींकडून त्यांना देण्यात आलेली रक्कम वसुल न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. १२ हजार ४१५ सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे उघडीस आले आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. या कर्मचाऱ्यांनी घेतलेला लाभ सरकार वसुल करणार आहे. तेवढयाच पुरुषांनी या योजनेचा फायदा उचलला आहे.

चुकीची माहिती देणारे, अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न, सरकारची फसवणूक करणाऱ्या अशा लाभार्थींकडून जवळपास १६५ कोटी रुपये लाभ वसुल केले जाणार आहेत. या योजनेची पडताळणी शेवटच्या टप्यात आहे. ३० एप्रिल रोजी बॅक बंद होण्याच्या वेळेपर्यंत ही पडताळणी सुरु राहणार आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती, उष्णतेची लाट अशा कारणास्तव ई केवायसी करण्याची शेवटची (एप्रिल अखेर) संधी लाडक्या बहीणींनी देण्यात आली आहे. २६ लाख ३४ हजार लाडक्या बहीणींनी आतापर्यंत ई केवायसी केलेली नाही. ह्या लाडक्या बहीणींकडे ई केवायसी करण्यास पुरेशी कागदपत्र नाहीत असे आढळून आले आहे. या लाडक्या बहीणी शेवटच्या चार दिवसात ई केवायसी पूर्ण करण्याची शक्यता कमी आहे. एप्रिल अखेर या योजनेची सद्यस्थिती स्पष्ट होणार आहे. संवेदशील योजना म्हणून सरकारने या योजनेबद्दल ‘लपवाछपवी’ केली आहे. एप्रिल नंतर काही अपवाद वगळता जवळपास २६ लाख लाडक्या बहीणी अपात्र ठरण्याची शक्यता महिला व बाल विकास विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.