Latest Marathi News, 13 June 2025 : राज्याच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध विषयांवरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यातच कर्जमाफीच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रहारचे नेते बच्चू कडू हे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी उपोषणाला बसले आहेत. यातच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करत आहेत.

असं असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवरही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, या बरोबरच हवामान विभागाने महाराष्ट्रातील विविध भागात पुढील चार-पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली आहे. यासह राज्यातील सर्व राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Breaking News Today : राज्यातील राजकीय व इतर घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

16:27 (IST) 14 Jun 2025

शेतकरी कर्जमाफीवर समिती नेमण्यापेक्षा निर्णय घ्यावा : विजय वडेट्टीवार

प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या मागण्यांबाबत ठोस कारवाई करावी, पुन्हा आश्वासन देऊ नये असे वडेट्टीवार म्हणाले. ...सविस्तर बातमी
14:41 (IST) 14 Jun 2025

नीटमध्ये राजस्थानचा महेश कुमार अव्वल, राज्यातील कृष्णांग जोशी देशात तिसरा

नीट २०२५ चा निकाल जाहीर झाला असून राजस्थानचा महेश कुमार प्रथम आला आहे. महाराष्ट्रातील कृष्णांग जोशी तिसऱ्या क्रमांकावर असून देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. ...वाचा सविस्तर
18:17 (IST) 13 Jun 2025

"देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं", चंद्रशेखर बावनकुळे यांचं आवाहन

बच्चू कडू यांच्या आंदोलनाबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, गेल्या दोन ते चार दिवसांपासून मी बच्चू कडू यांच्या संपर्कात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही बच्चू कडू यांच्या संपर्कात आहोत. आम्ही त्या विभागाशी संबंधित मंत्र्‍यांच्या संपर्कात आहोत. तसेच देशातील परिस्थिती पाहता बच्चू कडू यांनी आंदोलन मागं घ्यावं असं आमचं त्यांना आवाहन आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

16:59 (IST) 13 Jun 2025

“निर्णय घ्या, नाहीतर आमची अंत्ययात्रा काढा”, बच्चू कडूंचा निर्वाणीचा इशारा, मंत्री संजय राठोडांची विनंती धुडकावली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गेल्या ८ जूनपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरूकूंज मोझरी येथे उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, पण ती धुडकावून कडू यांनी जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त केला.

सविस्तर वाचा

15:18 (IST) 13 Jun 2025

"इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी कोण? हे मला...", संजय शिरसाट यांची टीका

समाज कल्याणमंत्री संजय शिरसाट यांच्या गैरव्यवहारांची माहिती पुराव्यासह देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल यांनी वेळ द्यावा, अशी विनंती करणारे पत्र माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पाठविले आहे. दरम्यान शिरसाट यांच्या गैरव्यवहाराची कागदपत्रे जलील यांनी गुरुवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना भेटून दिली. या सर्व आरोपांबाबत शिरसाट म्हणाले की, "उठावानंतर जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांना अंगाव घेण्याचं काम हे मी केलं. त्यामुळे मी टार्गेट व्हावं असं महाविकास आघाडीला वाटत असले. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याबाबत मला जास्त बोलायचं नाही. असे आरोप करणारे लोक जास्त काळ टीकत नसतात. इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी कोण हे मला माहित आहे", असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

14:23 (IST) 13 Jun 2025

"एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना कशामुळे झाली? कोणती कारणं...", जयंत पाटील यांचा सवाल

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवरही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावरजयंत पाटील यांनी म्हटलं की, "अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमानाची दुर्घटना कशामुळे झाली? कोणती कारणं या घटनेला जबाबदार आहेत? व्यवस्थेची जबाबदारी असेल तर तशी जबाबदारी निश्चित करता येईल. मला वाटतं की नैतिक जबाबदारी शेवटी घ्यायचीच असते. मात्र, अलिकडच्या काळात आता अशी पद्धत राहिलेली दिसत नाही. काही झालं तरी आम्ही आहोतच अशी भूमिका आता दिसते आहे", असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

12:54 (IST) 13 Jun 2025

"ही अतिशय दुर्देवी घटना", अहमदाबाद विमान दुर्घटनेवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवरही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, "ही अतिशय दुर्देवी अशी घटना आहे. या घटनेनंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे पोहोचले असून घटनेचा आढावा घेत आहेत. या घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच त्या विमानात असलेल्या काही क्रू मेंबर्सपैकी महाराष्ट्रातील देखील होते. या घटनेबाबत महाराष्ट्राने देखील हेल्प टेस्क सुरु केलेला आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने देखील आवश्यकत ते सहकार्य केलं जाईल", असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

11:50 (IST) 13 Jun 2025

फडणवीसांना उद्धव-राज यांना एकत्र येऊ द्यायचे नाही - वडेट्टीवार

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता असताना, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन हे एकत्रीकरण रोखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विजय वडेट्टीवारांनी केला आहे. ...अधिक वाचा
11:09 (IST) 13 Jun 2025
"अहमदाबाद विमान दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार?", खासदार संजय राऊत यांचा सवाल

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेवरही महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, "ड्रीमलाईनर या विमानाबाबत अनेक तक्रारी होत्या. याबात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीच त्या काळात आक्षेप घेतला होता. पण या विमान दुर्घटनेत २६५ जणांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आम्हाला याबाबत चिंता वाटत आहे. त्यामुळे आम्हाला काही प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. या घटनेची जबाबदारी कोण घेणार? जेव्हा अशा प्रकारचे अपघात यूपीए सरकारच्या काळत होत होते तेव्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा त्या काळातले भाजपाचे विरोधी पक्षनेते हे संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. तेव्हा राजीनामे देखील देण्यात आले होते", असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

https://youtu.be/bEUZ0adnmuk?si=4smsxtDHpXy1Hxk7

11:09 (IST) 13 Jun 2025

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय पक्ष निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करत आहेत. असं असतानाच राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Raj Thackeray Devendra Fadnavis Maharashtra Politics

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)