Maharashtra Politics Updates : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री २ ते अडीचच्या समुरास चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला सहा ठिकाणी जखमा झाल्याचं वृत्त आहे. यासाठी त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे बॉलिवूड विश्व हादरलं असून, गेल्या काही दिवसांपासून वांद्रे येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्याने अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे, कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार आहेत. तसंच, वाल्मिक कराडप्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. वाल्मिक कराड समर्थकांनीही त्यांच्या सुटकेसाठी आंदोलन सुरूच ठेवले आहे. यासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.
Marathi Live News Update Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
बीकेसीत आजपासून तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शन, एकाच ठिकाणी घरखेरदीचे पर्याय उपलब्ध होणार
मुंबई : क्रेडाय-एमसीएचआयतर्फे १७ ते १९ जानेवारी या कालावथीत वांद्रे -कुर्ला संकुल येथील जीओ वर्ल्ड सेंटरमध्ये ३२ वे मालमत्ता प्रदर्शन भरविण्यात आले असून या मालमत्ता प्रदर्शनाचे मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि मुंबई पोलीस आयुक्त फणसळकर यांच्या हस्ते शुक्रवार, १७ जानेवारी रोजी करण्यात येणार आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत सुरेश धस यांचं मोठं विधान; म्हणाले, "राजीनामा घेणं आणि न घेणं..."
"मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं आणि न घेणं हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीमधील अंतर्गत असलेल्या विषयांवर बोलणार नाही. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचा कोणावर दबाव वाढला आहे का? की नाही? किंवा कोणावर दबाव नाहीच. याबाबत जो काही विचार करायचा तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी करावा. सुनील तटकरे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत निर्णय घ्यावा. माझ्या सारख्या पामर व्यक्तीने राष्ट्रवादीतील अंतर्गत गोष्टींवर काय बोलावं?", असं सुरेश धस यांनी म्हटलं.
कालवा सल्लागार समिती बैठकांची सूत्रे जलसंपदा मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांअभावी पुढाकार
नाशिक : पालकमंत्र्यांअभावी अनेक जिल्ह्यात रखडलेली पाणी आरक्षण प्रक्रिया आता जलसंपदामंत्र्यांच्या पुढाकारातून मार्गी लावली जात आहे. अहिल्यानगर पाठोपाठ नाशिकमध्ये जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन रब्बी आणि उन्हाळ हंगामाच्या नियोजनावर शिक्कामोर्तब केले.
चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
पिंपरी : चाकण-शिक्रापूर मार्गावर एका कंटेनरने पोलिसांच्या वाहनासह आठ वाहनांना धडक दिली. यात एका लहान मुलीसह पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने वेळेतच वाहनातून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला आहे. नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून चोप दिला आहे.
एम्समधील शवविच्छेदनाची स्थिती आता एका ‘क्लिक’वर, पोलीस, नातेवाईकांची पायपीट थांबणार
नागपूर : उपराजधानीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) होणाऱ्या शवविच्छेदन अहवालाची स्थिती आता एका क्लिकवर पोलीसांसह नातवाईकांनाही कळणे शक्य होणार आहे. एम्सद्वारे तयार पोर्टलवर ही माहिती अपलोड केली जाईल. त्यामुळे हे अहवाल तयार झाले काय? यासाठी पोलीसांसह नातेवाईकांची रुग्णालयातील पायपीट थांबणार आहे.
'संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरच...', सुरेश धस यांनी दिली महत्वाची माहिती
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबत भाजपा आमदार सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना निवदेन दिलं होतं. आज माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश धस यांनी माहिती देताना म्हटलं की, 'लवकरच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती मला मिळाली आहे', असं सुरेश धस म्हणाले.
माहीम खाडीतील मृतदेहाप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई : माहीम खाडी परिसरात सापडलेल्या मृतदेहाप्रकरणी मुंबई पोलिसांनी गुरुवारी हत्येचा गुन्हा दाखल केला. मृतदेहावर गंभीर जखमा असून त्याचे हात-पाय बांधून फेकण्यात आले होते. प्राथमिक पाहणीत हा हत्येचा प्रकार वाटत असून मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आसल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे हजारो लाडके भाऊ बेरोजगार होणार? काय आहे कारण?
नागपूर: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकषात न बसणाऱ्या ‘बहिणीं’नी योजनेतून नाव कमी करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि महिला बाल कल्याण विभागाच्या लेखाशीर्षावर पैसे भरावेत, अशी सूचना महिला व बालकल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यांनी केली आहे.
सैफवरील हल्ला राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा; नाना पटोले यांची टीका
नागपूर : चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर त्यांच्या घरी चाकूने हल्ला झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू आहेत. यापूर्वी माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या झाली होती तर चित्रपट अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांपासून कायदा सुवस्थेचे धिंडवडे निघाले आहे.
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
पुणे : जादा कमाईचे आमिष आणि अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून हडपसर परिसरातील दोघांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. जादा कमाईचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एकाला तब्बल १५ लाख १५ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना १० सप्टेंबर ते ११ नोव्हेंबर २०२३ कालावधीत हडपसरमध्ये घडली आहे.
सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
पोलिसांनी यासंदर्भात पूर्ण माहिती दिली आहे. हा हल्ला कोणी केला, कशातून हा हल्ला झाला याविषयी पोलिसांनी सविस्तर सांगितलं आहे - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा गृहमंत्री
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत करण्याची मागणी
सांगली : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातील विजयनगर येथे करण्याची मागणी जनसुराज्य युवाशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे. यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी १७ तारखेला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीत कुलगुरूंसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
कदम यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन उपकेंद्र मागणीचे निवेदन दिले. या वेळी कदम यांनी सांगितले, गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठाच्या आधीसभेत मंजुरी मिळूनही सांगलीतील उपकेंद्र रखडले आहे. या उपकेंद्राचा फायदा सांगली, मिरज, कवठेमंकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव, आटपाडी या तालुक्यांना होणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे. तसेच सांगलीत विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासकीय जागा असून या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांना ते सोयीचे होणार आहे.दि. १७ जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये प्राधान्य क्रमाने कुलगुरूंशी चर्चा करून उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यपाल तथा कुलपती यांनी दिले असल्याचे कदम यांनी सांगितले.
अहमदाबादमधून फरारी सराईत पाच गुंडांना कराडजवळ अटक, तळबीड पोलिसांची कारवाई
कराड : अहमदाबाद परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात पाच गुंडांनी दिल्लीमार्गे गोव्यात येऊन मौजमजा केली. त्यानंतर कोल्हापूरमध्ये देवदर्शन करून, ते मुंबईला जात असताना तळबीड पोलिसांनी नियोजनबध्द सापळा रचून पाचही गुंडांच्या मुसक्या आवळल्या. मिहिर बल्लदेवभाई देसाई (वय २२), प्रिन्स बजरंगलाल जागीड (वय २३), पवन कनुभाई ठाकूर (वय २५), कैलास कमुरचंद दरजी (वय ३४) आणि जिग्रेशभाई अमृतभाई रबारी (२६, सर्व रा. अहमदाबाद राज्य- गुजरात) अशी या गुंडांची नावे आहेत. त्यांना अहमदाबाद पोलिसांनी याब्यात घेतले.
मुंबई : उल्लंघन करणाऱ्या ४७७ बांधकामांना नोटीस, ३३ प्रकल्पांना काम थांबविण्याचे म्हाडाचे आदेश
मुंबई : प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पांसह म्हाडा गृहप्रकल्प योजनेतील बांधकामांविरोधात कठोर कारवाई करण्यास मुंबई मंडळाने सुरुवात केली आहे.
तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय
मुंबई : वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये सरकारी यंत्रणांनी मूलभूत मानवी हक्कांचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे उच्च न्यायालयाने अधोरेखित केले. तसेच, २०१० डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाय गमावलेल्या एका मुलाला भरपाई देण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेला दिले.
डोंबिवलीत उर्सेकरवाडीमधील स्कायवॉक जिन्याच्या पायऱ्यांवर प्रवाशांची घसरगुंडी
डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील कल्याण डोंबिवली पालिकेच्या स्कायॅवाॅकच्या जिन्याची एक मार्गिका उर्सेकरवाडीतील भाजी मंडईजवळ उतरते. या जिन्याच्या पायऱ्या आणि त्यावरील लोखंडी पट्ट्या गुळगुळीत आणि खिळखिळ्या झाल्या आहेत. या लोखंडी पट्ट्यांमध्ये प्रवाशांचे पाय, चपला अडकून प्रवासी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्याचे सोडून, नागपुरातील ठाणेदार विकतायेत तिकीट…. प्रत्येकाला तीनशे…
नागपूर : शहर पोलीस विभागाने येत्या २५ जानेवारीला ३ ते २१ किलोमीटर अंतराची अर्धमॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क १ हजार ते ५०० रुपये आहे. मात्र, या स्पर्धेत सामान्य नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील प्रत्येक ठाणेदारांना ३०० अर्ज भरुन देण्याची सक्ती केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असून ठाणेदार मात्र, तिकीट विक्रीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहेत.
Saif Ali Khan Health : “सैफच्या मणक्यात अडीच इंचाचं चाकूचं टोक अडकलं होतं, दोन शस्त्रक्रिया केल्या”, अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली सखोल माहिती!
अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने त्याला रुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला त्याला खोल जखमा झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानुसार, त्याच्यावर आज शस्त्रक्रिया पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे त्याची प्रकृती आता स्थिर असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. नितीन डांगे यांनी आज माध्यमांना दिली. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला.
वरळी अपघात : मिहीर शहावर खुनाच्या आरोपाप्रकरणी खटला चालवण्याची मागणी, उच्च न्यायालयाने घेतली दखल
मुंबई : गेल्या वर्षी जुलै महिन्यात वरळी येथे झालेल्या अपघात प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याच्यावर खुनाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्याच्या मागणीसाठी मृत महिलेच्या पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची दखल घेऊन न्यायालयाने मुंबई पोलिसांना नोटीस बजावली व याचिकाकर्त्याच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
मुंबई : टोरेस आर्थिक घोटाळ्याचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आरोपींबाबत माहिती मिळूनही त्यांना अटक करण्यासाठी वेळीच प्रयत्न केले नाहीत. परिणामी, आरोपींना पळून जाण्याची संधी मिळाली. त्यामुळे फरार आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार आहेत, असे ताशेरे उच्च न्यायालयाने बुधवारी ओढले.
दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात मोहीम, अन्न आणि औषध प्रशासनाने दुधाचे १०६२ नमुने घेतले
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाने दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी १५ जानेवारी रोजी संपूर्ण राज्यात सर्वेक्षण मोहीम राबवली. या मोहिमेंतर्गत राज्यातील विविध ठिकाणांहून दुधाचे तब्बल १ हजार ६२ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यामध्ये विविध नामांकीत कंपन्यांच्या पिशवीबंद दुधाच्या ६८० आणि सुट्या दुधाच्या ३८२ नमुन्यांचा समावेश आहे.
सविस्तर वाचा...
वसईत आरटीई प्रवेशासाठी १५३ शाळांत साडेतीन हजार जागा राखीव; प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
वसई: आर्थिक दुर्बल, मागासवर्गीय तसेच दिव्यांग घटकातील बालकांना नामांकित खाजगी शाळांमध्ये आरटीई अंतर्गत२५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसईतील १५३ शाळात ३ हजार ६३७ इतक्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज दाखल करावे लागणार आहेत.
सैफ अली खानच्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून महत्त्वाची माहिती; हल्ल्यामागचं कारण सांगत म्हणाले...
काल रात्री अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जी घटना घडली त्याअनुषंगाने आमची चौकशी सुरू आहे. आरोपीने पायऱ्यांचा वापर करून सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला. त्या आरोपीची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याला अटक करण्याकरता १० पथके विविध पातळीवर काम करत आहेत. आताच्या तपासात असं निष्पन्न होत आहे की चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात प्रवेश केला होता. आरोपीला अटक होताच पुढची माहिती दिली जाईल - मुंबई पोलीस
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
पिंपरी : पाच एकर शेतजमीन विकून जुगारात हारल्यानंतर पुण्यात येऊन घरपोच खाद्यपदार्थ पुरविण्याचे काम (डिलिव्हरी बॉय) करणाऱ्या तरुणाने ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून एक लाख ३७ हजार रुपयांचे १२५ ग्रॅम दागिने हस्तगत केले.
लष्करप्रमुखांकडून पुण्याचा गौरव, म्हणाले, 'लष्करासाठी पुणे ‘पॉवर हाउस’'
पुणे : ‘संशोधन आणि विकास, उत्पादनासाठी पुण्याचे महत्त्व मोठे आहे. दारूगोळा, वाहन उत्पादन अशा सर्वच बाबतीत पुणे ‘पॉवरहाउस’ झाले आहे,’ या शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्करासाठी पुण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी महिलेला दोन वर्षांनी अटक
मुंबई : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाच्या हत्येत सहभागी आलेल्या एका महिला आरोपीला दोन वर्षांनंतर चेंबूर पोलिसांनी अटक केली. सायरा खान (४२) असे या आरोपी महिलेचे नाव असून ती पवई येथे वास्तव्याला होता. दोन वर्षांपूर्वी चेंबूर परिसरात वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विशाल कांबळे यांच्या मुलाची सहा जणांनी हत्या करून त्याचा मृतदेह गुजरातमध्ये दडवून ठेवला होता. याप्रकरणी चेंबूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. मात्र गेली दोन वर्षे सायरा खान पोलिसांना गुंगारा देत होती. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून ती विविध राज्यांमध्ये फिरत होती. सायरा खान चेंबूर परिसरात येणार असल्याची माहिती चेंबूर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Video: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पोहोचले सैफ अली खानच्या घरी
सैफ अली खानच्या घरी घडलेल्या या घटनेबद्दल पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. सध्या पोलिसांचे पथक त्याच्या घरी चौकशी करत आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायकदेखील घटनास्थळी पोहोचले आहेत.
हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस, पोलिसांना संशय
सैफ अली खानच्या मदतनीसवर पोलिसांनी शंका उपस्थित केली आहे. ती हल्लेखोराला ओळखत असावी, असा त्यांना संशय आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजबद्दल त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
घरकाम करणाऱ्या महिलेला पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले; चौकशी होणार
वांद्रे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, घरातील नोकर एलियामा फिलिप्स उर्फ लिमा हिने पहाटे २ वाजता दरोडेखोरांना पहिले होते. तिने आरडाओरड करून खानच्या कुटुंबीयांना सूचना दिली. त्यानंतर खान जागा झाला आणि त्याने दरोडेखोराशी झटापट केली. त्यामुळे दरोडेखोराने त्याच्यावर धारदार वस्तूने हल्ला केला, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घरकाम करणाऱ्या लिमाला चौकशीसाठी वांद्रे पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. तिच्या उजव्या हाताच्या मनगटावर जखमा झाल्या आहेत. तिच्यावरच घुसखोराने प्रथम हल्ला केला होता.
वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
अकोला : वाशीम जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांसोबतच लागवडीच्या नव्या वाटा निवडत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चिया पिकाने अल्पावधीतच आकर्षित केले. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चांगला दर मिळाल्यामुळे चिया लागवडीकडे बळीराजा वळत असून जिल्ह्यात तीन हजार ६०८ हेक्टरवर उत्पादन घेतले जात आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह
Marathi Live News Update Today : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा