Maharashtra News Updates : महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून विधानसभेचं विशेष अधिवेशन काल (९ डिसेंबर) संपलं आहे. दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी (फ्लॅगशिप) योजनांच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात तातडीने आणखी एक ‘वॉररूम’ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुख्य सचिवांना दिले. तसेच प्रत्येक खात्याने पुढील १०० दिवसांसाठीचा कार्यक्रम सादर करावा आणि माहिती अधिकार कक्षेतील बहुतांश तपशील २६ जानेवारीपर्यंत शासकीय संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रशासन कामाला लागलं आहे. दुसऱ्या बाजूला, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक अजूनही सरकारवर टीका करत आहेत. या सर्व, बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Political News Live Updates : राज्याच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर.
बांग्लादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेचे रत्नागिरीत मूक धरणे आंदोलन
रत्नागिरी : बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू, बौद्ध धर्मीयांवर होणाऱ्या अमानुष, क्रूर हल्ल्याविरोधात विश्व हिंदू परिषदेने मंगळवारी मूक धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आंदोलनात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि लांजा- राजापूरचे आमदार किरण सामंत हे देखील सहभागी झाले होते.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे, हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधिश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला. सविस्तर वाचा…
ईव्हीएम यंत्राविरोधात धर्मराज्य पक्षाकडून आंदोलनाला सुरूवात; शहरातील चौका-चौकात ईव्हीएम हटविण्यासाठी मतदान
ईव्हीएम मतदान यंत्राविरोधात राज्यात महाविकास आघाडीकडून आंदोलनास सुरूवात केली आहे. ठाण्यातही धर्मराज्य पक्षाने विविध चौकात ईव्हीएम विरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली असून प्रतिकात्मक मतपेट्या चौकात ठेवल्या जात आहेत. सविस्तर वाचा…
"राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 'इंडिया' निवडणुका जिंकत नसल्याचा शरद पवारांकडून ठपका", उदय सामंतांचं वक्तव्य
ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व दिलं पाहिजे असं शरद पवार म्हणाले होते हा खरा काँग्रेसचा अपमान आहे, अशा शब्दांत आमदार उदय सामंत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका यशस्वी होत नाहीत हा ठपका शरद पवारांनी व इतर नेत्यांनी ठेवला आहे.हा काँग्रेसचा झालेला अपमान आहे त्यामुळे आम्ही या संदर्भात काय बोलणार. राहुल गांधी यांचे नेतृत्व काढून ते आता जर ममता बॅनर्जी यांच्याकडे येणार असेल तर राहुल गांधी यांचं नेतृत्व कमकुवत आहे असं महाविकास आघाडी सांगतेय, असंही सामंत म्हणाले.
अदाणींवरील आरोपांची चौकशी व्हावी, कम्युनिस्ट पक्षाची मागणी
भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे उद्योगपती गौतम अदणींवर झालेल्या आरोपाची चौकशी करण्यात यावी, संसदीय समितीने याची चौकशी करावी अशी मागणी करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून गोंदिया जिल्ह्यात मोर्चा काढत निदर्शने करण्यात आली. सत्ताधारी पक्ष ऐकत नाही आणि देशात मोठ्या प्रमाणात विजेचे दर वाढले आहेत याचा विरोध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
कुर्ल्यातील बस स्थानक बंद केल्याने प्रवाशांना पायपीट
मुंबई: बेस्ट बसच्या अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने कुर्ला पश्चिम येथील बस स्थानक सध्या पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रवाशांना पायपीट करत एलबीएस मार्ग गाठावे लागत आहे.
पुरे झाली शोभा…
नालासोपारा येथील ४१ अनधिकृत इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या इमारतींमुळे शहरातील अनधिकृत बांधकामे कशी फोफावली आहे, भूमाफियांना कसे अभय दिले जाते ते उघड झाले आहे.
अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला रस्त्यावर फेकले
नागपूर : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बदनामीच्या भीतीपोटी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील वांझरा ले- आऊटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. पहाटेच्या सुमारास ते बाळ फिरायला जाणाऱ्या एका व्यक्तीच्या नजरेस पडले.
शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थी करत आहेत शास्त्रीय पद्धतीने शेवंतीची आधुनिक फुलशेती
रत्नागिरी : शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालय, खरवते-दहिवली, चिपळूणमधील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर अनुभवात्मक शिक्षण कार्यक्रमांतर्गत शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून शेवंती फुलांची लागवड करण्यात आली आहे.
बांगलादेशातील हिंदू धर्मातील लोकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू न्याय यात्रा
सावंतवाडी : बांगलादेशमधील हिंदूंवर धर्माच्या नावाखाली होत असलेले अनन्वित जिहादी अत्याचार थांबवावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आली. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बांगलादेशी मुस्लिमांचे लांगुलचालन कोणी करू नये असा इशारा देण्यात आला.
कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर मंदिरच; जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्णय
कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर मंदिर आहे, हा शासनाचा त्यावेळचा निर्णय मान्य करत कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे वरिष्ठ विभागाचे न्यायाधिश ए. एस. लांजेवार यांनी दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा दावा मान्य केला. सविस्तर वाचा…
ठाण्यातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीमेला सुरूवात
ठाणे : महापालिका क्षेत्रातील स्वच्छतेचा दर्जा उंचविण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ आता शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ exams/exam-calendar वर प्रसिद्ध केली जाईल.
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
नागपूर : महायुतीला भरभक्कम मिळालेल्या यशानंतर पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळा. त्यानंतर प्रथमच गुरुवारी दुपारी ३ वाजता त्यांचे गृहशहरात आगमन होत आहे. त्यांच्या स्वागातसाठी नागपूरकर सज्ज झाले.
नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ज्येष्ठाचा मोबाइल चोरीला
पुणे : पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मोबाइल संच चोरट्याने चोरून नेल्याची घटना केळकर रस्त्यावरील नारायण पेठ पोलीस चौकीसमोर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Bangladeshi women arrested : भिवंडीतून सहा बांगलादेशी महिलांना अटक
ठाणे : बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून भिवंडीमध्ये वास्तव्य करणाऱ्या सहा बांगलादेशी महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. त्यांच्याविरोधात पारपत्र अधिनियम, परकीय नागरिकांचा कायदा कलमांतर्गत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Titwala-Shilphata bypass road : टिटवाळा-शिळफाटा बाह्यवळण रस्ते मार्गातील अडथळे दूर
कल्याण : टिटवाळा-कल्याण-डोंबिवली ते शिळफाटा दरम्यानच्या ३० किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्ते मार्गात अडसर ठरणारी १२५ बांधकामे कल्याण डोंबिवली पालिकेच्या अ प्रभागाच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाने शुक्रवारी जमीनदोस्त केली. या कारवाईमुळे मागील काही वर्षापासून अटाळी भागात रखडलेला बाह्यवळण रस्ते मार्ग बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
‘मॅट’च्या इतिहासात प्रथमच लोक अदालत,१२६ जणांना नोकरी
नागपूर : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षांत प्रथमच लोकअदालत घेण्यात आली. त्यात ५४२ सेवाविषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. लोक अदालतीमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली.
अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून चौकशी
अश्लील चित्रफीत निर्मितीच्या आरोपांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अभिनेत्री व मॉडेल गहना वशिष्ठ हिची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी चौकशी केली.
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
गेल्या अनेक वर्षांपासून मानखुर्दमधील महाराष्ट्र नगरला जोडणाऱ्या भुयारी मार्गाची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली असून काही महिन्यांपूर्वी या भुयारी मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन करण्याची घोषणा करण्यात आली होती; परंतु अद्याप दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. सविस्तर वाचा…
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
गोंदिया : ६०० कुटुंब आणि २११६ एकूण लोकसंख्या असलेले गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतने "माझी वसुंधरा" अभियानासह शासनाच्या विविध योजनांची एक कोटी तीन लाख रुपये पेक्षा जास्त बक्षिसे जिंकून संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक मिळवला.
जादूटोण्याच्या संशयातून वृद्ध दाम्पत्यास मारहाण
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण भागात फोफावलेली अंधश्रद्धा काही केल्या कमी होताना दिसत नाही. जादूटोणा प्रकारावरून अनेक ठिकाणी शिवीगाळ, मारहाण, खून अशा घटना घडत आहेत. पोलिससुद्धा अशा प्रकरणांत गुन्हा दाखल करून मोकळे होतात
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
पुणे : महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत म्हणून मिळकत कर, बांधकाम परवानगी, पाणीपट्टी याकडे पाहिले जाते. महापालिकेच्या नऊ हजार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकामध्ये ३० टक्के उत्पन्न म्हणजे सर्वसाधारण २७०० ते २८०० कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट हे मिळकत कर विभागाला देण्यात आले आहे.
ईव्हीएमच्या समर्थनात भाजपा मैदानात, खोत-पडळकरांची मरकडवाडीत सभा
विरोधकांनी ईव्हीएमविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. सोलापूरमधील माळशीरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव विरोधकांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान बनलं आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीने याच मारकडवाडीत ईव्हीएमच्या समर्थनात मोठी सभा आयोजित केली आहे. नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, रयंत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत मारकडवाडीत ही सभा होत आहे. दरम्यान, आज दुपारी काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोले हे देखील मारकडवाडीला भेट देणार आहेत. निवडणूक ईव्हीएमवरच व्हायला हवी, असं भाजपाचं म्हणणं आहे.
‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ ; रेल्वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका
अमरावती : मध्य रेल्वेच्या पाच विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलीस आणि इतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत १ हजार ९९ मुला-मुलींची सुटका केली आहे.
पदावरील खाद्यापदार्थ विक्रेत्यांची अशीही चलाखी उघड; पोलीस, महापालिकेनेच दाखवली पळवाट?
नागपूर : आयटी पार्क ते माटे चौक या रस्त्यावरील पदपथावर खाद्यापदार्थांची दुकाने पुन्हा सजली आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाई टाळण्यासाठी या विक्रेत्यांनी आता एक नवीन शक्कल लढवली आहे. ‘दुकानासमोर कार थांबवू नये,’ असे फलक त्यांनी दुकानांच्या दर्शनी भागावर लावले आहेत.
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
बुलढाणा : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी मलकापूर न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास २ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे काम अपूर्णच, ६० कोटी रुपयांचे देयक महापालिकेने रोखले
नवी मुंबई : दोन वर्षांपासून शहरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम पूर्ण झाले असले तरी पूर्ण क्षमतेने त्याचा वापर करता येत नाही अशी स्थिती आहे. एकूण एक हजार ५४३ पैकी काही ठिकाणी सीसीटीव्ही चित्रण उपलब्ध होते तर काही ठिकाणी होत नाही अशी स्थिती आहे.
"...तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं", ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी दिल्ली येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. तिथल्या हिंदूंसाठी लढणारे, त्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे चिन्मय दास यांना तिथल्या सरकारने तुरुंगात डांबून ठेवलं आहे. हिंदूंची बाजू लावून धरतील अशा वकिलांच्या हत्या होत आहेत. बांगलादेशमध्ये असं सगळं घडत असताना स्वतःला हिंदूंचे नेते संबोधणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीच कसं वाटत नाही? तिथली परिस्थिती पाहून मोदी व अमित शाह यांचं मन विचलित होत नसेल, केवळ सचिव स्तरावरच या चर्चा सुरू असतील तर मला वाटतं की मोदी आणि शहांची हिंदूंबाबत केवळ भोंदूगिरी चालू आहे. ते हिंदूंबद्दल जे काही बोलत आहेत ते ढोंग आहे. केवळ मतांसाठी हिंदूंच्या नावाचा गजर करत असतात. अशीच घटना पाकिस्तानात घडली असती तर एव्हाना नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवर उभं राहून भाषण केलं असतं. पाकिस्तानातून घुसून मारू, अशी भाषा केली असती. वेगवेगळ्या घोषणा करून वातावरण निर्मिती केली असती. परंतु, आता निवडणुका नाहीत आणि मोदी शहांना बांगलादेशमध्ये निवडणूक लढायची नाही. म्हणून ते सगळे स्वस्थ बसले आहेत. त्यामुळे हिंदू मेला तरी त्यांना काही फरक पडत नाही. बांगलादेशमध्ये निवडणुका लढायच्या असता किंवा भारतात निवडणुका असत्या तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं.