संतोष मासोळे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार अमरीश पटेल यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजपचा जिल्ह्यातील खुंटा अधिक मजबूत झाला आहे. पटेलांच्या विरोधात काँग्रेसने नगरसेवक गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर केली तेव्हाच विरोधकांनी पटेलांपुढे सपशेल नांगी टाकल्याचे उघड झाले होते. महाविकास आघाडीने पटेलांपुढे सपशेल हार पत्करल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पटेल यांना तगडे आव्हान देऊ शकेल, असा  जिल्ह्यात एकही नेता नसल्याचे पुन्हा या बिनविरोध निवडीमुळे सिद्ध झाले आहे.

पटेल हे विधान परिषदेत चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील यापुढील राजकारणाची दिशा ठरविण्याची मोठी जबाबदारीही पटेलांवर असणार आहे. प्रदीर्घ काळापासून पटेल हे जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व राखून आहेत. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी १९८५ मध्ये शिरपूर-वरवाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणून राजकारणाला सुरूवात केली. सलग १२ वर्षे ते नगराध्यक्ष राहिले. १९९०, १९९५, १९९९ तसेच २००४ अशा सलग चार निवडणुकींत ते काँग्रेसकडून शिरपूर विधानसभा मतदार संघातून निवडून गेले.

शालेय शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा व युवक कल्याण विभागाचे मंत्रिपद भूषविले. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विधानसभेसाठी शिरपूर तालुका अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्यानंतरही पटेलांनी खास मर्जीतील विश्वासू काशिराम पावरा यांना दोन वेळा आमदार म्हणून निवडून आणत शिरपूर तालुक्यावर आपली पकड कायम ठेवली.

पटेल हे काँग्रेसमध्ये असतानाच त्यांची २००९ मध्ये आमदारपदी बिनविरोध निवड झाली होती. २०१५ मध्येही काँग्रेसच्या तिकिटावर सलग दुसऱ्यांदा ते विधान परिषदेचे आमदार झाले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरली. त्यानंतर विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला. पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी करीत काँग्रेसच्या अभिजित पाटील यांचा तब्बल ३३२ मते मिळवून पराभव केला होता. त्या निवडणुकीत दोन्ही जिल्हे मिळून ४३७ मतदार होते. यात धुळे जिल्ह्यातून २३७ तर, नंदुरबार जिल्ह्यातील २०० मतदार होते. प्रत्यक्षात ३३४ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यातून भाजपकडे २०४ मते असताना पटेल यांनी तब्बल ३३२ मते मिळवली, पाटील यांना अवघी ९८ मते मिळाली होती.

प्रत्यक्षात काँग्रेसकडे १५६, राष्ट्रवादीकडे ३४ आणि शिवसेनेकडे २० असे २१० मतदान असताना आघाडीच्या पाटील यांना त्यांच्याच पक्षाची पूर्ण मते मिळाली नाही. त्यांनी पटेलांनाच साथ दिल्याचे दिसून आले होते. यातून पटेलांची जिल्ह्याच्या राजकारणावरील पकड किती मजबूत आहे, याचीच प्रचीती आली होती.

विरोधात उमेदवारच नाही

विधान परिषदेच्या निवडणुकीतही भाजपतर्फे अमरीश पटेलांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु, महाविकास आघाडीला पटेलांविरुद्ध लढण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत तगडा उमेदवार मिळत नव्हता. अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी काँग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी यांना पटेलांच्या विरोधात उमेदवारी देऊन महाविकास आघाडीने स्वत:चे हसे करून घेतले. कारण, पटेलांचे राजकीय वर्चस्व आणि साम्राज्य पाहता वाणी हे सामान्य भासत होते. यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर होताच पटेलांचा विजय निश्चित मानला जात होता. गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतदारांनीही पटेलांना मतदान केले होते. यामुळे पटेलांना शंभराहून अधिक मते मिळाली होती. या निवडणुकीतही त्याची पुनरावृत्ती होईल, अशी भीती महाविकास आघाडीला होती. त्याचाच परिणाम असा झाला की, राज्याचे आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासारखे तगडे नेते विरोधात असतानाही अमरिश पटेल हे पुन्हा विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra mlc polls bjp amrishbhai patel wins dhule nandurbar seat zws
First published on: 01-12-2021 at 01:50 IST