Maharashtra Latest News Updates, 27 January 2023 : शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याची घोषणा २३ जानेवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली होती. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसपूस असल्याची चर्चा रंगू लागली होती. अशातच शरद पवार हे आजही भाजपाबरोबर असल्याचं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं. दरम्यान, यावरून पुन्हा एकदा राजकारण तापू लागलं आहे. नाना पटोले यांनी वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर अशा प्रकारची विधानं कोणीही करु नये. देशात भाजपाविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होतोय, त्याचे स्तंभ शरद पवार आहेत, असं संजय राऊत म्हणाले. आजही दिवसभर हा मुद्दा चर्चेत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज पंतप्रधान मोदी हे देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम करणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी विद्यार्थांना काय संदेश देतात, याकडेही लक्ष असणार आहे.