लोकसत्ता वृत्तविभाग
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर : एकीकडे पावसाने ओढ दिल्याने ग्रामीण भागातील नद्यानाले कोरडेठाक पडत असताना मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरसारख्या शहरांत मात्र घडीभरच्या पावसात पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. पायाभूत विकासाच्या नावाखाली शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा धडाका, जागोजागी सुरू असलेली सिमेंटची बांधकामे यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य निचराच होत नसल्यामुळे रस्त्यांवर पाणी तुंबून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडत आहेत.
यंदा मोसमी पावसाने जूनच्या तिसर्या आठवड्यानंतर मुंबई, ठाण्यात हजेरी लावली. मात्र पहिल्याच पावसात या शहरांतील रस्त्यांवर आणि रेल्वेरुळांवर पाणी साचले. त्यानिमित्ताने नालेसफाईचा मुद्दा केंद्रस्थानी आला. मात्र, वाढते काँक्रीटीकरणही पाणी साचण्याला जबाबदार असल्याचा सूर आता उमटू लागला आहे. काँक्रीटच्या रस्त्यांवरून पाणी उताराच्या दिशेने वाहत जाते आणि सखल भागात साचून राहते. त्यामुळेच प्रशासनांकडून दरवेळी उपाययोजनांचा दाखला दिला गेला तरी, प्रत्यक्ष विकासकामांचा अतिरेकच या समस्येच्या मुळाशी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
‘मुंबई-पुण्यासारख्या शहरात योग्य नियोजन होत नसल्याने रस्त्यांवर, त्याच्या आजूबाजूला पाणी तुंबलेले दिसते असे मत ज्येष्ठ जलतज्ज्ञ विजय परांजपे यांनी व्यक्त केले. मोठ्या इमारतींचा पाया सिमेंटवर उभा राहिलेला असतो. त्यामुळे नैसर्गिक नाले बुजतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. बांधकामामुळे माती दाबली गेल्याने तिची पाणी झिरपविण्याची क्षमता आणखी घटते. परिणामी, भूजलाचे पुनर्भरण कमी होत असताना घरगुती, औद्योगिक आणि इतर गरजांसाठी भूजलाचा उपसा वाढत राहतो. त्यामुळे भूजल पातळी सातत्याने खाली जाते. पावसाचे पाणी जमिनीत न मुरता अल्पावधीत मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यामुळे शहरी भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता वाढते असे केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ उपेंद्र धोंडे यांनी स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा हे अशा अकस्मात पूरपरिस्थितीचे ताजे उदाहरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात हा परिसर पाण्याखाली जातो आणि रस्त्यांवरील पाण्याचे लोंढे आजूबाजूच्या वसाहतींमध्ये शिरून तेथेही पूरस्थिती निर्माण होते. ठाण्यात बुधवारीही पावसामुळे शिळफाटा परिसर जलमय झाला होता. उपराजधानी नागपूरमध्ये २३ सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टीने सिमेंटीकरणाची समस्या अधोरेखित केली होती. त्यावेळी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यात बचावकार्य करण्यासाठी लष्कराला पाचारण करावे लागले होते. त्या पूरस्थितीनंतर नागपूरमधील शंकरनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत नागरिकांनी प्रस्तावित सिमेंट रस्त्याच्या विरोधात भूमिका घेतली. काम रोखले. ५०० मीटरच्या रस्त्यामुळे परिसरातील घरांना पूरस्थितीचा सामना करावा लागू शकतो अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली होती.
वाढत्या शहरीकरणामुळे पाणलोट क्षेत्राच्या नैसर्गिक रचनेत आणि जलचक्रात मोठे बदल होतात. रस्ते, इमारती, पूल, वाहनतळ आदी पक्क्या बांधकामांमुळे नैसर्गिक मोकळ्या जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याची क्षमता घटते. पाणलोट क्षेत्रातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाहही बदलतो. – उपेंद्र धोंडे, केंद्रीय भूजल मंडळाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ
झाडांनाही धोका
मुंबई शहर आणि उपनगरांत हरित क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. रस्त्यालगत असलेल्या झाडांभोवती काँक्रीटीकरण झाल्याने झाडांची मुळे विस्तारण्यास वाव मिळत नाही. परिणामी झाडे कमकुवत होतात. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या पाहणीत मुंबईतील ३५ पेक्षा अधिक रस्त्यांवरील ८३२ झाडांपैकी ३२१ झाडांभोवती पुरेशी जागाच नसल्याचे आढळले. झाडांच्या मुळांच्या भागातून काँक्रीट, डांबर, पेव्हर ब्लॉक आणि मलबा पूर्णपणे काढणे, झाडांभोवती मोकळी व पाण्याची झिरप होऊ शकेल, अशी मातीची जागा ठेवणे, तसेच पुन्हा काँक्रिटीकरण होऊ नये यासाठी योग्य सीमांकन करणे आवश्यक आहे, असेही अहवालात म्हटले आहे. पालिकेकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याने मंगळवारीच उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. चेंबूर येथे झाड कोसळून घडलेली दुर्घटना मंगळवारीच घडली, हे विशेष.
