Mumbai- Maharashtra News Updates, 07 september 2022 : महाराष्ट्रात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे राज्यातील राजकीय वर्तुळात देखील वेगवेगळ्या सत्तासमीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांच्या निवासस्थानी गणरायाच्या दर्शनासाठी हजेरी लावली. मात्र, त्यातून शिंदे गट आणि मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील सुनावणी देखील २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
Maharashtra News : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यवरांच्या गणपतींसह विविध मंडळांच्या श्रीगणेशाचे दर्शन घेण्याचा सपाटा गेल्या काही दिवसांपासून लावलेला आहे. त्यातच, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही तोच कित्ता गिरवला आहे. गुरूवारी (८ सप्टेंबर) अजितदादा पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. फक्त गणेश मंडळांच्या भेटींचा कार्यक्रम, असे या दौऱ्याचे स्वरूप असणार आहे.
गेली दोन वर्षे साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा झाल्याने यंदाचा उत्सव आवाजी झाल्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशास्त्र विद्यापीठाने केलेल्या पाहणीतून दिसून आले. गणेशोत्सवातील पहिल्या पाच दिवसांमध्ये शहराच्या विविध भागात ध्वनिपातळी ८० ते ९० डेसिबलवर गेल्याचे असल्याचे आढळून आले. सर्वसाधारण दिवशी ही पातळी ६० डेसिबलपर्यंत पोचते.
सूस खिंडीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची भिंत आत घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्यात यावी. तसेच सेवा रस्ता जलदगतीने पूर्ण करून पाषाण सूस उड्डाणपुलासाठी अधिग्रहण केलेल्या जागेचा मोबदला तातडीने देण्यात यावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
पुण्याच्या पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रस्तावित करण्यात आलेल्या सात गावांमधील ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बुधवारी निवेदन दिले. प्रकल्पाला जमिनी देण्यास विरोध असून याबाबतचे ठराव ग्रामपंचायतींकडून पारित करण्यात आले आहेत.
जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी वाहन चालकाकडे १० हजार रूपये लाच मागितल्याप्रकरणी चाकण येथील वाहतूक पोलीस व त्याचा सहायक (वॉर्डन) अशा दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली.
कल्याण-डोंबिवली लोकसभेच्या जागेवर भारतीय जनता पक्षाने दावा केल्याची मला माहिती नाही. मात्र यापुढील सर्व निवडणुका भाजप-शिवसेना युती म्हणून लढविणार आहे. भाजप नेते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यात बुधवारचा दिवस पावसाचाच ठरला. शहर आणि परिसरात विविध भागात सकाळपासूनच पावसाची हजेरी होती. या कालावधीत काही भागांत मुसळधारा कोसळल्या. दिवसभराच्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहन चालकही हैराण झाले.
भाजपकडून बारामती तथा मुंबईसाठी कोणतेही ‘मिशन’ नाही, अशी स्पष्टोक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पिंपरीत पत्रकारांशी बोलताना केली. भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीचे सरकार राज्यात प्रस्थापित होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जेवढे उमेदवार दिले जातील, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपची आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भारतीय जनता पक्षासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे. शिंदे गटाचे जे लोक आमच्याबरोबर आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही दावा करणार नाही. शिवसेनेच्या उर्वरीत जागांबाबत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
अभिनेता अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्याच्या २०२० सालच्या प्रकरणात केआरके नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेता कमाल आर. खान याला बुधवारी कनिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर केला. खान याला मंगळवारीही २०२१ सालच्या विनयभंगाच्या प्रकरणात जामीन मिळाला होता. त्यामुळे खान हा गुरूवारी कारागृहातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
विविध तेल आणि गॅस कंपन्यांमुळे चेंबूर परिसरात दिवसरात्र अजवड वाहनांची ये-जा सुरू असून याचा मोठा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. अवजड वाहनांमुळे शाळेत जाण्या-येण्याच्या वेळेत चेंबूर परिसरात मोठी वाहतूक कोडी होत आहे. परिणामी, या भागातील शाळांच्या वेळेमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आगामी दसरा मेळाव्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच निर्णय घेतील असही स्पष्ट केले. तसेच, “ आम्ही व्यापक हिंदुत्वासाठी काम करत आहोत. न्यायालयाच्या निर्णयाबाबत भाष्य करणे योग्य होणार नाही. आम्हाला जे काही करायचे ते आम्ही महाराष्ट्रासाठी करू, राजकारण अजिबात करणार नाही.” असं देखील सांगितलं. वाचा सविस्तर बातमी…
एका शिक्षिकेच्या मोबाईलवर रात्रीच्या वेळी कॉल करून मला तुमची आठवण येत आहे, असे म्हणणाऱ्या एका शिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा तर शिक्षिकेने मुख्याधिकारी यांच्याकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्यांना धमकावणाऱ्या दोन महिलांविरुद्ध दर्यापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. राऊत सोमवारीच विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. तेव्हा विशेष न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ सप्टेंबरपर्यंत वाढ केली.
आयकर विभागाने मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. यात दिल्ली, हरियाणा आणि गुजरातचाही समावेश आहे. दिल्लीत टॉप थिंक टँक, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (CPR) या संस्थांवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने नोंदणी असलेल्या मात्र मान्यता न मिळालेल्या २० पेक्षा अधिक राजकीय पक्षांच्या फंडिंग प्रकरणी ही कारवाई केली आहे.
राज्यातील विविध १८ जिल्ह्यांतील ८२ तालुक्यांमधील १ हजार १६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १४ ऑक्टोबर २०२२ रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.
दोन वर्षे करोनामुळे निधीकपात, यंदा घसघशीत निधी मिळाल्यावर नव्या सरकारकडून कामांना देण्यात आलेली स्थगिती आणि आता पालकमंत्रीच नसल्याने पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये केवळ १.९२ टक्केच विकास निधी आतापर्यत खर्च होऊ शकला.
यंदा शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्यावतीने घेण्यात आलेल्या गणेश दर्शन स्पर्धेत ठाणे आणि कल्याणमधील विजेत्या गणेश मंडळांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये ठाणे शहरात कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने तर, कल्याण मध्ये जोशीबागेतील शिवनेरी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख (शिंदे गट) नरेश म्हस्के यांनी दिली.
दिल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या नव्या संसद भवनाचे व त्याला जोडणाऱ्या पथावरील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी (८ सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास यांच्या संकल्पनेअंतर्गत पुण्यातील २५ कलाकार ‘स्वातंत्र्यमंगलगान’ सादर करणार आहेत.
ठाणे : ठाण्यात बुधवारी सांयकाळपासून विजेच्या कडकडाट आणि वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून कामावरून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले आहेत. बातमी वाचा सविस्तर…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांना भेट दर्शन घेतले, आरतीही केली. मानाचा पाचवा केसरी वाडयातील गणपतीचे दर्शन घेतल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महिन्यापासून आजारी असलेल्या कसबा विधान सभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या घरी जाऊन तब्येतीची विचारपूस केली.
मध्यमवर्गीयांच्या मनात आता रेल्वेच्या बाबतीत राग पेटत आहे. ते आता रेल्वेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. सकाळच्या वेळेत सर्व प्रवाशी अर्धा तास आधी येऊन रेल्वेस्थानकात फलाटावरच मांडी घालून बसले तर काय होईल, असा इशारा देत बंदूकधारी पोलीस निशस्त्र लोकांना घाबरवतात, हे आता जनता सहन करणार नसल्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिला.
सव्वा वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अपात्र ठरलेल्या जिल्ह्यातील १९१ उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आता त्यांना पुढील निवडणुका लढण्यास पात्र ठरवण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी अलीकडेच त्यांना पात्र ठरवले आहे. बातमी वाचा सविस्तर…
भाविकांनी सात दिवसांच्या गणपतीला मंगळवारी निरोप दिला. बुधवारी पहाटेपर्यंत १४ हजार ८४५ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आता दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जन सोहळ्याची तयारी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली आहे.
पंजाबमधील व्यापारी लखविंदर सिंग हे व्यवसायानिमित्ताने नागपूरला येत होते. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगा प्रवास करीत होता. पहाटे चारच्या सुमारास त्यांच्या बॅगमधून दागिने चोरी गेले. त्या बॅगमध्ये अंगठी, सोन्याची साखळी, बांगड्या, कानातील रिंग आणि इतर एकूण १३०० ग्रॅम सोन्याचे दागिने होते.
ग्रामीण भागातून नागपुरात अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी आलेल्या मुलीकरिता कुटुंबीयांनी लग्नासाठी मुलगा बघताच मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी (१९, कन्नड-कामठी) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैष्णवी ही अभ्यासात हुशार होती. तिला अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करायचे होते.
लोहगावमधील यश हॅाटेलच्या मागे मोकळ्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये मटका अड्डा सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. जुगार घेणाऱ्या आणि खेळणाऱ्या बारा जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून २० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशीरा गणेश विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नयेत यासाठी मध्य रेल्वेने दहा विशेष लोकल फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी वाचा सविस्तर…
डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर मधील एक रहिवाशाकडे शेजाऱ्याच्या एका तरुणाने गुटका खाण्यास मागितला. आपण गुटका खात नाही. आपल्या जवळ गुटका नाही, असे बोलताच संतप्त झालेल्या तरुणाने रहिवाशावर धारदार चाकुने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. सोमवारी रात्री ही घटना घडली. स्वतंत्रसिंग सिंग (३०, रा. सिताबाई चाळ, त्रिमूर्तीनगर, डोंबिवली पूर्व) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते सुतारकाम करतात. अजय बलवीर बोथ (२२, रा. त्रिमूर्तीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातील बारापेक्षा अधिक नागरिकांचा बळी घेणाऱ्या सीटी १ वाघाला पकडण्यासाठी ताडोबाहून विशेष पथक देसाईगंज वनपरिक्षेत्रात दाखल झाले आहे. सध्या हा नरभक्षी वाघ उसेगाव कोंढाळा परिक्षेत्रात असल्याने या भागातील नागरिक दहशतीत आहे.
शिलाँग येथील आसाम रायफल्स ज्युनिअर स्कूलच्या माजी मुख्याधापिका क्रांती मुकुंद नातू (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. बातमी वाचा सविस्तर…
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मंगळवारी सायंकाळी सहकुटुंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या सरकारी निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आहे. राज सुमारे ४० मिनिटं मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या ‘वर्षा’ बंगल्यावर होते. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदेंनी १ सप्टेंबर रोजी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं. येथे वाचा सविस्तर वृत्त
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका करताना “त्यांना जमीन दाखवण्याची वेळ आली आहे” असं विधान केलं. या विधानावर आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली असून भाजपाला साथ देणाऱ्या एकानाथ शिंदे गटातील आमदारांचाही अगदी दोन शब्दांमध्ये समाचार या विषयावर भाष्य करताना घेतला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बुधवारी आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. सक्तवसुली संचलनालयाने राऊत यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत एक ऑगस्ट रोजी अटक केली आहे. पात्रा चाळ प्रकरणातील गैरव्यवहाराप्रकारणामध्ये ईडीने राऊत यांना अटक केली आहे. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त
जितेंद्र आव्हाड यांना काय बोलायचे आहे ते बोलू द्या. २०२४ च्या निवडणूका होतील तेव्हा बघू कोणाच्या पायाखालची वाळू सरकते. पंतप्रधान मोदींच्या स्वप्नांना साथ देण्याचे काम बारामतीकर नक्की करतील असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. बातमी वाचा सविस्तर…
एखाद्याचा अश्वमेध रोखल्यावर जो त्रास होतो, तो त्रास शरद पवारांच्या बारामतीत भाजपाला होत आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. जयंत पाटील यांनी भाजपा नेत्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
"बारामतीत सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण पवारांना…," जयंत पाटील यांचं भाजपा नेत्यांना प्रत्युत्तर; म्हणाले "तुम्हाला शोभत नाही" https://t.co/VEuGlhXWAv @NCPspeaks @BJP4Maharashtra
— LoksattaLive (@LoksattaLive) September 7, 2022
काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या आधी राहुल गांधी यांनी भावनिक संदेश दिला असून, द्वेषाच्या राजकारणामुळे आपण आपल्या वडिलांना गमावलं आहे, पण आपला देश गमावण्यासाठी तयार नाही असं म्हटलं आहे. कन्याकुमारी येथून काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ भव्य यात्रेला सुरुवात होणार असून, राहुल गांधींनी त्याआधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरुंबदुर येथील वडिलांच्या स्मृतीस्थळाला भेट देत अभिवादन केलं.
पिंपरी : मृत श्वानांची विल्हेवाट लावणाऱ्या नेहरूनगर येथील दहन मशिनमध्ये (पेट इन्सिनेरेटर) बिघाड झाला आहे. त्यामुळे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत दुरुस्ती कामानिमित्त दहन मशीन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे श्वान मालकांची या काळात मोठी गैरसोय होणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
पुणे : देशात चीनच्या आर्थिक, परराष्ट्र, व्यापार आणि संरक्षणविषयक धोरणांचे विश्लेषण करू शकतील, अशा तज्ज्ञांची कमतरता आहे. त्यामुळे चीनविषयक विश्वासार्ह माहिती आपल्याला मिळत नाही. चीनच्या धोरणांचे योग्य विश्लेषण होत नाही,’ अशी खंत माजी परराष्ट्र सचिव श्याम सरण यांनी व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर…
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील हनुमान नगर भागात एका बेरोजगार मुलाने पैशाच्या कारणावरुन आपल्या आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळून घरात खून केला. हा खुनाचा प्रकार लपविण्यासाठी त्याने तिला घराच्या छताला लटकून तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. बातमी वाचा सविस्तर…
कल्याण : येत्या पाच वर्षात कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत स्मार्ट सिटीतील अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण करून स्मार्ट कल्याण डोंबिवलीची स्वप्ने पाहणाऱ्या पालिका प्रशासनाने, प्रशासनातील विविध विभागातील विकास कामे मार्गी लावण्यासाठी नवोदित उमद्या नवतरुण पदवीधर अभियंत्यांची भरती करण्या ऐवजी सेवानिवृत्त अभियंत्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी, नवोदित अभियंत्यांमध्ये प्रशासनाच्या या निर्णया बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. बातमी वाचा सविस्तर…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरु आहे. अमित शाह यांनी ‘उद्धव ठाकरेंना धडा शिकवा’ असा आदेश दिल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून त्यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनीही अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं असून, ‘मुंबईत मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती दोन्ही पाहिले’ असा टोला लगावला आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली असून ते निराशेतून बोलत असल्याचं म्हटलं आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भारतातील सर्वात मोठ्या वाहन चोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ पाठपुरावा केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनिल चौहानला बेड्या ठोकल्या आहेत. अनिल चौहान याच्यावर पाच हजाराहून अधिक गाड्या चोरल्याचा आरोप आहे. अनिल चौहान आपल्या जीवशैलीमुळे ओळखला जात होता. त्याला महागडे कपडे, सोन्याचं ब्रेस्लेट यांची आवड होती. विशेष म्हणजे त्याच्याकडे तब्बल १० कोटींचा व्हिला होता.
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी. प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राने प्रसिद्ध केले. मात्र, विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाकडून स्थानिक विद्यार्थ्यांसाठी पेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होत नसल्याचे चित्र आहे. बातमी वाचा सविस्तर…
गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत गणेशोत्सव निमित्त प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अडीच हजार किलोचा महाप्रसाद ( सताळलेली डाळ ) तयार करण्यास बुधवारीसकाळी ९ वाजतापासून सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला भेट देत शुभेच्छा दिल्या. बातमी वाचा सविस्तर…
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंना सूचक इशारा दिला आहे. “उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या”, असे विधान सोमय्या यांनी केले आहे. यावर शिवसेना नेते अनिल परबांनी प्रत्युत्तर दिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी लहान, मोठे १५ हजार उद्योग व्यवसाय आहेत. मात्र, त्यातील काही उद्योगांना गेल्या १७ तासांपासून ब्रेक लागल्याचे चित्र आहे. कारण, गेल्या १७ तासांपासून सेक्टर नंबर सात येथील वीज गेल्याने याचा थेट परिणाम ३५० उद्योगावर झाला आहे. बातमी वाचा सविस्तर…
नोंदणी व मुद्रांक विभागाने घरांची ई-नोंदणीला सुरुवात केली आहे. याला विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत चार हजार घरांची ई-नोंदणी झाली आहे. यापैकी एक हजार घरे एकट्या म्हाडाच्या गृहप्रकल्पातील आहेत. बातमी वाचा सविस्तर…
‘निवडणूक चिन्हासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीला स्थगिती देऊ नये’, असा अर्ज मंगळवारी (६ सप्टेंबर) शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. त्यावर, आज (७ सप्टेंबर) तातडीने सुनावणी घेण्यात आली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ स्थापन करण्यात आले. त्यापुढे ही सुनावणी झाली असून या घटनापीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली आहे. यावर आता २७ सप्टेंबरला सुनावणी होऊन निर्णय येणार आहे.
मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट
Maharashtra News: राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!