Maharashtra Breaking News : राज्यभरातील सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघात मोर्चेबांधणी आणि सर्वेक्षणं चालू आहेत. भाजपाला लोकसभा निवडणुकीत मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलं आहे. अशातच, भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (२१ जुलै) पुण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेनंतर आता शिवसेनेचा ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आक्रमक झाला आहे. या पक्षातील नेत्यांच्या अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर आज मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. या सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. पावसाच्या बातम्यांवरही आपलं लक्ष असेल.