महाराष्ट्रात पहिल्यांदाच नव्या धर्मांतरण विरोधी कायद्याचा वापर करत पुणे शहर पोलिसांनी २२ वर्षांच्या एका तरुणावर गुन्हा नोंदवला आहे. २२ वर्षांच्या या तरुणाने त्याच्या बायकोला धर्मांतर करण्यासाठी सांगितलं होतं. ही मुलगी अल्पवयीन आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर दोन दिवसांनी पोलिसांनी आणखी एक प्रकरणात आणखी एक गुन्हा दाखल केला. ज्यामध्ये ब्रिटनचा नागरिक आणि ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया (OCI) कार्ड धारक असलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. धार्मिक उत्सवाचं आयोजन करुन हा माणूस लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करत होता असा आऱोप त्याच्यावर आहे.

पुण्यातलं प्रकरण नेमकं काय?

३१ जुलै २०२६ ला महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ ला अधिसूचित करण्यात आला. तर १ ऑगस्ट २०२६ पासून तो राज्यात लागू झाला. ज्यानंतर ५ ऑगस्ट रोजी या कायद्याच्या अन्वये पुण्यातल्या २२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हा तरुण उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने तिला धर्मांतर करण्यास सांगितलं होतं, त्यासाठी तो तिला सक्ती करत होता.

पॉक्सो कायद्यातील तरतुदीही लागू

या प्रकरणातील अल्पवयीन मुलगी कथित पीडित असल्याने पोलिसांनी POCSO कायद्यातील तरतुदीही लागू केल्या आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी हे दोघेही उत्तर प्रदेशातील एकाच गावातील रहिवासी आहेत. दोघांमध्ये संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर ते कर्नाटकात गेले. तेथून पुढे ते पुण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांचा आरोप आहे की, त्या तरुणाने अल्पवयीन मुलीला धर्मांतर करण्यास सांगितले. धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी कथितरीत्या कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या माध्यमांचा वापर करण्यात आला, हे एफआयआर आणि पुढील तपासातून स्पष्ट होईल.

पोलिसांनी काय सांगितलं?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार या तरुणाच्या विरोधात कलम ३ आणि ९ (२) च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायद्यातील कलम ३ नुसार दबाव टाकणं, फसवणूक करणं, आमिष दाखवणं, चुकीची माहिती देणं, बळाचा वापर करणं, धमकी देणं किंवा चुकीच्या पद्धतीने प्रभाव टाकणं किंवा धर्मांतारासाठी मदत करणं किंवा प्रोत्साहित करणं या गुन्ह्यांचा समावेश होतो.कलम ९(२) नुसार, कलम ३ अंतर्गत केलेल्या गुन्ह्यात अल्पवयीन व्यक्तीचा समावेश असल्यास कमाल सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.