Mumbai- Maharashtra News Updates, 08 September 2022 : महाराष्ट्रात दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीवरील सजावटीवरून राजकारण तापलं आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय राज्यात पावसाचीही जोरदार हजेरी आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

dual voters telangana maharashtra border
Loksabha Election 2024: महाराष्ट्र-तेलंगणा: ‘या’ १४ गावांतील लोक दोन राज्यात बजावतील मतदानाचा हक्क, नेमके प्रकरण काय?
dharashiv, lok sabha, ranajagjitsinha patil
Maharashtra News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार? पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता
The summer temperature will increase further in the Maharashtra state
राज्यात तापमान आणखी वाढणार
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
Live Updates

Maharashtra Updates 08 September 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

21:50 (IST) 8 Sep 2022
घरफोडीचे १०० गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याकडून २४ लाखांचा ऐवज जप्त

घरफोडीचे १०० गुन्हे दाखल असलेल्या चोरट्याकडून ४२ तोळे सोन्याचे दागिने, चार किलो चांदीचे दागिने असा २४ लाख ६४ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. राजेश उर्फ चोर राजा राम पपुल (वय ३८, रा. सच्चाई माता मंदिर, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राजेश पपुल याच्या विरोधात घरफोडीचे १०० गुन्हे दाखल आहेत.

सविस्तर वाचा

21:28 (IST) 8 Sep 2022
तळोजात मोदी केम फार्मा कंपनीत सायंकाळी भीषण आग

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील मोदी केम फार्मा कंपनीत गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली. अमोनिया रसायन निगडीत ज्वलनशील पदार्थ हाताळणी या कंपनीत होत असल्याने औद्योगिक विकास मंडळाच्या अग्निशमन दलाने सतर्कता बाळगत आगीच्या घटनास्थळी धाव घेतली.

सविस्तर वाचा

19:49 (IST) 8 Sep 2022
प्रथम श्रेणी पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार; प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकल पासातील फरक भरून प्रवास करता येणार

उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वातानुकूलित लोकलकडे सामान्य लोकलमधील प्रथम श्रेणी प्रवाशांचाही ओढा आहे. हे प्रवासी वातानुकूलित लोकलकडे वळावेत यासाठी सामान्य लोकलचा प्रथम श्रेणी पास आणि वातानुकूलित लोकल पासातील फरक भरून प्रवाशांना नवीन पास मिळणार आहे. या आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

19:31 (IST) 8 Sep 2022
Yakub Memon : “दोन वर्षे मुख्यमंत्री असताना बाळासाहेबांचे स्मारक बांधण्याचे सोडून…” ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका!

Mumbai Blast Terrorist Yakub Memon Grave Renovation : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीला सुशोभित करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनची कबर आहे. या कबरीला मार्बल्स आणि एलईडी लाईट्स लावण्यात आले होते आणि फुलांच्या पाकळ्यांनी ही कबर सजवण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी देखील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:28 (IST) 8 Sep 2022
मुंबई : मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे सलग दुसऱ्या दिवशी हाल

मुसळधार पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना फटका बसला आहे. आज संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतुक कोलमडली आहे. लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार कळवा आणि मुंब्रा दरम्यान जलद मार्गावर पाणी साचलेल्याने त्या मार्गावरील लोकल वाहतुक ठप्प आहे. तर धीम्या मार्गावरही लोकल वाहतुक रखडली आहे. ठाणे रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवर काही ठिकाणी पाणी साचले आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:17 (IST) 8 Sep 2022
पुणे : पाच दिवसांत पीएमपीला ८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रमुख सार्वजनिक वाहतूक असलेल्या पीएमपीला गणेशोत्सवातील पाच दिवसात ८ कोटी २७ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्याचबरोबरच विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

19:00 (IST) 8 Sep 2022
भाजप नेत्याचा वाढदिवस ठाणेदाराच्या अंगलट; चौकशी सुरू

बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य हरीश शर्मा यांचा वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याचा नवोपक्रम राबवणारे ठाणेदार उमेश पाटील यांची पोलीस खात्यामार्फत स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून राजुराचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

18:52 (IST) 8 Sep 2022
भाजपमध्ये इतके लोकं येतील की, मविआला उमेदवार मिळणार नाही – बावनकुळे यांचा दावा

येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पक्षामध्ये एवढे प्रवेश होईल की २०२४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांना उमेदवार मिळणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केला.

सविस्तर वाचा

18:46 (IST) 8 Sep 2022
सांगलीत विद्युत खांबाला धडकून जीपचा अपघात, दोघांचा मृत्यू

चालकाचा जीपवरील ताबा सुटल्यानंतर विद्युत खांबाला धडकून झालेल्या अपघातात दोन तरूण ठार झाले तर सहा तरूण जखमी झाले. सांगलीजवळील नांद्रे या गावी मध्यरात्री हा अपघात घडला असून या भीषण अपघातामध्ये जीपचे छत एकीकडे तर इंजिनसह  अन्य भाग एकीकडे पडला  होता.

सविस्तर वाचा

18:22 (IST) 8 Sep 2022
अमरावतीत आंतरधर्मीय विवाह प्रकरणाचा आरोप ; तरुणी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात

अमरावतीतून एका तरुणीचे अपहरण तसेच धमकावून आंतरधर्मीय विवाह करण्यात आल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित तरुणीला लोहमार्ग पोलिसांनी सातारा रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. खासदार नवनीत राणा यांनी या आंतरधर्मीय विवाह प्रकरणावरुन अमरावतीतील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना यासंदर्भातील आपले संभाषण ध्वनिमुद्रित केल्याचा जाब विचारुन गोंधळ घातला होता.

सविस्तर वाचा

18:10 (IST) 8 Sep 2022
अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या विशेष फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला

पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल.

सविस्तर वाचा

18:07 (IST) 8 Sep 2022
"मुंबई आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी आणि...", याकुब मेमन प्रकरणात किरीट सोमय्यांची मोठी मागणी

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीच्या सजावटप्रकरणी जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. याशिवाय बीएमसीचा इंजिनियर आणि विश्वस्तांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

18:01 (IST) 8 Sep 2022
पुणे : विसर्जन मिरवणूक लवकर आटोपण्याचा पोलिसांचा प्रयत्न ; मिरवणूक रेंगाळल्यास पोलीस आयुक्तांचे कारवाईचे आदेश

वैभवशाली परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर आटोपण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत खंड पडणे किंवा रेंगाळल्यास पोलिसांकडून मिरवणूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

17:40 (IST) 8 Sep 2022
गणेश विसर्जनासाठी वाहतूक पोलीस सज्ज

करोनाविषयक कडक निर्बंध हटविल्यानंतर यंदा जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या निमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक नियमनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांसह सुमारे १० हजार पोलिसांचा ताफा तैनात करण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा

16:41 (IST) 8 Sep 2022
पुणे : एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न

एटीएमची तोडफोड करुन चोरट्यांनी रोकड चोरीचा प्रयत्न केल्याची घटना कोंढवा भागातील कडनगर परिसरात घडली.याबाबत आयसीआयसीआय बँकेच्या कडनगर शाखेचे व्यवस्थापक अन्वर तांबोळी यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सविस्तर वाचा

16:05 (IST) 8 Sep 2022
लव्‍ह जिहादवर प्रश्‍नचिन्‍ह; ‘ती’ युवती एकटीच होती प्रवासात; पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिली माहिती

शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या मदतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा

15:51 (IST) 8 Sep 2022
ठाण्यात तडीपारीच्या कारवाईला वेग ; जिल्ह्यातून नऊ महिन्यात २७१ जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव

ठाणे पोलिसांनी गुंडाच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ६ सप्टेंबर या कालावधीत २७२ जणांविरोधात तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. २७२ पैकी १६३ जणांना ठाणे, पालघर, मुंबई आणि उपनगरातून एक महिना ते दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत तडीपार केले आहे.

सविस्तर वाचा

15:40 (IST) 8 Sep 2022
अमरावती : पोलिसांवर राग, मग सुरक्षा का घेता?; खा. नवनीत राणांना पोलीस कुटुंबीयांचा सवाल

पोलिसांवर तुमचा राग असेल, तर पोलिसांकडून सुरक्षा का घेता. केंद्रात, राज्‍यात तुमचे सरकार आहे, पोलिसांची सुरक्षा काढून का टाकत नाही, असा सवाल करीत पोलिसांच्‍या कुटुंबीयांनी खासदार नवनीत राणा यांच्‍यावर कारवाई व्‍हावी, अशी मागणी केली आहे.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 8 Sep 2022
बुलढाणा : याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणावरून आ. संजय गायकवाड यांचा गंभीर आरोप; संबंधितांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेनन याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे अलीकडच्या काळातील सर्वात लज्जास्पद बाब आहे. यावरून विरोधी पक्ष दहशतवादाचे समर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे, असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला. याप्रकरणी संबंधितांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली.

सविस्तर वाचा

15:27 (IST) 8 Sep 2022
ठाणे : पारसिक नगर ते वाशी रेल्वे स्थानक टीएमटीची बससेवा सुरू

महापालिका क्षेत्रातील अंतर्गत तसेच क्षेत्राबाहेरील मार्गांवर प्रवाशांच्या मागणीनुसार ठाणे परिवहन उपक्रमाची (टिएमटी) बससेवा सुरु करण्यात येत असतानाच, त्यापाठोपाठ अशाचप्रकारे प्रवाशांच्या मागणीनुसार परिवहन प्रशासनाने पारसिकनगर ते वाशी रेल्वे स्थानक अशी बससेवा सुरू केली आहे.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 8 Sep 2022
… मग याकुबचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात का दिला?; उगाच शेपट्या आपटत बसू नका – अरविंद सावंत

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:25 (IST) 8 Sep 2022
Yakub Memon Tomb : …तर ही कोणती मताची लाचारी होती? हे सर्व जनतेसमोर आलं पाहिजे – सुधीर मुनगंटीवार

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचं कोविड काळात सुशोभीकरण करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत. तर भाजपा नेत्यांकडून या मुद्य्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी...

15:13 (IST) 8 Sep 2022
विमानतळ बस सेवेचे आगाऊ तिकीट काढता येणार; बेस्ट उपक्रमाची उद्यापासून नवी सेवा

विमानाने मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना त्यांचा इच्छित स्थळी जाण्यासाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांना आता या बसचे आगाऊ तिकीट काढून आसन आरक्षित करता येणार आहे. त्यासाठी बेस्टच्या चलो अपद्वारे आगाऊ तिकीट काढता येईल, अशी माहीती बेस्ट उपक्रमाने दिली.

सविस्तर वाचा

14:41 (IST) 8 Sep 2022
काटई-बदलापूर रोडवर अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत रहिवाशाचा मृत्यू

काटई-बदलापूर रोडवर मोर्या ढाब्या समोर बुधवारी रात्री साडे अकरा वाजता पंक्चर झालेल्या मोटारीचे चाक बदलण्याचे काम सुरू असताना त्या मोटारीला पाठीमागून आलेल्या एका वाहनाने जोराने धडक दिली. या धडकेत मोटारी जवळील उभे असलेले एक दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या दोघांवर डोंबिवली एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना, त्यापैकी पतीचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

14:34 (IST) 8 Sep 2022
मुखपट्टी नियम उल्लंघनाप्रकरणी दाखल खटल्यांचे काय करणार ? ; उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

जानेवारी २०२१ पासून सुरू झालेली करोनाची साथ आणि त्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेले निर्बंध आता अस्तित्वात नाहीत. ही स्थिती लक्षात घेऊन मुखपट्टी न वापरणाऱ्यांवर दाखल केलेल्या गुन्ह्यांचे काय करणार ? हे स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.आपल्या या आदेशाची प्रत गृह सचिवांकडे विचारार्थ पाठवण्याचे आदेशही न्यायमूर्ती नितीन जामदार आणि नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने दिले.

सविस्तर वाचा

14:32 (IST) 8 Sep 2022
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर १६ सप्टेंबरला सुनावणी ? ; ईडीला अर्जावर उत्तर दाखल करण्याचे आदेश

पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिले. १६ सप्टेंबर रोजीच राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 8 Sep 2022
वर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे; डॉ. गौरव वेदप्रकाश मिश्रा प्र-कुलगुरू

सावंगीच्या दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. ललित वाघमारे यांची तर प्र-कुलगुरूपदी डॉ. गौरव वेदप्रकाश मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे. मिश्रा कुटुंबात चार सर्वोच्च पदे येण्याचा विक्रम यानिमित्ताने घडला आहे.

सविस्तर वाचा

14:16 (IST) 8 Sep 2022
आंबिवली रेल्वे स्थानकात थेट फलाटावर रिक्षा आणणाऱ्या चालकाला अटक

रेल्वे स्थानकातील फलाटावर रिक्षा चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे हे माहिती असुनही आंबिवलीतील एका बेशिस्त रिक्षा चालकाने सोमवारी रेल्वे सुरक्षा जवानांच्या नकळत थेट फलाटावर रिक्षा आणून प्रवासी वाहतूक केली होती. या रिक्षा चालकाच्या या कृती बद्दल प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या बेशिस्त रिक्षा चालकाला रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शोध घेऊन मंगळवारी अटक केली.

सविस्तर वाचा

14:15 (IST) 8 Sep 2022
किरीट सोमय्यांचा शिवसेनेच्या आणखी एका मोठ्या नेत्यावर ५०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा तिसरा हात..."

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब यांच्यासह अनेक शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता त्यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्यावर गंभीर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. "उद्धव ठाकरे यांचा तिसरा हात असलेल्या रविंद्र वायकर यांनी जोगेश्वरीच्या २००० वर्षांपूर्वीच्या महाकाली गुफा आणि रस्त्यांच्या कामात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा केला," असा आरोप सोमय्यांनी केला. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

सविस्तर बातमी...

14:11 (IST) 8 Sep 2022
प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा शिवसेनेला टोला

प्रभाग कोणाचा बालेकिल्ला वैगरे नसतो, लोकांच्या मनात जावे लागते, धर्मवीर आनंद दिघे असतानाही या विभागातून स्वर्गीय रामचंद्र ठाकूर कधीच निवडणूक हरले नव्हते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. ठाकूर यांच्या पश्चात जेष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे हे त्यांचा वारसा पुढे चालवत असून त्याचबरोबर नागरिकांना अपेक्षित असणारे काम करत आहेत, असेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा

14:00 (IST) 8 Sep 2022
डोंबिवलीतील नांदिवली नवनीत नगरला नागरी समस्यांचा विळखा ; वेळेवर बस नाही, रिक्षा चालकांची मनमानी

डोंबिवली पूर्वेतील नांदिवली येथील नवनीत नगर भागात पाच ते सहा हजार नागरिकांची वस्ती आहे. या भागातील नागरिकांना वेळेवर केडीएमटी बस सुविधा नाही. रिक्षा चालक मनमानीने भाडे आकारत आहेत. नवनीत नगर परिसराला फेरीवाल्यांचा विळखा पडला असताना पालिका अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जात नाही, अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी केल्या.

सविस्तर वाचा

13:41 (IST) 8 Sep 2022
नागपूर : सावधान, लग्नाचे आश्वासन देऊन विवाह नोंदणी संकेतस्थळावरील नवरदेवाने उकळले ३ लाख

विवाह नोंदणी संकेतस्थळावरून ओळखीनंतर लग्न ठरलेल्या नवरदेवाने होणाऱ्या पत्नीकडून तीन लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला लग्नास नकार दिला. याप्रकरणी सदर पोलिसांनी सुमित महादेव बोरकर (४०, रामनगर, गोंदिया) याला अटक केली.

सविस्तर वाचा

13:35 (IST) 8 Sep 2022
शिंदे गटाच्या शिवसेनेला नागपूरमध्ये पदाधिकारी सापडेना, केवळ तीनच नियुक्त्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भात शिवसेनेची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, त्यांना जिल्ह्यात पदाधिकारी सापडत नसून फक्त तिघांनाच नियुक्त्या दिल्यावरून उघडकीस आले आहे. चौथा पदाधिकारीसुद्धा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे ही कार्यकारिणी शिवसेनेची नसून बंडखोर गटाची आहे.

सविस्तर वाचा

13:16 (IST) 8 Sep 2022
दुबईतून नागपुरात सोन्याची तस्करी, विमानातून उतरताच तिघांनी केली लुटमार

दुबईतून हातोडा आणि छन्नीच्या स्वरूपात सोने तस्करी करून नागपुरात आणणाऱ्या गोरखपूरच्या एका व्यक्तीला नागपुरात तिघांनी पाठलाग करून लुटले. या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी तिघांना अटक केली.राहुल यादव (आजमगढ), अक्रम मलिक (नागोर, राजस्थान), ईरशाद खान (नागोर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सविस्तर वाचा

13:03 (IST) 8 Sep 2022
गडचिरोली: नरभक्षी वाघाने घेतला पुन्हा एक बळी ; उसेगाव परिक्षेत्रातील घटना

वरंब्या गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या शेतकऱ्यावर सीटी १ वाघाने हल्ला करून त्याचा बळी घेतला. आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास देसाईगंज तालुक्यातील उसेगाव परिक्षेत्रात ही घटना घडली.प्रेमपाल तुकाराम प्रधान (४५, रा. उसेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 8 Sep 2022
पुणे : अजित पवार यांनी घेतली नाना पाटेकर यांची भेट ; डोणजे येथील फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यावर दोन तास चर्चा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ज्येष्ठअभिनेते नाना पाटेकर यांच्या फार्म हाऊसवर जाऊन गणरायाचे दर्शन घेतल्यानंतर, राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही आज सकाळी साडेसातच्या सुमारास पाटेकर यांच्या फॉर्मवर जाऊन भेट घेतली.

सविस्तर वाचा

12:57 (IST) 8 Sep 2022
पुणे : विसर्जन दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजार सुरूच

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील भाजीपाला बाजाराचे कामकाज अनंत चतुर्दशीच्या दि‌वशी (९ सप्टेंबर) नियमित सुरु राहणार आहे. मार्केट यार्डातील घाऊक भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुल बाजाराचे कामकाज शुक्रवारी (९ सप्टेंबर) सुरू राहणार आहे.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 8 Sep 2022
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांमध्ये यंदा गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक पाऊस ऑगस्टअखेरपर्यंत पडला असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. सन २०२० आणि सन २०२१ या दोन वर्षांत ऑगस्टपर्यंत पडलेल्या पावसापेक्षा यंदा जास्त पाऊस पडला आहे.

सविस्तर वाचा

12:56 (IST) 8 Sep 2022
पिपंरी : अजित पवार,अमित ठाकरेंची आज गणपती मंडळांना भेट; पालिका निवडणुकीसाठी मॅरेथॉन जनसंपर्क मोहीम

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात गणपती मंडळांना भेटी देण्याचा सपाटा सर्व पक्षीय नेत्यांचा सुरू आहे. आज माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार आणि मनसेचे अमित ठाकरे हे पिंपरी-चिंचवड शहरातील गणपती मंडळांना भेट देणार आहेत.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 8 Sep 2022
अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना तातडीची मदत द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश; हवामान विभागाकडून १४ जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट

राज्यभरात बुधवारी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत पुरवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 8 Sep 2022
“त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्याचा संताप, म्हणाले “नादाला लागलात तर…”

“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे.

सविस्तर वाचा...

12:22 (IST) 8 Sep 2022
Yakub Memom Grave: भाजपा प्रदेशाध्यक्षांनी उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य, मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केल्याचा आरोप, म्हणाले “माफी…”

१९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण केल्याचे समोर आल्यानंतर भाजपाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. दहशतवाद्याच्या कबरीचे सुशोभीकरण म्हणजे देशद्रोह आहे, असा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

सविस्तर वाचा...

12:13 (IST) 8 Sep 2022
मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रीजवर भीषण अपघात; १४ जण जखमी

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर हमरापूर फाटा ब्रिजवर पहाटे २ वाजता टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात

टेम्पो ट्रॅव्हलरमधील एकूण २२ प्रवाशांपैकी १४ प्रवासी जखमी झाले आहेत. कोकणातून मुंबईचा परतीचा प्रवास करताना हा अपघात झाला आहे.

सविस्तर बातमी...

11:53 (IST) 8 Sep 2022
“त्यांची लायकी काय?” नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्यानंतर शिवसेना नेत्याचा संताप, म्हणाले “नादाला लागलात तर…”

“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं” असे म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंवर एकेरी शब्दात टीका केली होती. या टीकेवर हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी पलटवार केला आहे. “उद्धव ठाकरेंना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. शिवसेनेच्या नादाला लागल्यास आगामी २०२४ मधील निवडणुकीत आम्ही राणांना त्यांची जागा दाखवून देऊ”, अशी टीका वानखेडे यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

11:52 (IST) 8 Sep 2022
गडचिरोलीतील हत्ती गुजरातला हलविण्याबाबत लोकप्रतिनिधींचे ‘वरातीमागून घोडे’ ; समाजमाध्यमावर नागरिकांचा संताप

एक एक करून गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती गुजरातला हलविण्यात येत आहे. तरीही या भागातील लोकप्रतिनिधी कृती करण्याऐवजी केवळ माध्यमांना प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानत असल्याने नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. समजमाध्यमांवर या नेत्यांवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

सविस्तर बातमी...

11:52 (IST) 8 Sep 2022
‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा, भाजपा म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे, इतकी निर्लज्ज…”

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. एकीकडे भाजपाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हे सुशोभीकरण करण्यात आल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा केली आहे.

सविस्तर बातमी

11:52 (IST) 8 Sep 2022
अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक, फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांच्याभोवती फिरत होती अज्ञात व्यक्ती, मुंबई पोलिसांकडून अटक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर बातमी...

11:51 (IST) 8 Sep 2022
Asia Cup 2022: पाकिस्तानच्या आसिफ अलीने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

आशिया कपमध्ये बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघामध्ये पार पडलेल्या सामन्यात मैदानातच खेळाडू भिडल्याचं पहायला मिळालं. पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅट उगारल्याने काही काळासाठी तणाव निर्माण झाला. यानंतर अफगाणिस्तानच्या काही खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण मैदानातील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून, चर्चेचा विषय ठरत आहे.

सविस्तर बातमी

11:51 (IST) 8 Sep 2022
‘याकुबचा मृतदेह कुटुंबाकडे का सोपवला?’, काँग्रेसची विचारणा, भाजपा म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे, इतकी निर्लज्ज…”

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी याकुब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. मरिन लाईन्स परिसरातील बडा कब्रिस्तानमध्ये मेमनच्या कबरीभोवती टाइल्स आणि एलईडी लाइट्स लावण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि कारवाई करण्यात आली. दरम्यान, यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरु झाले आहेत. एकीकडे भाजपाने महाविकास आघाडीच्या कार्यकाळात हे सुशोभीकरण करण्यात आल्याने उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसनेही याकुब मेमनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाकडे का सोपवला? अशी विचारणा केली आहे.

सविस्तर बातमी...

11:50 (IST) 8 Sep 2022
अमित शाह यांच्या सुरक्षेत मोठी चूक, फडणवीसांच्या निवासस्थानी त्यांच्याभोवती फिरत होती अज्ञात व्यक्ती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यात मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असताना एक अज्ञात व्यक्ती सुरक्षा भेदत त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी अमित शाह आणि इतर राजकीय नेत्यांच्या भोवती वावरत होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील खासदाराचा पीए असल्याचा दावा करणाऱ्या या व्यक्तीला मलबार हिल पोलिसांनी अटक केली आहे.

सविस्तर बातमी

Maharashtra Live News Updates Maharashtra Mumbai live news updates

मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट