कोकणतील सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह आसपासच्या भागात वादळीवारे आणि विजांच्या कडकडाटासह पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड उष्म्यासह बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे राज्यात पुढील चार दिवस प्रचंड उष्मा, ढगाळ वातावरण आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा तिहेरी फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सांगलीत वादळी वाऱ्यासह सोमवारी रात्री पाऊस पडला. तसेच मंगळवारी सांगलीच्या काही भागात उष्म्यासह पाऊस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दिवसभर पाऊस होता.

देशाच्या वायव्येकडील राज्यांत उष्णतेची तीव्र लाट असून तेथून महाराष्ट्राकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांच्या प्रवाहामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात मंगळावारी (५ एप्रिल) काही भागांत उष्णतेची लाट कायम होती. तर, उर्वरित महाराष्ट्राचे तापमान सरासरीच्या पुढेच आहे. परिणामी राज्यात उन्हाचा चटका कायम आहे.

दरम्यान, सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. याबरोबरच पश्चिम विदर्भ ते तामिळनाडू या भागापर्यंत मराठवाडा आणि कर्नाटक पार करून द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. तसेच देशात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. समुद्रातून काही प्रमाणात बाष्पही येत आहे. परिणामी दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी उन्हाचा चटका आणि त्यानंतर ढगाळ वातावरणासह पावसाळी स्थिती असे विचित्र वातावरण राज्यात अनेक ठिकाणी आहे.

राज्यातील मंगळवारची स्थिती…

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा या भागांत उष्णतेची लाट आहे. मंगळवारी अकोल्यात ४४.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. अमरावती ४२ अंश सेल्सिअस, तर वाशिम, वर्धा, बुलढाणा आदी भागांत तापमानाचा पारा ४१ अंशांपुढे होता. मराठवाडयातील परभणीत ४२.३ अंश, तर औरंगाबाद, नांदेडमधील तापमानाचा पारा ४० ते ४१ अंशांवर आहे. मध्य महाराष्ट्रात नगर आणि जळगावमध्ये कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. नाशिक आणि सोलापूरमध्ये ४० ते ४१ अंश, तर पुण्यात तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. मुंबई परिसरासह कोकण विभागात कमाल तापमान सरासरीच्या पुढे आहे. रात्रीचे किमान तापमान सध्या सरासरीच्या पुढे जात असून, त्यामध्ये राज्यभर वाढ होण्याची शक्यता आहे.

पावसाचा अंदाज…

दिवसा ऊन किंवा ढगाळ वातावरणामुळे प्रचंड उष्म्यासह राज्यात पुढील दोन ते तीन दिवस काही भागांत पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि विदर्भातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आदी जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे. परिणामी दिवसाचे कमाल तापमान किंचित कमी होणार असले, तरी किमान तापमानात वाढ होऊन रात्रीचा उकाडा वाढण्याची शक्यता आहे.