Maharashtra Politics Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच आज खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. तसेच वाल्मिक कराड याचं एक सीसीटीव्ही फूटेज नुकतंच समोर आलं असून वाल्मिक कराडसोबत इतर आरोपी दिसत आहेत. त्यामुळे हा मुद्दाही चर्चेत आला आहे. तसेच दुसरीकडे सैफ अली खानवरील हल्ला आणि त्याचा हल्लेखोर यासंदर्भात मोठी चर्चा सध्या सुरु आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलंलं आहे. दरम्यान, या बरोबरच २२ जानेवारी रोजी जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात घडला. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यामुळे प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेक प्रवाशांना चिरडलं. त्यात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवरही आता प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, यासह राज्यातील राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Mumbai Maharashtra News LIVE Update: राजकीय आणि इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.
जळगाव रेल्वे अपघातातील १२ मृतांची ओळख, सात जण नेपाळचे रहिवासी, मृतदेह रुग्णवाहिकांमधून रवाना
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील १३ मृतांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी सात जण हे मूळ नेपाळमधील तर इतर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत.
मनसेतील गटबाजीने राज ठाकरे नाराज; जिल्हा, शहर कार्यकारिणी बरखास्तीची शक्यता
अनेकांकडून परस्परांविरुद्ध तक्रारी झाल्यामुळे मनसे प्रमुख राज ठाकरे हे कमालीचे नाराज असून ते नाशिक जिल्हा व शहर कार्यकारिणी बरखास्त करण्याची शक्यता मनसेच्या गोटातूनच व्यक्त केली जात आहे.
सोनसाखळी चोरांच्या लवकर मुसक्या आवळा : चंद्रकांत पाटील
पुणे शहरातील कोथरुड भागात सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कोथरुडचे स्थानिक आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अलंकार पोलीस स्टेशन येथे जाऊन सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल पठारे आणि अलंकार पोलीस स्टेशनच्या निरिक्षक सुमिता रोकडे यांच्यासोबत सोनसाखळी चोरीच्या घटनांचा आढावा घेतला.
कोणत्याही भागात चोरीच्या घटना घडता कामा नये,यासाठी पोलिसांनी विविध भागात गस्त वाढवावी, नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधावा,तसेच तपासाची गती वाढवा आणि सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळा,असे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले.
दोन पोलीस अधिकारी ‘लाचलुचपत विभागा’च्या सापळ्यात
नांदेड : येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे व पोलीस उपनिरीक्षक नारायण मारोतराव शिंदे यांना गुरुवारी (दि.२३) १७ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या गंजगाव वाळू घाटावरून हायवाने वाहतूक करण्यासाठी तक्रारदाराकडे सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर १७ हजार रुपये देण्याचे ठरले. या दरम्यान तक्रारदाराने नांदेडच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क केल्यावर सापळा रचून नागरगोजे व शिंदे यांना रंगेहाथ पकडले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक प्रीती जाधव, पोलीस अंमलदार राजेश राठोड, बालाजी मेकाले, ईश्वर जाधव आदींनी वरील कारवाई केली.
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन
नाशिक : राष्ट्रवादीचे (शरद पवार ) प्रमुख शरद पवार यांनी विकासाच्या मुद्द्यांवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हावे, असे आवाहन करतानाच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील, तेव्हाच हे शक्य होईल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडले.
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला
ठाणे : बाळासाहेब हे बाळासाहेब होते, मी बाळासाहेब होऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो. सत्तेतुन बाहेर पडलो. एवढ धाडस आम्ही दाखवल. पण काहींनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वत:च्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली, अशी टिका करत आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना ठाकरे गटाला लगावला.
सविस्तर वाचा....
व्यापारी गुजरातचा, अपहरण मलकापुरातून अन् आरोपी मराठवाड्यातील!
बुलढाणा : गुजरातमधील रहिवासी असलेल्या बड्या व्यापाऱ्याचे विदर्भातील मलकापूर ( जिल्हा बुलढाणा ) येथून बुधवारी रात्री अपहरण करण्यात आले. पोलीस तपासात व्यापाऱ्याचे सिल्लोड ( जिल्हा संभाजीनगर ) येथील व्यापाऱ्यांनी अपहरण केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याची पोलिसांनी सुटका केली.
पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केला
अलिबाग : पैशाच्या लोभातून नातवानेच आजीचा खून केल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खालापूरमधील माडप कातकरवाडी येथे समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी जेरबंद केले आहे. सुमित काशिनाथ कातकरी असे अटक करण्यात आलेल्या २२ वर्षीय तरूणाचे नाव आहे.
विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात देशभरातील संघटना नागपुरात येणार… हे आहे कारण…
नागपूर: उत्तरप्रदेश, राजस्थान व चंदीगडमध्ये विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली असून महाराष्ट्रातही याचे संकेत सरकारच्या निर्णयातून मिळत आहे. या विरोधात देशभरातील विद्युत क्षेत्रातील कामगार- अधिकाऱ्यांच्या संघटना एकवटल्या आहेत. त्यापैकी काही संघटनांनी ‘एक है, तो सेफ है’चा नारा देत २३ फेब्रुवारीला नागपुरात एकत्र येऊन देशव्यापी संम्मेलनाचा निर्णय घेतला आहे.
अन्न सुरक्षेचा १०० दिवसांचा कृती आराखडा, अन्न व औषध प्रशासनाकडून विविध उपक्रम हाती
मुंबई : जनतेला सकस, निर्भेळ अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने १०० दिवसांचा कृती आराखडा सक्षमपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यामध्ये दूध व दूग्धजन्य पदार्थ तपासणी मोहीम, अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षेचे प्रशिक्षण, हॉटेल, रेस्टॉरंट यांना स्वच्छता मानांकन, इट राईट कॅम्पस प्रमाणीकरण व धार्मिक स्थळांमध्ये ईट राईट प्रार्थनास्थळ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
"सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला", भरत गोगावलेंचं मोठं विधान
"आम्ही व्यवहाराने चालणारे माणसं आहोत. आम्ही चुकीच्या पद्धतीने चालणारे माणसं नाहीत. आम्ही ज्या प्रमाणे निवडणुकीत काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं, तर त्याचा विचार केला गेला असता. मात्र, आम्ही प्रामाणिकपणे काम करायचं. पण त्यांनी (सुनील तटकरे) आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मग ही कोणती रित? जे स्वत:च्या भावाचे होऊ शकले नाहीत मग ते तुमचे आणि आमचे काय होणार?", असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला.
शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, "उद्या पहिला ट्रेलर..."
"मी आधीही सांगितलं होतं की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या (२४ जानेवारी) तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार, काँग्रेसचे ५ आमदार आणि ठाकरे गटाचे १० माजी आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख हे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार आहे", असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ‘हे’ निकष… चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
नागपूर: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये सहभागी तिन्ही सत्ताधारी पक्षामध्ये सहभागी होण्यास इच्छुक नेत्याच्या पक्ष प्रवेशासाठी निकष ठरले आहे. या निकषाबाबत राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे.
"अजित पवार, एकनाथ शिंदे आणि भाजपाकडे पक्ष प्रवेशासाठी मोठी यादी", चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा दावा
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, "अजित पवार यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी एक मोठी यादी आहे, तसेच भाजपाकडेही पक्षप्रवेशासाठी मोठी यादी आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडेही पक्षप्रवेशासाठी एक यादी आहे. त्यामुळे आम्ही तिघेही एकत्र बसून कोणत्या पक्षप्रवेशामुळे महायुती अजून भक्कम होईल? म्हणजे कोणत्या नेत्याच्या पक्ष प्रवेशामुळे महायुती आणखी मजबूत होईल आणि कोणत्या पक्षामुळे महायुतीला धोका निर्माण होईल याचा विचार आम्ही करणार आहोत", असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Video : बेदरकार ट्रेलरने अंबरनाथमध्ये अनेक गाड्यांना उडवले, ५० हून अधिक गाड्यांचे नुकसान
मद्यधुंद ट्रेलर चालकाने उलट दिशेने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान ५० वाहनांना धडक दिल्याची खळबळजनक घटना अंबरनाथजवळ घडली आहे.
एमआयडीसीचे भूखंड म्हाडाकडून विकसित ? संयुक्त भागीदारी तत्त्वाबाबत लवकरच करार
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हबअंतर्गत एमएमआरमध्ये नवीन आठ लाख घरांच्या निर्मितीचे लक्ष्य म्हाडाच्या माध्यमातून ठेवण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) भूखंडांवरील गृहनिर्मितीचाही समावेश आहे. एमआयडीसीच्या अतिक्रमित आणि मोकळ्या भूखंडांवर कामगार निवारा संकल्पनेनुसार म्हाडाकडून घरांची बांधणी करण्यात येणार आहे.
दंडात्मक कारवाईला ‘खो’; राज्यभरात अडीच हजार कोटींवर वाहतूक ई-चालान प्रलंबित
नागपूर : राज्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी २०१९ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालान करणे सुरू केले. आतापर्यंत ७ कोटी ५३ लाखांपेक्षा जास्त वाहनचालकांवर ३ हजार ६६७ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
महाविकास आघाडीची सत्ता उलथवून लावण्यासाठी महायुतीची खेळी; जिल्हा बँकेचे अध्यक्ष अविश्वासाच्या…
यवतमाळ : शेतकऱ्यांची बँक म्हणून प्रसिद्ध असलेल्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान अध्यक्षांवर अवघ्या दोन वर्षात अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढवली आहे. येत्या ३१ जानेवारीला या अविश्वास प्रस्तावासंदर्भात सभा होणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधकांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जलजीवन अभियानाची कामे रखडली, राजू शेट्टी यांची केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांकडे निधीची मागणी
कोल्हापूर : केंद्र सरकारच्या जलजीवन अभियान या ग्रामीण भागातील महत्त्वाकांक्षी पेयजल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना सहा महिन्यांपासून निधी नसल्याने ही कामे रखडली आहेत.
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांचा बालकाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
नागपूर : राष्ट्रीय पक्ष्याचा दर्जा असणारे आणि वन्यजीव संरक्षण कायद्यातील अनुसूची एकमध्ये समाविष्ट असणाऱ्या एक-दोन नाही तर तब्बल पाच मोरांचा मृत्यू झाला. देशभरात एकीकडे ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव असताना एकाचवेळी झालेल्या या मृत्युने खळबळ उडाली आहे.
दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?
‘मिळकतकरावरील थकीत शास्तीमुळे (दंडामुळे) थकबाकीदारांवर बोजा वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने दंडमाफीचा प्रस्ताव सादर करावा,’अशा सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी महापालिका प्रशासनाला केल्या. सविस्तर वाचा
जळगाव रेल्वे अपघातातील सहा मृतदेहांची डीएनए चाचणी होणार
मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी सात प्रवाशांची ओळख पटली असून ओळख न पटलेल्या उर्वरित सहा मृतदेहांची आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.
बदलापुरात एका तपानंतरही बायोगॅसची प्रतीक्षाच; भाजपच्या नगरसेवकाच्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्प पुन्हा वादात
कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात १२ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला बायोगॅस प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नगरसेवकाने केलेल्या आरोपानंतर बायोगॅस प्रकल्पावर लाखो रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा
अंबरनाथ शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरूस्तीबाबत पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते आहे. त्यामुळे नागरिकांना रात्री अंधाराचा जाच सोसावा लागत आहे. तरीही एका कंत्राटदाराला अंबरनाथ नगरपालिका प्रशासन बिलाच्या माध्यमातून खैरात देत असून त्यामुळे नागरिकांच्या कराचा अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. सविस्तर वाचा
डोंबिवलीत आयरेगावमध्ये चार दुकानांमध्ये चोरी करणारा चोरटा अटकेत
डोंबिवली पूर्वेतील आयरे रस्ता भागातील पोलीस चौकीजवळ शनिवारी मध्यरात्री चार दुकानांमध्ये चोरी झाली. दुकानदारांंनी यासंदर्भात तक्रार करताच रामनगर पोलिसांनी पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या साहाय्याने चोरटा शोधून काढला.
दूषित पाणी अथवा अन्नामुळे गुइलेन बॅरे सिंड्रोम! काळजी काय घ्यावी जाणून घ्या…
पुणे : पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची रुग्णसंख्या वाढली आहे. काही रुग्णांच्या तपासणीत त्यांना कॅम्पायलोबॅक्टर जेजूनी जीवाणूचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दूषित पाणी अथवा अन्नातून हा संसर्ग होत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कल्याणमध्ये दिलीप कपोते वाहनतळाच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृह
कल्याण : कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ दिलीप कपोते वाहनतळाच्या आवारात महिलांसाठी अत्याधुनिक पध्दतीचे वातानुकूलित प्रसाधनगृह उभारण्यात आले आहे. महिलांसाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा या प्रसाधनगृहात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गुइलेन बॅरे सिंड्रोम रुग्णांवर उपचारांसाठी आमदार रासने यांची मोठी मागणी, म्हणाले…!
पुणे : ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’ या आजाराच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळण्यासाठी मोठ्या रुग्णालयांमध्ये स्वतंत्र विभाग तयार करावेत तसेच आर्थिक दुर्बल रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी रासने यांनी केली.
खडकवासला, किरकिटवाडीला शुद्धीकरणाविनाच पाणी !
पुणे : महापालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश झालेल्या खडकवासला, किरकिटवाडी, नांदोशी या भागात ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’चे संशयित रुग्ण आढळून येत आहेत. या भागातील नागरिकांना ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या विहिरीच्या पाण्यात दूषित पाणी मिसळले जात आहे का, याचा शोध घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात महत्वाची माहिती समोर; तलावात दीड तास शोधाशोध अन् पोलिसांच्या हाती मोठा पुरावा (फोटो-संग्रहित छायाचित्र)