सध्या देशात कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांद्याच्या दरानं सध्या शंभरी गाठली आहे. अशातच नुकतीच कांदा चोरीची मोठी घटना नुकतीच घडली आहे. नाशिकवरून मध्य प्रदेशात पाठवण्यात आलेला तब्बल २० ते २२ लाख रूपयांचा कांदा चोरण्यात आला. मध्य प्रदेशात जात असलेल्या ट्रकमध्ये ४० टन पेक्षा अधिक कांदा होता. दरम्यान, या घटनेनंतर मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात रिकामा ट्रक सापडला असल्याची माहिती समोर आली आहे.

११ नोव्हेंबर रोजी नाशिकमधून मध्य प्रदेशातील गोरखपूर येथे ४० टन कांदा घेऊन ट्रक रवाना झाला होता. २२ नोव्हेंबर रोजी तो ट्रक गोरखपूरला पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु तो ट्रक आपल्या नियोजित ठिकाणापर्यंत पोहोचलाच नाही, अशी माहिती कांदा विक्रेते प्रेम चंद शुक्ला यांनी दिली. याप्रकरणी शुक्ला यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. मध्य प्रदेशातही कांद्याच्या दरानं शंभरी गाठली आहे.

रिकामा ट्रक तेंदू पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात सापडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली. सध्या महाराष्ट्रातही सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये घाऊक बाजारातील कांद्याच्या दराने शंभरी गाठली. परिणामी, किरकोळ बाजारात कांद्याची विक्री उच्चांकी १२० ते १२९ रुपये दराने होत आहे. दरवाढीमुळे गृहिणींचे अंदाजपत्रक पुरते कोलमडले असून कांद्याने डोळ्यांत पाणी आणले आहे.

साधारणपणे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात नवीन कांद्याची आवक सुरू होते. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत राज्यात पाऊस सुरू होता. कांदा उत्पादक भागाला पावसाने झोडपून काढल्याने कांद्याच्या पिकाचे नुकसान झाले. शेतात कांदा भिजल्याने तो फेकून देण्याची वेळ आली. अवेळी झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे पीक हाती येण्यापूर्वीच शेतात खराब झाले. जवळपास ९० ते ९५ टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले, असे सांगण्यात येते.

मुंबईतील किरकोळ भाव

जुना कांदा – ११० ते १२९ रुपये

नवीन कांदा-  ७० ते ९० रुपये