Mumbai Maharashtra Breaking News : मुंबई आणि महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन दिवस कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज दिवसभरात पावसाच्या अपडेट जाणून घेऊ. त्याशिवाय राज्याच्या राजकारणातही मोठ्या हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपापल्या परिने तयारीला लागले आहेत. भाजपाकडून आज पुण्यात पक्ष संघटनेची बैठक होणार आहे. तर शरद पवारदेखील राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेऊन विधानसभेचा आढावा घेणार आहेत. तसेच पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शरद पवार गटात प्रवेश घेतल्यामुळे अजित पवार पिंपरी चिंचवडचा दौरा करून संघटनेची बैठक घेणार आहेत. दरम्यान आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचीही चर्चा आहे. शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याप्रकरणी त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांना रायगडमधून अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांचे वडील दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आज दिवसभरात आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे.