Sanjay Raut Arrest Maharashtra News : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल, सर्व घडामोंडीची माहिती एका क्लिकवर…: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांची १५ तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली आहे. राऊत यांना न्यायालयात हजर केलं असता, त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांना अटक केल्याप्रकरणी राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी सोमवारी प्रसिद्धपत्रक जारी करत माफीनामाच सादर केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या ‘एकनाथ शिंदे उद्याना’चे उद्घाटन करणार आहेत. स्वत:च्या नावाचं उद्यान आणि स्वत:च उद्घाटक असल्याने पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’ वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. राज्यातील आणि देशातील अशाच प्रमुख राजकीय घडामोडी आणि विविध अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर…

Live Updates

Maharashtra News Today 02 August 2022 : महाराष्ट्रातील सर्व प्रमुख अपडेट एका क्लिकवर…

20:09 (IST) 2 Aug 2022
ठाण्यात विधी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परिक्षेचा सर्व्हर डाऊन; तांत्रिक बिघाडामुळे शेकडो विद्यार्थी परिक्षेस मुकले

विधी (लॅा) अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परिक्षेच्या (सीईटी) कासारवडवली केंद्रावरील सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परिक्षेसंदर्भात कोणतीही ठोस माहिती दिली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक धास्तावले आहेत.

सविस्तर वाचा

20:05 (IST) 2 Aug 2022
मल्हारी मार्तंड खंडेराया, राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊ दे; मुख्यमंत्र्यांचे खंडोबाच्या चरणी साकडे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरी देवस्थान येथील श्री खंडोबारायाचे दर्शन घेतले.  राज्यातील बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडून राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे. राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी येऊदे, राज्याचा सर्वांगिण विकास होऊ दे. राज्यातील जनता सुखी होऊ दे, असे साकडे त्यांनी यावेळी खंडोबारायाच्या चरणी घातले.

सविस्तर वाचा

19:37 (IST) 2 Aug 2022
टीईटीतील माजी सैनिक आरक्षण नोंदीसाठी १० ऑगस्टची मुदत

शालेय शिक्षण विभागाच्या ३० जून २०२२च्या शासन निर्णयानुसार राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबीयांना ‘शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’मध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करण्यासाठी, तसेच नावातील स्पेलिंग किंवा जात संवर्ग दुरूस्ती उमेदवारांना १० ऑगस्टपर्यंत करता येईल.

सविस्तर वाचा

19:31 (IST) 2 Aug 2022
सांगली : ग्रामीण भागात नागपंचमी निमित्त लोकगीतांचा जागर

ग्रामीण भागात नागपंचमी पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली. करोना निर्बंधामुळे गेली दोन वर्षे केवळ औपचारिकता होती. यंदा निर्बंध हटविण्यात आल्याने गावोगावी नागोबा देवालयासमोर महिलांना लोकगीतं म्हणत फेर धरला. वाचा सविस्त बातमी…

19:22 (IST) 2 Aug 2022
“…याचा अर्थ राऊतांचा कार्यक्रम संपलाय” शरद पवारांच्या मौनावरून बंडखोर आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. सविस्तर बातमी

18:43 (IST) 2 Aug 2022
एकदा फसलो पुन्हा फसणार नाही, समविचारी पक्षांना सोबत घेऊन पुढे जाणार – शेकाप आमदार जयंत पाटलांचे विधान!

“राजकारणात एकदा फसलो, गद्दारीमुळे आमचा पराभव झाला पण यापुढे फसणार नाही. समविचारी पक्षांना सोबत घेऊन यापुढची वाटचाल करू राज्याचे राजकारण नव्याने घडवू.” असा आशावाद शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ते शेतकरी कामगार पक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते. शेकापच्या आगामी राजकारणाची दिशा काय असेल याचे स्पष्ट संकेत त्यांनी या निमित्ताने दिले. तसेच, वर्षभरात १०० कोटींचा पक्षनिधी गोळा करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला. वाचा सविस्तर बातमी…

18:33 (IST) 2 Aug 2022
पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी

पावसामुळे शिरूर आणि आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि संबंधित शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सविस्तर वाचा

18:24 (IST) 2 Aug 2022
सांगली :बत्तीस शिराळा येथे प्रतिकात्मक नागपूजा करून नागपंचमी साजरी

जिवंत नागपूजेसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा येथे प्रतिकात्मक नागपूजा करून आज (मंगळवार) नागपंचमी साधेपणाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने ५० पेक्षा अधिक मंडळाकडून वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून प्रतिकात्मक नागाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. वाचा सविस्तर बातमी…

18:10 (IST) 2 Aug 2022
“आम्ही गद्दार, गटारातील घाण आहोत मग…”; शहाजीबापू पाटलांनी अगदी डोक्याला हात लावून आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न

राज्यामध्ये सत्तापालट झाल्यापासून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रा आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वेगवगेळ्या भागांमध्ये फिरुन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासहीत बंडखोरी करुन महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या ४० आमदारांचा आदित्य हे अनेक सभा आणि भाषणांमध्ये गद्दार म्हणून उल्लेख करताना दिसत आहेत. आदित्य यांनी या बंडखोरांवर केलेल्या टीकेवरुन अनेकदा नाराजीही बंडखोरांनी व्यक्त केलेली असताना आता सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

18:09 (IST) 2 Aug 2022
“…तर मी त्यांच्यासोबत उभी राहील”; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय फोडल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटातील आमदाराला सुप्रिया सुळेंची ऑफर

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाही तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपलं कार्यालय फोडल्याचा आरोप करणारे शिंदे गटातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक सल्ला दिला आहे. शिवसैनिकांनी माझं कार्यालय फोडलं नव्हतं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सेनेचे भगवे गळ्यात घालून हे काम केलं होतं असा आरोप पुण्यातील कात्रज येथील शिवसेनेच्या या बंडखोर आमदाराने केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

18:07 (IST) 2 Aug 2022
“बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं…”; शिंदे सरकारच्या बैठकीसंदर्भातील स्वत:च्याच विधानावर अजित पवारांना हसू अनावर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी राज्यामधील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी शिंदे सरकारकडे केली. जवळजवळ तासभर सुरु असणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन मंत्र्यांच्या मंत्रीमंडळ बैठकीवर उपहासात्मक पद्धतीने भाष्य केल्याचं पहायला मिळालं. येथे वाचा सविस्तर वृत्त…

18:06 (IST) 2 Aug 2022
“ त्यांचं समदं ओकेमधी असलं, तरी महाराष्ट्रातील जनता ओकेमधी नाही”; शिंदे सरकारवर प्रणिती शिंदेची टीका

“राज्यात राजकीय नाट्य घडून सत्तांतर होताना काय झाडी..काय डोंगार, काय हॉटेल…अशी चंगळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत केली. परंतु त्यांचं समदं ओकेमधी असलं तरी महाराष्ट्र ओकेमधी नाही.”, अशा शब्दात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षा आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी राज्यातील नव्या सरकारवर टीका केली आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:01 (IST) 2 Aug 2022
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पिंपरीत ३ लाख घरांवर फडकणार तिरंगा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात तीन लाख घरांवर तिरंगा फडकावण्यात येणार आहे. नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या शहरवासियांना मोफत ध्वज वाटप करण्यात येणार आहे. शहरवासीयांसह शैक्षणिक, सामाजिक संस्था, सोसायट्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले आहे.

सविस्तर वाचा

17:54 (IST) 2 Aug 2022
सख्ख्या भावाचा कालव्यात ढकलून खून; पाच वर्षांपूर्वीचा गुन्हा उघड

एरंडवणे भागातील घर नावावर करण्यासाठी भाऊ आणि बहिणीने सख्ख्या भावाचा कालव्यात ढकलून खून केल्याची घटना पाच वर्षांपूर्वी घडली. गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या तपासात खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज चंद्रकांत दिघे (वय २३, रा. भालेकर चाळ, एरंडवणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी सुहास दिघे, आश्विनी अडसूळ, प्रशांत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

17:21 (IST) 2 Aug 2022
मुंबईकरांसाठी खुशखबर! ‘मेट्रो ३’चे चार डबे मुंबईत दाखल

मेट्रो ३ (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) मार्गिकेसाठीच्या पहिल्या मेट्रो गाडीचे चार डबे अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथून दोन आठवड्यापूर्वी ट्रेलर्समधून हे डबे मुंबईसाठी रवाना झाले होते. मंगळवारी पहाटे डबे मुंबईतील मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

17:17 (IST) 2 Aug 2022
शिवसेना संपवण्याचे भाजपचे षडयंत्र – आमदार वंजारी; दिल्लीतील हुकूमशहांना जनताच सळो की पळो करून सोडेल

लोकांना आता कळून चुकले आहे की, शिवसेना पक्षाला संपवण्याचे षडयंत्र भाजपचे आहे. आता हीच जनता रस्त्यावर उतरून केंद्राची हुकूमशाही मोडून काढेल, असे काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी नागपुरात बोलत होते. ईडीचा दुरुपयोग मोदी सरकार राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करीत आहे.

सविस्तर वाचा

16:53 (IST) 2 Aug 2022
चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीला पत्नीने संपवले; शवविच्छेदन अहवालाने उघड केले सत्य; पत्नी गजाआड

पतीने दारूच्या नशेत शिवणयंत्रावर डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने केला. मात्र, पोलीस तपासात सत्य उघडकीस आले. पती वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने पत्नीनेच त्याच्या डोक्यावर लोखंडी सळीने हल्ला करून खून केल्याचे स्पष्ट झाले. ज्ञानीराम मनराखन यादव (३५, मोहनलाल वाजपेयीनगर, कळमना) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी राणी यादव (३५) हिला पोलिसांनी अटक केली.

सविस्तर वाचा

16:37 (IST) 2 Aug 2022
डोंबिवलीत शिवसेना मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यावरुन ठाकरे-शिंदे गटात राडा; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील शिवाजी पुतळ्या लगतची मध्यवर्ती शिवसेना शाखेचा ताबा कोणाकडे यावरुन गेल्या महिन्यापासून धुसफूस सुरू होती. या शाखेतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी ठाकरे गटाकडून बंडखोरी नंतर हटविण्यात आल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या शिंदे गटातील शिवसैनिकांनी सोमवारी दुपारी अचानक मध्यवर्ती शाखेत घुसून तेथील ठाकरे गटातील पुरुष, महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण करत बाहेर काढले.

सविस्तर वाचा

16:21 (IST) 2 Aug 2022
ठाणे पालिका आयुक्तांच्या दौऱ्यांवर राष्ट्रवादीचा आक्षेप; राज्याच्या मुख्य सचिवांकडे राष्ट्रवादी करणार तक्रार

महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू असतानाही प्रशासक म्हणून काम पाहणारे आयुक्त डाॅ. विपीन शर्मा हे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासोबत शहरात दौरे करण्याबरोबरच पत्रकार परिषदा घेत असून त्यास राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी आक्षेप घेत आयुक्तांची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. ठाण्यात राष्ट्रवादी भक्कम असल्याने फुट पडणार नसल्याचा दावा करत ज्यांना गदारी करायची सवय असते, त्यांच्या मनात तशाच भावना येणार असल्याचा टोला त्यांनी म्हस्के यांना लगावला.

सविस्तर वाचा

16:19 (IST) 2 Aug 2022
दहीहंडीचा लवकरच क्रीडा प्रकारात समावेश होणार; आमदार प्रताप सरनाईकांचा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असून त्याचप्रमाणे ते दहीहंडी या खेळाचा क्रीडा प्रकारात लवकरच समावेश करतील. पुढील वर्षाच्या आत दहीहंडीचा समावेश क्रीडा प्रकारात होऊन इतर खेळाप्रमाणेच राज्यभरात दहीहंडीच्या स्पर्धा होतील आणि त्याचबरोबर गोविंदाना नोकरीची संधी मिळेल, असा दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.

सविस्तर वाचा

16:11 (IST) 2 Aug 2022
पुणे : …अन् मुख्यमंत्री शिंदेंनी तत्काळ आपला ताफा थांबवत आंदोलकांची घेतली भेट

मेट्रोच्या कामामुळे विस्थापित झालेल्या आणि घर मिळण्याची प्रतीक्षा असलेल्या विस्थापितांना घर मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवार) दिले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आले होते. वाचा सविस्तर बातमी…

15:55 (IST) 2 Aug 2022
अलिबाग : जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची दुरावस्था; जीव मुठीत घेऊन रुग्णांवर उपचार

जिल्हा रुग्णालयातील आंतररुग्ण विभागाची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रुग्णांना जीव मुठीत घेऊन उपचार घ्यावे लागत आहेत. आठवड्याभरात स्लॅब कोसळण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. शस्त्रक्रिया. डायलेसीस, क्ष किरण विभागालाही गळती लागली आहे. त्यामुळे जुनी जिर्ण झालेली इमारत पाडून नवीन इमारत बांधावी अशी मागणी केली जात आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:37 (IST) 2 Aug 2022
पिंपरी-चिंचवड : नऊ वर्षीय मुलीसमोरच पतीने केला पत्नीचा खून

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून केल्याची घटना मध्यरात्री वाकड परिसरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नऊ वर्षीय मुलीसमोरच ही घटना घडली. रमेश पुजारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. तर ललिता पुजारी अस खून झालेल्या महिलेचं नाव आहे. आईचा खून झाला तर वडील कारागृहात गेल्याने तीन मुलं पोरकी झाली आहेत.  वाचा सविस्तर बातमी…

15:27 (IST) 2 Aug 2022
वर्धा : कोंबडी खाल्ल्याने श्वानाला ठार मारून फरफटत नेले

कोंबडी खाल्ल्याचा राग आल्याने भटक्या श्वानाला ठार मारून त्यास रस्त्यावरून फरफटत नेल्याची क्रौर्याची परिसीमा गाठणारी घटना हिंगणघाट येथे घडली.या प्रकरणी दीपक, गोलू व आशीष हेडाऊ या तीन मजुरांवर प्राण्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

15:21 (IST) 2 Aug 2022
मृत तरूणाच्या बँक खात्यातील रकमेचा अपहार; उत्तर प्रदेशातील एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आत्महत्या केलेल्या एका तरुणाच्या बँक खात्यातून सुमारे ८२ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी उत्तरप्रदेशच्या संतकुमार ऊर्फ गुड्डन भरीसिंह याच्याविरोधात बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या तक्रारीनंतर दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा

15:16 (IST) 2 Aug 2022
पुणे : खडकीतील पीएमपी स्थानकात टोळक्याची दहशत; बसवर दगडफेक चालकासह नियंत्रकाला मारहाण

खडकी बाजारातील पीएमपी स्थानकात गोंधळ घालणाऱ्या टोळक्याला समजावून सांगणाऱ्या पीएमपी चालक तसेच नियंत्रकाला टोळक्याने मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने पीएमपी बसवर दगडफेक करुन दहशत माजविली. या प्रकरणी पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकास अटक केली. वाचा सविस्तर बातमी…

15:06 (IST) 2 Aug 2022
तीर्थक्षेत्र भीमाशंकरसाठी पीएमपीची चोवीस तास शटल सेवा

श्रावण महिन्यात भीमाशंकर येथे दर्शनासाठी भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पीएमपीच्या वतीने चोवीस तास शटल सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रावण महिन्यातील प्रत्येक रविवारी आणि सोमवारी ही सेवा चोवीस तास सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

14:51 (IST) 2 Aug 2022
Monkeypox in India : केरळमध्ये मंकीपॉक्सचा पाचवा रुग्ण, भारतातील एकूण रुग्णांची संख्या किती? वाचा…

मंकीपॉक्सची लक्षणं असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मंगळवारी (२ ऑगस्ट) केरळमध्ये आणखी एका व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता केरळमधील एकूण मंकीपॉक्सबाधित रुग्णांची संख्या पाचवर गेली आहे. यासह देशात मंकीपॉक्स संसर्ग झालेल्यांची संख्या सातवर गेली आहे. केरळमध्ये आढळलेला रुग्ण नुकताच संयुक्त अरब अमिरातहून (UAE) आला होता.

सविस्तर बातमी…

14:36 (IST) 2 Aug 2022
मुंबई: ‘बेस्ट’च्या विनवाहक बसमधील कसरतीचा प्रवास; तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना रांगेचा ताप,

बसमधील गर्दीत तिकीट काढताना उडणारा गोंधळ टाळण्यासाठी, तसेच विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तीन वर्षांपूर्वी मुंबईत विनावाहक बस सेवा सुरू केली. मात्र या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत असून वाहकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही थांब्यावर वाहक उपलब्ध नसल्याने चालकांना बस थांबविणे शक्य होत नाही. तसेच बसमध्ये वाहक नसल्यास प्रवाशांना पुढील थांब्यावरील वाहकाकडून तिकीट मिळवण्यासाठी बरीच धडपड करावी लागते. मुंबईतील काही थांब्यावर असे प्रकार सर्रास होत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

14:34 (IST) 2 Aug 2022
संजय शिरसाटांच्या कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हद्दपार, चंद्रकांत खैरेंचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं म्हणत ठाकरे कुटुंबाविषयी आजही आदर असल्याचे दावे केले. मात्र, काही दिवसातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंसह थेट उद्धव ठाकरेवरही शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली. आता तर शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी 'ज्यांनी मोठं केलं त्यांनाच लोक विसरतात' असं म्हणत जोरदार हल्ला चढवला. ते मंगळवारी (२ ऑगस्ट) एबीपी माझाशी बोलत होते.

सविस्तर बातमी…

14:32 (IST) 2 Aug 2022
पुणे : टीकेनंतर एकनाथ शिंदे उद्यानाच्या नावात बदल; आता ‘धर्मवीर आनंद दिघे उद्यान’

महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत हडपसर परिसरात स्वत:च्या नावे उभारलेल्या उद्यानाचे स्वत:च उद्घाटन करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर आता उद्यानाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उद्यान नव्हे तर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे महापालिकेच्या उद्यानाचे नामकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची घोषणा केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सायंकाळी उद्घाटन करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

14:30 (IST) 2 Aug 2022
उद्यानाला ‘एकनाथ शिंदे’ नाव दिल्याने कार्यक्रम रद्द, मुख्यमंत्री पुण्यात पोहोचले, नगरसेवकाला म्हणाले “अरे बाबा…”

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हडपसर भागात पालिकेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या उद्यानाचं उद्घाटन करण्यात येणार होतं. पण या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचं नाव देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आणि ऐनवेळी कार्यक्रम रद्द करावा लागला. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी पुण्यात पोहोचताच नगरसेवकाला उद्यानाला आपलं नाव देण्यासंबंधी विचारलं आणि एक सल्लाही दिला.

सविस्तर बातमी

14:17 (IST) 2 Aug 2022
पोलीस ठाण्याच्या परिसरात रिक्षा चालकाने घेतले जाळून

भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका व्यक्तीने रिक्षा चोरीला गेली असून पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत स्वत:ला जाळून घेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. त्याची रिक्षा चोरीला गेली नसून ती अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीने जप्त केली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली. त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा

14:03 (IST) 2 Aug 2022
मुंबई : हिरे अपहारप्रकरणी दलालाला अटक; ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

उधारीवर घेतलेल्या सुमारे ६३ लाख रुपये किंमतीच्या हिऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हिऱ्यांचा व्यवहार करणारा दलाल भरत मांजीभाई गांगानीला सुरत येथून अटक केली. गेल्या नऊ महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. त्याने फसवणुकीच्या रक्कमेतून खरेदी केलेली मोटरगाडी पोलिसांनी जप्त केली. भरतने अन्य काही हिरे व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का? याचा पोलीस तपास करीत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

13:53 (IST) 2 Aug 2022
काश्मिरी कन्येला पुण्यातून आधार; पुनीत बालन ग्रुप आणि आफरीन हैदर यांच्यात करार

सदतीसाव्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेवर आपली मोहोर उमटविणाऱ्या आफरीन हैदरला पुण्यातील पुनीत बालन ग्रुपच्या वतीने करारबद्ध करण्यात आले आहे. २१ वर्षीय आफरीनने आतापर्यंत विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार आणि लक्ष्यवेधी कामगिरी करताना तायक्वांदोमध्ये आपला दबदबा निर्माण केला.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 2 Aug 2022
भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू; नगर रस्त्यावर अपघात

भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अयुब दाऊद मुजावर (वय ५०, रा. हनुमान चौक, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 2 Aug 2022
वाहने उचलण्याची कारवाई पुन्हा; ‘नो पार्किंग’मधील कारवाई पारदर्शक होण्यासाठी नियमावली

सम-विषम दिनांक न पाहता वाहने लावणाऱ्या दुचाकी तसेच मोटारचालकांच्या विरोधात पुन्हा कारवाई सुरू करण्यात आली आहे. क्रेनवरील (टोईंग) कर्मचाऱ्यांच्या गैरप्रकारांच्या तक्रारी आल्यानंतर गेल्या महिनाभरापासून वाहने उचलण्याची कारवाई शिथिल झाली होती. टोईंग क्रेनवरील कर्मचाऱ्यांसाठी वाहतूक पोलिसांनी नियमावली तयार केली असून नियमांचे पालन करूनच वाहने उचलण्याची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा

13:46 (IST) 2 Aug 2022
‘स्वाईन फ्लू’च्या एक लाख लससाठ्याची खरेदी; जिल्ह्यांमध्ये वितरण सुरू

राज्यातील स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने प्रतिबंधासाठी फ्लूच्या सुमारे एक लाख लसींचा साठा राज्याने उपलब्ध केला आहे. गर्भवती महिला, आरोग्य कर्मचारी अशा जोखमीच्या गटांसाठी ही लस जिल्ह्यांना पाठविण्यात येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:23 (IST) 2 Aug 2022
डोंबिवलीतील टिळकनगरमध्ये रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा; इतर भागातील वाहने टिळकनगर मधील रस्त्यांवर, रहिवासी हैराण

डोंबिवली पूर्व भागातील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा शांत भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकनगर भागात शहराच्या विविध भागातील रहिवासी, व्यापारी संकुलातील व्यावसायिक, डाॅक्टर, रुग्णवाहिका रस्त्यावर आणून ठेवत असल्याने स्थानिक रहिवासी हैराण आहेत. स्थानिक रहिवाशांना आपली वाहने कोठे उभी करायची असे प्रश्न पडू लागले आहेत.

सविस्तर वाचा

13:18 (IST) 2 Aug 2022
रस्त्यावर वाहन चालकांचा उलट मार्गिकेतून प्रवास; अपघातांचे प्रमाण वाढले

कल्याण-शिळफाटा, काटई नाका ते बदलापूर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक दुचाकी स्वार उलट मार्गिकेतून प्रवास करत असल्याने समोरुन येणाऱ्या वाहन चालकाला अशा वाहनांचा अंदाज येत नसल्याने या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आठवड्यातून दोन ते तीन अशाप्रकारच्या अपघातांच्या घटना या रस्त्यावर घडत आहेत.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 2 Aug 2022
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; देशात १०६ टक्के पावसाचा अंदाज

मोसमी पावसाच्या ऑगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्यांच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात देशात सरासरीच्या तुलनेत १०६ टक्क्यांपर्यंत पाऊस होईल, असा अंदाज सोमवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केला. प्रामुख्याने दक्षिण कोकण आणि पूर्व विदर्भातील काही भाग वगळता राज्यात सर्वत्र या दोन महिन्यांत सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:37 (IST) 2 Aug 2022
पुणे : अमली पदार्थाची विक्री प्रकरणात दोघांना पकडले; दोन लाखांचे मेफेड्रोन जप्त

अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने पांडवनगर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचे ६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. विराज इंद्रकांत छाडवा (वय ३२, रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळाजवळ, पांडवनगर, वडारवाडी), जयेश भारत कोटियाना (वय २०, रा. तिरुपती लॅान, टिंगरेगनर, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:32 (IST) 2 Aug 2022
सुजय विखे पाटलांनी केलेल्या बोचऱ्या टीकेला सुप्रिया सुळेंचं केवळ आठ शब्दांत उत्तर, म्हणाल्या…

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सुंदर उदाहरण दिलं, पण तीच राष्ट्रवादीची परंपरा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीने दुधापासून निघणारा कोणताच पदार्थ सोडला नाही, अशी बोचरी टीकाही सुजय विखे पाटलांनी केली आहे. यावर आता सुप्रिया सुळे यांनी अवघ्या आठ शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर बातमी

12:32 (IST) 2 Aug 2022
‘एक साधा आमदार’ म्हणणाऱ्या बंडखोर तानाजी सावंत यांना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर

शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर असून, याचवेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील शहरात असणार आहेत. आदित्य ठाकरे कात्रज चौकात सभा घेणार असून यानिमित्ताने बंडखोर आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे केवळ एक साधे आमदार असून, आपण त्यापेक्षा जास्त महत्व देत नाही असं तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. तानाजी सावंत यांच्या टीकेला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. कोल्हापुरात जनता दरबार पार पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

12:24 (IST) 2 Aug 2022
“भाजपा नेत्यांवर ईडी, CBI, आयकरची कारवाई झालेली दाखवा, एक लाख रुपये मिळवा”; महाराष्ट्रातील ‘या’ शहरात झळकले बॅनर्स

केंद्रामध्ये आणि आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांच्या पाठींब्याने सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टीविरोधात विरोधकांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे आरोप केले जातात. भाजपाकडून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माध्यमातून अडकविण्याचा डाव सुरू आहे असे आरोप शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून केले जात आहे. राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापलेलं असतानाच आता औरंगाबादमध्ये भाजपाविरोधात झळकावण्यात आलेलं पोस्टर अनेकांचे लक्ष वेधून घेत असून ते शहरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:21 (IST) 2 Aug 2022
“सरसंघचालकांनी आम्हाला एवढंच सांगितलं की…”; मोहन भागवतांच्या भेटीनंतर हिंदुत्वाचा उल्लेख करत फडणवीसांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीची फोटो समोर आल्यानंतर राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी अचानक सरसंघचालकांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांबरोबर जवळजवळ पाऊण तास चर्चा केली. या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी भेटीत काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:20 (IST) 2 Aug 2022
“…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेतली. मी तुमच्यासोबत आहे, असा शब्द मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या कुटुंबियांना देत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. रविवारी राऊत यांच्या घरी ईडीने छापेमारी आणि चौकशी केल्यानंतर त्यांना पुढील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेत असताना त्यांच्या आईला मारलेल्या मिठीचा व्हिडीओ समोर आल्यापासून राऊत यांच्या आईंबद्दलही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. असं असतानाच आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये याच विषयावरुन शिवसेनेला टोला लगावला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:19 (IST) 2 Aug 2022
शिंदे विरुद्ध ठाकरे: “४० आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरवल्यास…”; सुनावणीच्या आधीच शिंदेंचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या आणि अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारऐवजी बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र या सुनावणीच्या दोन दिवस आधीच राज्याचे मुख्यमंत्री आणि बंडखोरांचं नेतृत्व करणाऱ्या शिंदे यांनी खरी शिवसेना कोणती या वादावर निर्णय घेण्याची मुभा केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावी, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:18 (IST) 2 Aug 2022
हर घर तिरंगा उत्सवात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही – अनिल घनवट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला ७५ वर्ष झाली तरी शेतकरी अद्यापही पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव असल्यामुळे शेतकरी या उत्सवात सहभागी होणार नाहीत. आपल्या भावना शेतकऱ्यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:18 (IST) 2 Aug 2022
पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्याना’च्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द; मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते आजच होणार होतं उद्घाटन पण…

पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून उभारलेल्या या उद्यानाचे उद्घाटन आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. येथे वाचा सविस्तर वृत्त…

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी सोमवारी प्रसिद्धीपत्रक जारी करत माफी मागितली आहे.