Maharashtra News Today : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’ करण्यात येणार आहे. “देशात वाढती महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, ढासळलेली अर्थव्यवस्था, अग्निपथ योजनेद्वारे तरुणांचे खच्चीकरण, जीएसटी करामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघालेली आहे. या सर्वाचा विरोध करण्यासाठी आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काँग्रेस जनआंदोलन करणार आहे.”, असे ठाणे काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे यांनी कळविले आहे. हा विषयही दिवसभर चर्चेत असणार आहे.

महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कलाविषयक घडामोडींचा आढावा एकाच ठिकाणी…

Live Updates

Maharashtra Latest News Updates, 08 August 2022 : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय; मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

20:21 (IST) 8 Aug 2022
लवासाप्रकरणी HCने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; पवार कुटुंबीयांसह प्रतिवाद्यांना न्यायालयाची नोटीस

मुंबई : खासगी हिल स्टेशन म्हणून लवासा विकसित करण्यासाठी जमीन खरेदीला विकास आयुक्तांनी (उद्योग) दिलेली विशेष परवानगी रद्द करावी, तसेच परवानगी मनमानी, अवाजवी, राजकीय पक्षपातीपणा, गैरप्रकार म्हणून घोषित करण्याची मागणी करणारी याचिका निकाली काढण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याचिकेची दखल घेऊन राज्य सरकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळेंसह अन्य प्रतिवाद्यांना नोटीस बजावून सहा आठवड्यांत याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. सविस्तर बातमी

19:47 (IST) 8 Aug 2022
विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार; संकेतस्थळावरील ओळखीतून तरुणीची १४ लाखांची फसवणूक

पुणे : विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून एकाने तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने तरुणीची १४ लाख रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी

19:46 (IST) 8 Aug 2022
इसिसशी कनेक्शन असलेल्या आरोपीला १६ ऑगस्टपर्यंत NIA कोठडी, जाणून घ्या नेमकं प्रकरण

इस्लामिक स्टेट (IS) चा सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या आरोपीला दिल्ली न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. मोहसीन अहमद असं या आरोपीचं नाव असून तो बिहारमधील पाटणा येथील रहिवासी आहे. आरोपी मोहसीन अहमद याला एनआयएने शनिवारी बाटला हाऊस येथून अटक केली होती. सोमवारी त्याला दिल्ली न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सविस्तर बातमी

19:45 (IST) 8 Aug 2022
विद्यापीठाचे युवा संकल्प अभियान; राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या व्यक्तींच्या विश्वविक्रमासाठी प्रयत्न

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत युवा संकल्प अभियान राबवले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत हातात ध्वज घेतलेल्या व्यक्तींच्या विश्वविक्रमासह ७५ विविध उपक्रम करण्यात येणार असून, या अभियानाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी (९ ऑगस्ट) दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे.

सविस्तर बातमी

19:03 (IST) 8 Aug 2022
मुलाच्या डोळ्यासमोर वाघाने घेतला वडिलांचा बळी; ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील थरारक घटना

ब्रम्हपुरी तालुक्यातील बेलगाव मुरपार जंगलातील शेतशिवारात वाघाने मुलाच्या डोळ्यासमोर वडिलांचा बळी घेतला. ही घटना सोमवार, ८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुर्योधन जयराम ठाकरे (४९) असे मृताचे नाव आहे.

सविस्तर वाचा

18:47 (IST) 8 Aug 2022
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने मॅरेथाॅन स्पर्धा

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका, ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना आणि ठाणे पोलिसांच्या सहकार्याने १४ ऑगस्टला १० किमी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा  पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका भवन येथून सुरू होणार असून त्याच ठिकाणी समाप्त होणार आहे.

सविस्तर वाचा

18:43 (IST) 8 Aug 2022
पुरात वाहून गेलेल्या पती-पत्नीचा मृत्यू; राळेगाव तालुक्यातील घटना

शेतातून परत येत असताना पती-पत्नी तलावाच्या सांडव्यात पाय घसरून पडले व पुरात वाहत गेले. यात दोघांचाही मृत्यू झाला. सुभाष राऊत (५५) व सुरेखा राऊत (५२) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथे आज सोमवारी घडली.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 8 Aug 2022
नागपूर : बिबट्याच्या पिल्लाचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाच्या बाहेरील मोकळ्या वनक्षेत्रातील नाल्यात आज (सोमवार) बिबट्याचे दोन ते तीन दिवसाचे पिल्लू पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळले. त्याचा पंचनामा करुन गोरेवाडा प्रकल्पातील वन्यप्राणी बचाव केंद्रात शवविच्छेदनासाठी आणले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुजीत कोलंगथ, डॉ. मयूर पावशे यांनी शवविच्छेदन केले. त्यात पिलाचा मृत्यू बुडून झाल्याचे स्पष्ट झाले. वाचा सविस्तर बातमी…

17:44 (IST) 8 Aug 2022
‘भाजपच्या हुकूमशाही कारभाराला जनता कंटाळली’

भाजपच्या हुकूमशाही कारभाराला देशातील जनता कंटाळली असून त्यांचा हा कारभार जास्त दिवस चालणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी केली आहे. तीन सदस्यीय प्रभागरचना झालेली असताना जाणीवपूर्वक चार सदस्यीय प्रभाग करून संभ्रमावस्था निर्माण केली जात आहे . मात्र, राष्ट्रवादीला फरक पडणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

सविस्तर वाचा

17:25 (IST) 8 Aug 2022
चंद्रपूर : …मग राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही संघाचे होते, असा ‘त्या’ दाव्याचा अर्थ होईल – वडेट्टीवार

देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना १९४२ च्या चिमूर स्वातंत्र्य लढ्यात युवा स्वयंसेवक बालाजी रायपुरकर शहीद झाल्याचा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘आरएसएस ॲन्ड फ्रिडम स्ट्रगल’ या पत्रकात केला आहे. सध्या हे पत्रक समाज माध्यमावर सार्वत्रिक झाले आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाच्या स्वातंत्र्यालाच विरोध होता, हा इतिहास आहे.

सविस्तर वाचा

17:19 (IST) 8 Aug 2022
डोंबिवली, ठाणेकरांची गारेगार लोकल प्रवासाला पसंती; सहा महिन्यांत दोन स्थानकांमध्ये पावणेदोन लाखांहून अधिक तिकिटांची विक्री

तिकीट दरातील कपात आणि गर्दीतील प्रवास टाळण्यासाठी मध्य रेल्वेवरील वातानुकूलित लोकलला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळू लागला आहे. डोंबिवली आणि ठाणे स्थानकांतून प्रवास करणारे प्रवासी मोठ्या संख्येने वातानुकूलीत लोकलला पसंती देत असून फेब्रुवारी ते जुलै २०२२ या सहा महिन्यांत दोन्ही स्थानकांमध्ये एक लाख ७९ हजार २४१ तिकीटांची विक्री झाली. गेल्या मे महिन्यात वातानुकूलीत लोकलला पसंती मिळणाऱ्या स्थानकांमध्ये डोंबिवलीबरोबर सीएसएमटी स्थानकाचा समावेश होता. मात्र आता ठाणे स्थानकाने आघाडी घेतली असून त्यापाठोपाठ कल्याण स्थानकातूनही वातानुकूलीत लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. वाचा सविस्तर बातमी…

16:55 (IST) 8 Aug 2022
कोथरुड परिसरात पादचाऱ्याचा मोबाइल हिसकावला

डोंबिवली पूर्वेतील टिळक पुतळा ते पाथर्ली नाका दरम्यानच्या मंजुनाथ शाळा परिसरातील रस्त्यावर उभ्या करुन ठेवण्यात आलेल्या एका बुलेटला सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता अचानक आग लागली. आगीत बुलेट जळून खाक झाली. आग लागताच जवळच्या एका दुकानदाराने बादल्यांमधून पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

सविस्तर वाचा

16:54 (IST) 8 Aug 2022
विदर्भात सर्वदूर पावसाचे पुनरागमन; वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती!

मागील काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने रविवारी रात्रीपासून विदर्भात जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे वर्धा, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोलीत पुन्हा पूरस्थिती उद्भवल्याचे चित्र आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. वाचा सविस्तर बातमी…

16:40 (IST) 8 Aug 2022
अमरावती : महाराष्‍ट्र बेवारस, महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ; माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा आरोप

गेल्‍या चाळीस दिवसांमध्‍ये राज्‍यात मंत्रिमंडळाचा विस्‍तार होऊ शकलेला नाही. सर्व कारभार सचिवांमार्फत सुरू आहे. महाराष्‍ट्र बेवारस वाटतो आहे, राज्‍यात गुन्‍हेगारी प्रवृत्‍तीच्‍या लोकांना कुणाचा धाक राहिलेला नाही, त्‍यामुळेच महिलांवरील अत्‍याचाराच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे, असा आरोप माजी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.

सविस्तर वाचा

16:38 (IST) 8 Aug 2022
भंडारा जिल्हा सामूहिक अत्याचार प्रकरणी लाखनी ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी निलंबित

भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यासह दोघांना निलंबित करण्यात आले. एका महिला कर्मचाऱ्याची तडकाफडकी पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (सोमवार) नागपुरात प्रसारमाध्यमांना दिली. वाचा सविस्तर बातमी…

16:35 (IST) 8 Aug 2022
मुख्यमंत्री शिंदे नीति आयोगाच्या फोटोत शेवटच्या रांगेत : उदय सामंत म्हणतात, “…ते कोणाला दिसलं नाही हे आपलं दुर्दैव”

नीति आयोगाच्या नियामक परिषदेच्या रविवारी झालेल्या बैठकीमधील एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नीति आयोगाच्या अधिकाऱ्यांचा हा फोटो असून या फोटोत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अगदी शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी हा फोटो आणि त्यासंदर्भात सुरु असणाऱ्या मान-अपमानाच्या चर्चांवर मत व्यक्त केलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

16:35 (IST) 8 Aug 2022
शिवसेनेकडून काँग्रेसचं तोंड भरुन कौतुक; अमित शाहांना ‘त्या’ वक्तव्यावरुन केलं लक्ष्य तर गांधी कुटुंबाचा उल्लेख करत म्हणाले…

महागाईविरोधात काँग्रेसने दिल्लीत केलेल्या आंदोलनावरुन शिवसेनेनं सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधींचं कौतुक केलं आहे. महागाईविरोधातील आंदोलनामध्ये काँग्रेस रस्त्यावर उतरली मात्र इतर विरोधी पक्ष कुठे आहेत असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे. त्याचप्रमाणे या आंदोलनाला चिरडण्यासाठी त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही शिवसेनेनं टीका केली आहे. महागाईसारख्या प्रश्नांवर विरोधकांनी एकत्र आलं पाहिजे असं म्हणतानाच विरोधकांमधील मतभेद हीच भाजपाची ताकद असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त…

16:30 (IST) 8 Aug 2022
पाऊस मुंबई मुक्कामी; कोकण, घाट भागात अतीमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाट भाग आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम आहे. पुढील तीन दिवस, गुरुवारपर्यंत असाच पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत गेल्या शुक्रवारपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यानंतर हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला.

सविस्तर वाचा

16:24 (IST) 8 Aug 2022
‘ईडी’सरकारने अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं – राष्ट्रवादी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात ‘टीईटी’मध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. पण याच प्रकरणात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ईडी सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तारांना शिक्षणमंत्री करावं, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. वाचा सविस्तर बातमी…

16:22 (IST) 8 Aug 2022
अमरावतीचा श्रेणिक साकला ‘जेईई’मध्‍ये राज्‍यात अव्‍वल

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सीच्‍या (एनटीए) वतीने घेण्‍यात आलेल्‍या ‘जेईई मेन्‍स सत्र २’ च्‍या परीक्षेत येथील महर्षी पब्लिक स्‍कूलचा विद्यार्थी श्रेणिक मोहन साकला हा शंभर टक्‍के गुण मिळवून राज्‍यात अव्‍वल आला आहे. या परिक्षेत देशभरातून २४ विद्यार्थी अव्‍वल आले असून त्‍यात श्रेणिकचा समावेश आहे. ‘जेईई मेन्‍स सत्र २’ ची परीक्षा २५ ते ३० जुलैदरम्‍यान घेण्‍यात आली होती. या परीक्षेचा निकाल ‘एनटीए’ने आज जाहीर केला.

सविस्तर वाचा

16:17 (IST) 8 Aug 2022
“हवेतल्या हवेत विमान थांबवत…,” आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला,

सध्याचे मुख्यमंत्री तात्पुरते असून, हे सरकार कोसळणार आहे असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. राज्यात सरकार आहे की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन लोकांच्या जम्बो कॅबिनेटमध्ये खरा मुख्यमंत्री कोण हेच कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली. मातोश्रीबाहेर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत काही समर्थकांनी युवासेनेत प्रवेश केला. यावेळी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर ताशेऱे ओढले.

सविस्तर बातमी

16:15 (IST) 8 Aug 2022
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून; हडपसर भागातील घटना; एकास अटक

दारू पिताना झालेल्या किरकोळ भांडणावरून एकाने मित्राचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना हडपसर भागात घडली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अनिल राजू सासी (वय ३३, रा. इंदिरानगर वसाहत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण नामदेव नाईक (वय ४१, केशवनगर, मुंढवा) याला अटक करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

15:54 (IST) 8 Aug 2022
पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले; कात्रज भागात कारवाई

संकेत मिलिंद गोवेकर (वय २२, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गोवेकरच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. तो कात्रज तलावाजवळ थांबला अशून त्याच्याकडे पिस्तुल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली.

सविस्तर वाचा

15:49 (IST) 8 Aug 2022
पुण्यासह जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या विरोधात; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि अन्य स्थानिक स्वराज्या संस्थांच्या अधिपत्याखाली असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने त्याविरोधात पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यातील अनेक संघटनांनी एकत्र येत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा

15:09 (IST) 8 Aug 2022
‘राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव करा’; एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांना आवाहन

केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचे आयोजन केले आहे. एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत या अभियानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश महामंडळाने जारी केले आहेत. या दिवशी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय सणाला साजेसा पेहेराव या काळात करावा, असेही महामंडळाने आदेशात नमुद केले आहे.

सविस्तर वाचा

14:55 (IST) 8 Aug 2022
आदिवासी दिनानिमित्त आरे वसाहतीत मंंगळवारी मिरवणूक

जागतिक आदिवासी दिनानिमित्त मंगळवार, ९ ऑगस्ट रोजी आरे वसाहतीमध्ये मिरवणूक काढण्यात येणार आहे. आरे वसाहतीमधील युनिट क्रमांक ५, आरे मार्केट येथून सकाळी १०.३० वाजता या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि बिरसा मुंडा चौक येथे ही मिरवणूक संपेल. यावेळी नृत्य, गीत, संगीताच्या माध्यमातून मुंबईकरांना संदेश देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 8 Aug 2022
कल्याणमध्ये एकाच इमारती मधील दोन घरे फोडून चार लाखाचा ऐवज लंपास

कल्याण पश्चिमेतील चिकणघर येथील संपदा रुग्णालया जवळील दोन बंद घरांच्या दरवाजांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चार लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज शनिवारी चोरुन नेला. यामध्ये एका वकिलाच्या घराचा समावेश आहे. कल्याण मधील चिकणघर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. या परिसरात चोऱट्यांचा वावर वाढल्याने परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा

14:13 (IST) 8 Aug 2022
चार्जर घेतला म्हणून भावाने केला चाकू हल्ला

मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी चार्जर घेतला म्हणून ३८ वर्षीय व्यक्तीने त्याच्या थोरल्या भावावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

14:10 (IST) 8 Aug 2022
मुंबई : तलावांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; पाणीसाठा ९२ टक्क्यांवर

दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांतील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा आणि तुलसी धरणात १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सातही तलावांतील पाणीसाठा ९२ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. गेल्या आठ दिवसात १ लाख दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:01 (IST) 8 Aug 2022
औरंगाबादचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे युरोपमधील स्पर्धेत ठरले ‘आयर्नमॅन’

एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पांडुरंगराव गुरमे यांनी रविवारी युरोपमधील इस्टोनियाची राजधानी टॅलिनमध्ये झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धातला ‘आयर्नमॅन’ हा बहुमान मिळविला. वाचा सविस्तर बातमी…

13:36 (IST) 8 Aug 2022
अमरावती जिल्‍ह्यात मुसळधार; वरूड तालुक्‍यात पूरस्थिती; बारा तासांत ९२ मिमी पाऊस

जिल्‍ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे पुन्‍हा एकदा जनजीवन विस्‍कळीत झाले असून वरूड तालुक्‍याला पुराचा मोठा फटका बसला आहे. वरूड शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. गेल्‍या बारा तासांमध्‍ये ९२ मिमी पावसाची नोंद झाली असून शेंदूरजनाघाट, पुसला, वरूड, बेनोडा, वाठोडा या महसूल मंडळांमध्‍ये ७५ ते ११० मिमी पाऊस झाला आहे.

सविस्तर वाचा

13:34 (IST) 8 Aug 2022
सत्तारांनी आता शांत राहवं – चंद्रकांत खैरे

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) घोटाळा झाला असून त्यात अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. सत्ताधारी शिंदे गटातील एका आमदाराचं नाव भ्रष्टाचार प्रकरणात समोर आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा सुरू आहे. यावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना खोचक टोला लगावला आहे. “सत्तारांनी आता शांत राहवं, उगाच बडबड करू नये”, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा –

13:32 (IST) 8 Aug 2022
नागपूर : … अन् १८ विद्यार्थ्यांनी भरलेली ‘स्कूल व्हॅन’ थेट नाल्यात उलटली

बेसा-घोगली मार्गावरील पोद्दार इंटरनॅशनल शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाहन नाल्यात उलटले. या अपघातात चार विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात आज (सोमवार) सकाळी आठ वाजता झाला. वाचा सविस्तर बातमी…

13:28 (IST) 8 Aug 2022
एअर इंडियाची दिल्ली मुंबई सेवा बंद

एअर इंडिया एअरलाइन्सने नागपूर येथून  दिल्ली ते नागपूर, नागपूर दिल्ली तसेच मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई या चार विमानसेवा रद्द करण्यात आल्या.ऑपरेशनल कारणांसाठी हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात २० ऑक्टोबरला फेरआढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्याची येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सविस्तर वाचा

13:23 (IST) 8 Aug 2022
रात्रीच्या पावसाने नागपूर जलमय, वस्त्यांमध्ये पाणी

रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. कळमना बाजार परिसरातील वस्त्यांसह नरेंद्रनगर परिसरातील अनेक वस्त्यांना पावसाचा फटका बसला. रविवारी रात्री शहरात मुसळधार पाऊस पडला.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 8 Aug 2022
पुणे : वकील महिलेची विनयभंग, खंडणी, बदनामीची तक्रार घेण्यास टाळाटाळ

वकीलपत्र सोडण्यासाठी दबाव टाकून विनयभंग करून खंडणीची मागणी केल्याची तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यानंतर न्यायालयात धाव घेतलेल्या वकील महिलेच्या खासगी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना देण्यात आले.  कॅन्टोन्मेंट न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एन ओंडारे यांनी हे आदेश दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

13:05 (IST) 8 Aug 2022
नागपूर : पावसाचा कहर, विदर्भातील अनेक जिल्ह्यात पूरस्थिती; ईरइ धरणाचे दरवाजे उघडले

नागुपरसह संपूर्ण विदर्भात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून गडचिरोली, वर्धा जिल्ह्यात नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. बोर प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात येणार असल्याने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:57 (IST) 8 Aug 2022
योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर चालवला बुलडोझर

गेल्या आठवड्यात एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेल्या भाजपा कार्यकर्त्याच्या घरामधील अवैध बांधकामावर प्रशासनाने बुलडोझर चालवला आहे. आपण भाजपा कार्यकर्ता असल्याचा दावा करणारा श्रीकांत तिवारी नोएडामधील एका हाऊसिंग सोसायटीत राहतो. महिलेला शिवीगाळ तसंच गैरवर्तन केल्यामुळे तो चर्चेत आला होता.

सविस्तर बातमी

12:40 (IST) 8 Aug 2022
कोल्हापूर : अब्दुल सत्तार यांना शिक्षणमंत्री करायला हवे – पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला टोला!

शिक्षक भरती घोटाळ्यामध्ये माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे पुढे आली आहेत. याकडे आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी मंत्रिमंडळात सत्तार यांना शिक्षण मंत्री करायला हवे, असा टोला लगावला. वाचा सविस्तर बातमी…

12:17 (IST) 8 Aug 2022
शिवसेनाप्रमुखांनी लावलेले शिवाजी पार्कवरील गुलमोहोराचे झाड उन्मळून पडले

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील गुलमोहोराचे झाड रविवारी रात्री पावसामुळे कोसळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हे झाड लावले होते. माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्मृतीस्थळावर जाऊन या झाडाची सकाळी पाहणी केली. वाचा सविस्तर बातमी…

11:57 (IST) 8 Aug 2022
ठाणे : खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

भिवंडी येथील नदीनाका भागात खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशोक काबाडी (६५) असे मृताचे नाव असून खड्ड्यामुळे दुचाकीचा वेग कमी केल्याने मागून येणाऱ्या ट्रकने दिलेल्या धडकेमुळे हा अपघात झाला आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:30 (IST) 8 Aug 2022
संजय राऊतांनी तुरुंगातून लेख कसा लिहिला? ED करणार चौकशी

पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या सदरात ईडी कोठडीत असलेल्या संजय राऊत यांचा लेख छापून आला होता. या लेखाची आता ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे.

वाचा सविस्तर बातमी…

11:10 (IST) 8 Aug 2022
“बंड झाले, आता थंड झाले?, तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण…”; ‘मनसे’च्या एकमेव आमदाराचा शिंदे सरकारला टोला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांवरून आता राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आमदरांनी बंडखोरी केल्याने राज्यातील ठाकरे सरकार कोसळलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपा मिळून नवीन सरकार सत्तेवर आलं. याला आता जवळपास दीड महिना होत आला आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कायम टीका सुरू आहे. आता मनेसचे आमदार प्रमोद पाटील यांनी देखील या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर बातमी…

10:19 (IST) 8 Aug 2022
TET Scam : शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची नावे?

शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटीमध्ये घोटाळा झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय (ईडी) देखील या प्रकरणाची समांतर चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात आता शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वाचा –

10:17 (IST) 8 Aug 2022
Maharashtra Monsson Updates : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय

राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुण्यात गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सविस्तर वाचा –

महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, जीवनावश्यक वस्तुंवरील जीएसटी इत्यादींच्या मुद्य्यांवरून केंद्र सरकार विरोधात ठाणे शहरात काँग्रेसकडून आज (सोमवार) दुपारी ‘जन आंदोलन’  करण्यात येणार आहे.