Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death in Baramati Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांचे आज (२८ जानेवारी) रोजी दुःखद निधन झाले आहे. बारामतीत झालेल्या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी बारामतीत मेडिकल कॉलेजबाहेर समर्थकांची गर्दी उसळली आहे. तर, संपूर्ण पवार कुटुंबही बारामतीत दाखल झाले आहेत. उद्या, २९ जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, अजित पवारांचं पार्थिव आज सायंकाळी ४ वाजल्यापासून विद्याप्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात अंत्यदर्शनाकरता रात्री उशिरापर्यंत नागरिकांसाठी ठेवण्यात येणार आहे. उद्या (२९ जानेवारी) सकाळी ९ वाजता गदिमा सभागृहापासून अंत्ययात्रा निघेल. गदिमा चौक, विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठानचा अंतर्गत रस्ता, मराठी शाळेच्या गेटने विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर जाईल. सकाळी ११ वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होईल.

बारामतीत प्रचाराला येत असताना झाला अपघात

बारामती येथे विमानाचे लँडिग होत असताना अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की विमान जळून खाक झाले आहे. आज बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चार सभा होणार होत्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रचारासाठी या सभांचे आयोजन करण्यात आले होते. सुपे जिल्हा परिषद गटासाठीही एक सभा होणार होती. यासाठी अजित पवार विमानाने मुंबईहून बारामतीमध्ये आले होते. मात्र विमानाचे लँडिंग होत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब बारामतीत दाखल झालं असून उद्या, २९ जानेवारी रोजी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू

दरम्यान, यात अजित पवारांसह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होते. या सर्वांचा यात मृत्यू झाला आहे. मुंबईतून हे विमान सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी निघाले होते. तर, बारामती येथे ८.५० मिनिटांनी पोहोचले. लँडिंग करत असतानाच या विमानाचा अपघात झाला अन् आतील प्रवाशांचा मृत्यू झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवर Devastated असा एक इंग्रजी शब्द ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र काही वेळाने हे स्टेटस डिलीट करण्यात आले.

राज्यात शासकीय दुखवटा जाहीर

दरम्यान, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवार, दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये बंद राहतील, असे कळविण्यात आले आहे.

Live Updates

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death News Live : अजित पवार यांचे अपघाती निधन

08:51 (IST) 29 Jan 2026

Ajit Pawar: पुण्याचे तहहयात ‘पालक’

पुण्याचे पालकमंत्री कोण, असा प्रश्न केल्यास हमखास नाव येते ते अजित पवार यांचे! पालकमंत्री आणि अजित पवार हे एक समीकरणच झाले होते. ...वाचा सविस्तर
07:57 (IST) 29 Jan 2026

Ajit Pawar Last Rites Live Updates : बारामती विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बारामती विमानतळावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, बारामतीत आज अनेक नेतेमंडळी दाखल होणार असल्याने सुरक्षेत वाढ

https://twitter.com/ANI/status/2016697045877477409

07:53 (IST) 29 Jan 2026

Ajit Pawar Live Updates : अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीकडे रवाना; सुनेत्रा पवार काटेवाडीत दाखल

अजित पवारांचं पार्थिव त्यांच्या मूळ निवासस्थानी काटेवाडी येथे ठेवले जाणार आहे. सुनेत्रा पवार काटेवाडीत पोहोचल्या असून त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.

07:52 (IST) 29 Jan 2026

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी पवार कुटुंबीयांची भेट घेतली

https://twitter.com/ANI/status/2016671601295802512

22:49 (IST) 28 Jan 2026

अजित पवारांचा अपघाती मृत्यू, विमान कोसळतानाचं नवं सीसीटीव्ही फुटेज समोर

अजित पवारांच्या अपघाताचा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. नव्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवारांचं विमान एका बाजूला झुकलं आणि कोसळल्याचं दिसून येतं आहे. लँडिंगच्या वेळी विमान कोसळल्याचं दिसून येतं आहे. लँडिंग करताना विमानाचं नियंत्रण गेलं होतं. विमानाचं क्रॅश लँडिंग झाल्यानंतर साधारण पाच वेळा स्फोट झाले आणि आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरले. या अपघातात विमान कोसळून विमानाचा चक्काचूर झाला आणि अवशेष उरले. तर विमानात अजित पवारांसह जे लोक बसले होते त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. याच अपघाताचा हा नवा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

22:46 (IST) 28 Jan 2026

अजित पवारांचं पार्थिव रात्रभर रुग्णालयात ठेवलं जाईल, गुरुवारी अंत्यसंस्कार केले जातील-सुप्रिया सुळे

“नमस्कार, उद्या सकाळी १० वाजता आपण इथे सगळे जमणार आहोत. दादांचं पार्थिव १० वाजता इथे आणलं जाईल. उद्या सकाळी ११ वाजता अंत्यविधी केला जाईल. आत्ता डॉक्टरांनी आणि कलेक्टरनी असं सांगितलं आहे की आपल्याला दादांचं पार्थिव रुग्णालयात ठेवावं लागणार आहे. रात्रभर दादांचं पार्थिव रुग्णालयात ठेवलं जाईल. सकाळी १० वाजता आपण सगळ्यांनी इथे जमायचं आहे. ११ वाजता अंत्यसंस्कार केले जातील. कुणाचीही गैरसोय झाली असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

22:01 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचं विमान कसं अन् कुठं कोसळलं? शरद पवारांनी बारामतीत पोहोचताच घेतली माहिती

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झालं आहे. अजित पवार हे एका खासगी विमानाने मुंबईवरून बारामतीला जात होते. यावेळी विमानाचं लँडिंग होत असताना विमानाचा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

20:43 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar’s Death : पनवेलकरांच्या स्मरणात राहणारे अजित पवार एक उमदे व्यक्तिमत्व

अजित पवार हे एवढे स्पष्टोक्ता होते की मालमत्ता कर कमी होणार नाही, मालमत्ता कर हाच महापालिकेचा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने ही मागणी धुडकाऊन लावली. ...सविस्तर बातमी
20:28 (IST) 28 Jan 2026

अजित पवार ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेणारे नेते- शंभूराज

कराड : अजित पवार हे स्पष्टवक्ते, ‘ऑन द स्पॉट’ निर्णय घेणारे नेते. जे काम होऊ शकत नाही, ते नियमात बसत नसल्याचे स्पष्टपणे सांगणारे नेतृत्व. असा स्पष्टवक्तेपणाचा आवाज कायमचा हरपल्याचे दु:ख राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.अजित पवार यांचे विमान अपघाती निधन या वृत्तावर विश्वासच बसला नाही. त्यांचे अशा प्रकारे अचानक जाणे, ही अत्यंत धक्कादायक, मनाला चटका लावणारी आणि दुःखद घटना असल्याचे देसाई म्हणाले.

राजकारणात इतक्या स्पष्टपणे बोलणारे नेते फार कमी आहेत. एखादे काम होणार नसल्याचे सांगितल्याने संबंधित व्यक्तीला क्षणिक दुःख होईल, मात्र त्यांना अडचण स्पष्ट समजली पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका होती. राजकारण, समाजकारण आणि शासनात काम करताना त्यांनी ही परखड भूमिका सातत्याने जपली.

सातारचे ते सुरुवातीला पालकमंत्री असताना, मी आमदार नव्हतो, तरीही आमची मैत्री होती. राजकारणापलीकडची मैत्री जपणारा नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील. मला त्यांच्यासोबत अडीच वर्षे राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ‘महाविकास आघाडी’च्या काळात ते वित्तमंत्री व उपमुख्यमंत्री असताना मी वित्त खात्याचा राज्यमंत्री होतो. विधानपरिषदेत आम्ही तीनदा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्प तयार करताना राज्याचे हित जपत सर्व क्षेत्रांना न्याय देण्याची ठाम भूमिका मला त्यांचा सहकारी म्हणून नेहमी अनुभवता आली.

20:01 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar’s Death : मटण, मासे, भाकरी....ताव मारत अजितदादांचा कार्यकर्त्यांशी संवाद

अजितदादा आणि सांगलीचे नाते जिव्हाळ्याचे तर होतेच, पण कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून प्रत्येक दौर्‍यावेळी कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्या अवती भोवती नांदत असे. ...अधिक वाचा
19:50 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death : ज्येष्ठांप्रती आदर, समवयस्कांचा सन्मान, नवोदितांना पाठबळ, अजित दादा पवार यांचा कोल्हापुरातील नेत्यांशी स्नेहबंध

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर कोल्हापूरतून शरद पवार यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्यासमवेत काम करणारे विधान सभेचे दिवंगत अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रति दादांनी सदैव आदर व्यक्त केला. ...वाचा सविस्तर
19:43 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death : पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही दादा मला ‘रिचेबल’ होते

दुपारचा शपथविधी ठरला तेव्हाही दादा आपल्यासाठी रिचेबल होते. संघर्ष, आव्हाने पेलताना प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत आम्ही एकमेकांची साथ सोबत केली. ...सविस्तर वाचा
19:35 (IST) 28 Jan 2026
Ajit Pawar : शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया! ‘‘यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात…’’

ज्येष्ठ नेते शरद यांनी अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ‘हा निव्वळ अपघात असून, यात राजकारण नाही,’ अशी प्रतिक्रिया दिली. ...सविस्तर वाचा

19:24 (IST) 28 Jan 2026
"यात राजकारण नाही, हा निव्वळ अपघात", अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांनी व्यक्त केल्या भावना

अजित पवार ह्यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणारं नाही पण सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मिडियासमोर येणार नव्हतो पण काही माध्यमांमध्ये ह्या अपघातामागे काही राजकारण आहे अशा प्रकारची भूमिका कलकत्त्यावरून मांडली गेली, असं कळलं. पण ह्यात राजकारण नाही हा निव्वळ अपघात आहे. ह्या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया ह्यात राजकारण आणू नये. एवढंच सांगायचं आहे. - शरद पवार

https://twitter.com/PawarSpeaks/status/2016509240379318655

19:06 (IST) 28 Jan 2026
Ajit Pawar Death : अतिशय शिस्तबद्ध आणि कार्यक्षम नेता हरपला; पृथ्वीराज चव्हाण यांनी वाहिली अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कराड : अजित पवार यांच्या इतका अत्यंत शिस्तबद्ध आणि कार्यक्षम नेता क्वचितच पाहायला मिळतो. अजितदादांचे असे अकाली जाणे, हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे; तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनाची बातमी अत्यंत दुःखद व धक्कादायक असल्याचे ते म्हणाले. अलीकडेच राज्यात नगरपालिका व महापालिका निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार होता. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचा निवडणूक प्रचार सुरू होता. अशा अत्यंत महत्त्वाच्या काळात ते सातत्याने राज्याच्या हितासाठी कार्यरत होते. याच दरम्यान, ही दुर्दैवी दुर्घटना घडल्याचे दु:ख चव्हाण यांनी व्यक्त केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आपल्या पक्षाच्या प्रचाराचा प्रारंभ ते बारामतीत करणार होते. परंतु, इथे त्यांचे विमान उतरण्यापूर्वीच हा दुदैवी अपघात झाला. मी २०१० साली मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हा अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. जवळपास चार वर्षे आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राचे नेतृत्व केले आणि जनहिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आमच्यात काही मतभेदही झाले, एका टप्प्यावर ते नाराज होऊन आपल्या पदाचा राजीनामा देऊन बाहेर गेले होते. मात्र, मी त्यांना समजावून पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले. त्या काळातही त्यांच्याकडे वित्त विभागाची जबाबदारी होती आणि आजही तीच जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करण्यात अत्यंत कुशल होते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांची त्यांना सखोल जाण होती. राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांच्यात अपार क्षमता होती असे चव्हाण यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि देशाच्या राजकारणाला मोठा धक्का बसला आहे. पवार कुटुंबीयांप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

18:43 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्र आणि देशाच्या विकासात अजित दादांचं मोठं योगदान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

https://www.instagram.com/reels/DUDjeHzDPHM/

18:27 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Plane Crash Live Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता समर्थकांची गर्दी

अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता समर्थकांची गर्दी

https://twitter.com/PTI_News/status/2016486819660202146

18:21 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : ६६ वर्षे, ६ महिने, ६ दिवस अन् ६ वेळा उपमुख्यमंत्री; अजित पवारांच्या एक्झिटचा विचित्र योगायोग

अजित पवारांचा जन्म २२ जुलै १९५९ सालचा. म्हणजे आज त्यांच्या वयाला ६६ वर्षे ६ महिने आणि ६ दिवस पूर्ण झाले होते. शिवाय, ते ६ वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे ६ संख्येचा हा विचित्र योगायोग म्हटला जातोय.

18:11 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Live Updates : एएआयबी चौकशी पथक बारामतीला पोहोचले

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विमान अपघात तपास ब्युरो (एएआयबी) ची एक टीम बारामतीत पोहोचली आहे. या पथकाकडून अपघाताची चौकशी केली जाणार आहे.

17:30 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलं सुनेत्रा पवारांचं सांत्वन

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

17:29 (IST) 28 Jan 2026
Ajit Pawar Died in Plane Crash: बारामतीत अजित पवार यांच्या विमान अपघाताचे मन सुन्न करणारे फोटो

अपघातग्रस्त विमान ‘व्हीएसआर व्हेंचर्स प्रा. लि.’ या कंपनीच्या मालकीचे होते.

पाहा फोटो

16:46 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Updates : दुःख, वेदना अन् निशब्द भावना; फडणवीस-शिंदेंनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट

संसदेच्या अधिवेशनाकरता दिल्लीत गेलेल्या सुनेत्रा पवार या बारामतीत पोहोचल्या आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर होत्या. त्या बारामतीत पोहोचताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.

16:40 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : "दादांच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरकं केलं", रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केल्या संवेदना

आमच्या राष्ट्रवादी परिवारावर आज दुःखाचा डोंगर कोसळला, दादा नावाच्या व्यक्तीच्या सावलीत असणाऱ्या आम्हा सर्वांना काळाने पोरक केलं. आमच्या डोक्यावरील आधाराची आणि मायेची सावलीच हिरावून घेतली. सूर्याच्या साक्षीने दादांचे काम सुरू व्हायचे काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक माणसाला दादा आपले काम करतील हा विश्वास वाटायचा हीच दादांची ओळख होती. दादा स्पष्टपणे जितके बोलायचे त्याच्या कैक पटीने जास्त त्यांच्या मनात प्रत्येकाबद्दल आदर आणि आपुलकी असायची. आम्हा सर्वांना दादांची आदरयुक्त भीती होती, संघटनेच्या कामकाजात देखील ते अतिशय स्पष्टपणे सर्व गोष्टी समजावून सांगायचे. शेवटच्या घटकांला केंद्रस्थानी ठेवून आपल्याला पक्ष संघटन मजबूत करायचे आहे, महिलांना राजकारणात जास्तीत जास्त प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची आहे असे सांगणारे लाडक्या बहिणींचे हक्काचे दादा होते. आजच्या घटनेनंतर खरोखर व्यक्त होण्यासारखे काहीच उरलेले नाही, आमचा सर्व राष्ट्रवादी परिवार आमचे आदर्श असलेल्या नेतृत्वाला पोरका झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली..!

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/2016467407897059519

16:35 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : "महाराष्ट्रातील लाडका दादा गेला", छगन भुजबळांना अश्रू अनावर

आयुष्यातील फार मोठं संकट आहे. दुःख आहे. अनेक दुःख भोगले, अनेक अडचणी आल्या. पण हे असं स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं. सर्वजण निशब्द आहेत. ना आम्ही बोलू शकत, ना ते (पवार कुटुंबीय)बोलू शकत. महाराष्ट्रातील लाडका दादा गेला. काल दिवसभर आम्ही एकत्र होतो - छगन भुजबळ

16:32 (IST) 28 Jan 2026

Ajir Pawar Death Live Updates : उद्या शाळा सुरू राहणार, पण मनोरंजक विषयक कार्यक्रम घेण्यास मनाई

राज्यभरात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी (२८ जानेवारी) सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. २९ आणि ३० तारखेला सर्व शाळा सुरू राहणार आहेत. पण या दरम्यान शाळांमध्ये कोणतेही मनोरंजन विषयक कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. तसेच दहावी आणि बारावी सराव परीक्षेच्या तारखांमध्ये काही बदल असतील तर ते कळविण्यात येतील.

16:05 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death Live Updates : अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने रवाना

अजित पवारांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठान येथे घेऊन जात आहेत.

https://twitter.com/ANI/status/2016449785415504275

16:00 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Funeral Details Procession and Cremation : आज रात्रीपर्यंत घेता येणार अंत्यदर्शन, उद्या निघणार अंत्ययात्रा; अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान राहणार उपस्थित

Ajit Pawar Funeral Procession and Cremation : अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
15:59 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Death live Updates : मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते विद्याप्रतिष्ठानला पोहोचले, अंत्यदर्शनाला होणार सुरुवात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेते विद्याप्रतिष्ठानला पोहोचले आहेत. विद्याप्रतिष्ठान मैदानावरच अजित पवारांचं पार्थिव दर्शनाकरता ठेवण्यात येणार आहे.

15:38 (IST) 28 Jan 2026

Ajit Pawar Died in Plane Crash: अजितदादांसोबत जातेय, नांदेडमध्ये पोहोचले की फोन करेन…फ्लाईट अटेंडंट पिंकीचे वडिलांसोबत शेवटचे शब्द 

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death in Baramati Plane Crash : मॉडेलिंगच्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा बाळगणाऱ्या पिंकीची स्वप्न या दुर्घटनेत जळून खाक झाली. वरळीत म्हणजेच तिच्या माहेरी तिचे आई - बाबा, भाऊ राहतात. ...अधिक वाचा

Ajit Pawar  Died in Plane Crash close loving relationship with Pimpri Chinchwad

Maharashtra Deputy CM Ajit Pawar Death News Live : अजित पवार यांचे अपघाती निधन