मुंबई : पावसाअभावी राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. ऑगस्ट मध्यापासून आजपर्यंत राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये २० दिवसांपेक्षा जास्त दिवस पावसाचा खंड पडला आहे. त्यापैकी उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांत ३१ दिवसांपासून जास्त दिवस पावसाने दडी मारली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सर्वाधिक ३८ दिवसांचा सलग पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. पावसाने दडी मारलेल्या भागातील खरीप वाया जाण्याच्या मार्गावर आहे.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत राज्यातील १९ जिल्ह्यांतील ८३ तालुक्यांमध्ये पावसाचा दीर्घकालीन खंड नोंदविण्यात आला आहे. यापैकी २३ तालुक्यांमध्ये ३० दिवसांपेक्षा अधिक, तर १८ तालुक्यांमध्ये २५ ते ३० दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे. उर्वरित ४२ तालुक्यांमध्ये २० ते २५ दिवसांचा पावसाचा खंड पडला आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सर्वाधिक ३८ दिवसांचा सलग पावसाचा खंड पडला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे संबंधित भागातील पिके हातची गेली आहेत. 

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक तीव्र खंड

विभागनिहाय पाहता, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या चार जिल्ह्यांतील १५ तालुके दीर्घ पावसाच्या खंडाच्या यादीत आहेत. यापैकी १२ तालुक्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक खंडाची नोंद झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर आणि इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण व फलटण, सांगलीतील आटपाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, बार्शी आणि मोहोळ या भागांना पावसाच्या मोठ्या खंडाचा फटका बसला आहे. बारामती, दौंड, पुरंदर, फलटण, माण आणि आटपाडी येथे ३७ दिवसांचा सलग खंड नोंदविला गेला आहे. इंदापूर व माळशिरस येथे ३४ दिवस, सांगोला येथे ३३ दिवस, तर बार्शी आणि मोहोळ येथे ३१ दिवसांचा खंड पडला.

उत्तर महाराष्ट्रातही गंभीर स्थिती

उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे या चार जिल्ह्यांतील ३१ तालुके या अहवालात समाविष्ट आहेत. यापैकी १३ तालुक्यांत २० ते २५ दिवस, ११ तालुक्यांत २५ ते ३० दिवस आणि सात तालुक्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि येवला येथे ३७ दिवसांचा, तर कळवण व देवळाली येथे ३५ दिवसांचा खंड राहिला. अहिल्यानगरमधील संगमनेर येथे ३५ दिवस, शेवगाव येथे ३४ दिवस, तर कर्जत येथे सर्वाधिक ३८ दिवसांचा खंड नोंदविण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल, रावेर आणि यावल येथे प्रत्येकी २६ दिवसांचा पावसाचा खंड नोंदविण्यात आला आहे. धुळे आणि शिंदखेडा येथेही २६ दिवसांचा खंड आहे.

मराठवाड्यात १७ तालुक्यांना फटका

मराठवाड्यातील बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि जालना या पाच जिल्ह्यांतील १७ तालुक्यांमध्ये दीर्घ पावसाचा खंड नोंदविण्यात आला. त्यापैकी आठ तालुक्यांत २० ते २५ दिवस, सहा तालुक्यांत २५ ते ३० दिवस आणि तीन तालुक्यांत ३० दिवसांपेक्षा अधिक खंड राहिला. बीडमधील गेवराई येथे ३४ दिवसांचा खंड नोंदविण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण आणि धाराशिवमधील परांडा येथेही ३४ दिवसांचा सलग खंड राहिला. परळी येथे ३० दिवस, मानवत येथे ३० दिवस, आष्टी येथे २९ दिवस आणि धारूर येथे २५ दिवसांचा खंड पडला आहे.

विदर्भात २० तालुके प्रभावित

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा आणि नागपूर या सहा जिल्ह्यांतील २० तालुके पावसाच्या दीर्घ खंडाने प्रभावित झाले आहेत. यातील तब्बल १९ तालुक्यांत २० ते २५ दिवसांचा खंड, तर एका तालुक्यात ३० दिवसांपेक्षा अधिक खंड नोंदविला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे ३७ दिवसांचा खंड नोंदविण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यातील पातूर येथे २३ दिवस, अकोला व मूर्तिजापूर येथे प्रत्येकी २१ दिवस, तर बाळापूर व बार्शीटाकळी येथे प्रत्येकी २० दिवसांचा खंड आहे. अमरावतीतील भातकुली येथे २२ दिवसांचा, तर दर्यापूर येथे २१ दिवसांचा खंड नोंदविला गेला आहे.

२३ तालुक्यांत ३० दिवसांहून जास्त खंड

पुण्यातील शिरूर आणि अहिल्यानगरमधील कर्जतमध्ये ३८ दिवसांचा सलग खंड पडला आहे. बारामती, दौंड, पुरंदर, फलटण, माण, आटपाडी, येवला,  नांदगाव आणि खामगावमध्ये ३७ दिवसांचा आणि कळवण, देवळाली, संगमनेरमध्ये ३५ आणि परांड्यात ३४ दिवसांचा खड पडला आहे.

२५ ते ३० दिवसांचा खंड असलेले १८ तालुके

२५ ते ३० दिवसांचा खंड बीडमधील परळी व आष्टी, परभणीतील मानवत, अहिल्यानगरमधील राहाता, छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती संभाजीनगर तालुका, धुळे व शिंदखेडा, जळगावमधील अमळनेर, भुसावळ, मुक्ताईनगर, एरंडोल, रावेर व यावल, जालन्यातील बदनापूर, नाशिकमधील मालेगाव, साताऱ्यातील खटाव, बीडमधील धारूर आणि नाशिकमधील बागलाण यांचा समावेश आहे. दरम्यान, ४२ तालुक्यांत २० ते २५ दिवसांचा खंड पडला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, बीड, सातारा, वाशिम, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूरमधील तालुक्यांचा समावेश आहे.