मुंबई : सरकारी हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे चर्चेत असलेली महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक आज, रविवारी होत आहे. परिषदे ९ जागांसाठी ६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. परिषदेचे नोंदणीकृत आणि नोंदणीचे नूतनीकरण केलेले सुमारे १ लाख ४० हजार मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम, १९६५ मधील तरतुदीनुसार वैद्यकीय परिषदेतील नऊ सदस्यांची निवड राज्यातील नोंदणीकृत आणि नोंदणीचे नूतनीकरण केलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांमार्फत करण्यात येते. या निवडणुकीसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी, जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणांतर्गत निवडणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हानिहाय निवडणूक केंद्र आणि मतदारयादी यांचा तपशील महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या वेबसाइटवर (www.maharashtramedicalcouncil.in) उपलब्ध करण्यात आला आहे.
२६ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ अशी आहे. या निवडणुकीची मतमोजणी २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल. मतमोजणी हाफकिन प्रशिक्षण, संशोधन आणि चाचणी संस्था, परळ येथे करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली.
