Maharashtra Breaking News  : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यामुळे विरोधकांकडून शिंदे गट-भाजपा सरकारवर सडूकन टीका केली जात आहे. तर हा प्रकल्प याआधीच्या महाविकास आघाडी सरकारमुळेच गेला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. राज्यात पैशांच्या मदतीनेच सत्तांतर झाले असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे समर्थक आमदार नितीन देशमुख यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर जागतिक पातळीवरही मोठ्या घडामोडी घडत असून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

यासह क्रीडा, अर्थकारण तसेच सर्व क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर!

Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
dharashiv, lok sabha, ranajagjitsinha patil
Maharashtra News : धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलणार? पुन्हा पारंपरिक लढतीची शक्यता
ED, second Summons, Shiv Sena uddhav thackeray, Candidate, Amol Kirtikar, Questioning, Khichdi Distribution Case, lok sabha elections,
ऐन निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांना पुन्हा समन्स
Mumbai Maharashtra Live News in Marathi
“त्याच्यासारखा नालायक माणूस नाही”, अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांची टीका
Live Updates

Mumbai- Maharashtra News Updates, 19 September 2022: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

21:07 (IST) 19 Sep 2022
एरंगळ समुद्रकिनाऱ्याजवळ स्मशानभूमीवरील कारवाईसाठी न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर; उच्च न्यायालयाची टिप्पणी

मालाड येथील एरंगळ समुद्रकिनाऱयाजवळील मच्छिमार समुदायासाठी बांधण्यात आलेली स्मशानभूमी जमीनदोस्त करण्यासाठी न्यायालयीन यंत्रणेचा गैरवापर करण्यात आला, अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने सोमवारी केली. तसेच ही स्मशानभूमी जमीनदोस्त करण्याच्या उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

सविस्तर वाचा

20:55 (IST) 19 Sep 2022
उरण मधील नवघर ते खोपटा मार्गावरील पथदिव्याखाली अंधार; अपघातात वाढ होण्याचा शक्यता

नवघर ते खोपटा पूल मार्गावरील पथदिव्याखाली अंधार पसरला आहे. जेएनपीटी बंदरावर आधारित गोदाम तसेच उरणच्या पूर्व आणि पश्चिम विभाग ये-जा करणाऱ्या वाहनांना त्रास सहन करावा लागत आहे. या सार्वजनिक प्रवासी वाहतुकीच्या रहदारीचा रस्ता अंधारात गेल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

सविस्तर वाचा

19:43 (IST) 19 Sep 2022
महत्त्वाची बातमी : पुढील वर्षीच्या दहावी, बारावी परीक्षेच्या तारखा ठरल्या

राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा ०२ मार्च ते २५ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. वाचा सविस्तर बातमी...

19:07 (IST) 19 Sep 2022
नंदुरबार तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांचे वर्चस्व; शिंदे गट समर्थकांना २९ ग्रामपंचायतींमध्ये यश

तालुक्यातील ७५ पैकी ४१ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी विजय मिळविला आहे. परंतु, दुधाळे येथील सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची पुतणी पराभूत झाल्याने गड आला आणि सिंह गेला अशी त्यांची अवस्था आहे. राज्यातील सत्तेत वाटेकरी असलेल्या शिंदे गट समर्थकांनी भाजपला कडवी झूंज देत २९ ग्रामपंचायतींमध्ये यश मिळविले आहे.

सविस्तर वाचा

18:26 (IST) 19 Sep 2022
अमरावती : हिंदुत्ववादी भूमिका घेऊनही राणा दाम्पत्याला हादरा!; अमरावती जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

जिल्ह्यात पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने बाजी मारली असून पाचपैकी तीन सरपंच पदांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. ‍या ठिकाणी माजी मंत्री व तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एका ठिकाणी भाजपला संधी मिळाली असून एक जागा प्रहारच्या वाट्याला आली आहे.

सविस्तर वाचा

18:22 (IST) 19 Sep 2022
जळगाव : पावसामुळे कपाशी, सोयाबीन, मक्याचे नुकसान; जळगाव जिल्ह्यात बळीराजा संकटात

शहरासह जिल्ह्यात आठ-दहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील कपाशीसह मका, सोयाबीन यांसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. जिल्ह्यात सोमवारीही वादळी पाऊस सुरु राहिला. पावसामुळे जिल्ह्यातील जळगावसह चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर, पाचोरा, एरंडोल, चोपडा, रावेर, यावल आदी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

सविस्तर वाचा

17:53 (IST) 19 Sep 2022
Vedanta Foxconn : ५ सप्टेंबरला अग्रवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर… – रोहित पवारांचं विधान!

वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील प्रसारमाध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

17:52 (IST) 19 Sep 2022
पिंपरी : विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करा; उद्योजकांच्या संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पुण्याचे नियोजित विमानतळ पुरंदरऐवजी चाकणला करण्याची मागणी ‘फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन’ या उद्योजकांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. औद्योगिक पट्टा असल्याने चाकण परिसरात विमानतळ झाल्यास अनेक परदेशी कंपन्या गुंतवणुकीसाठी पुढे येतील, असा दावा या संघटनेने केला आहे.

सविस्तर वाचा

17:43 (IST) 19 Sep 2022
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून पत्नीसह तिच्या लहानग्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

टिटवाळ्यातील वासुंद्री रस्त्यावर नारायण निवास मध्ये राहणाऱ्या एका महिला आणि तिच्या दोन लहान मुलींना घरात बंदिस्त करुन तिच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांना घरात जिवंत जाळण्याचा प्रकार बुधवारी रात्री मांडा टिटवाळा येथे घडला. या घराच्या आजुबाजुला असलेल्या रहिवाशांच्या घरांना मारेकऱ्यांनी कड्या लावल्या होत्या. त्यामुळे हे रहिवासी घरात कोंडून राहिले होते.

सविस्तर वाचा

17:22 (IST) 19 Sep 2022
डोंबिवलीत राजकीय रण पेटले; मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रस्ते, खड्डे, कल्याण डोंबिवली पालिकेतील आयुक्तांच्या मनमानीवरुन नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले. ही टीका जिव्हारी लागल्याने सोमवारी शिंदे समर्थक कल्याण डोंबिवली पालिकेतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंत्री चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केल्याने डोंबिवलीत राजकीय रण पेटले आहे.

सविस्तर वाचा

16:58 (IST) 19 Sep 2022
संध्याका‌ळी सहानंतरही रुगणांना दाखल करून घ्या; नितीन गडकरींची एम्सच्या अधिकाऱ्यांना सूचना

नागरिकांना कोणत्या आजाराचा केव्हा त्रास होईल हे सांगता येत नाही. परंतु अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थेत (एम्स) संध्याकाळी सहा वाजतानंतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला दाखल केले जात नाही, अशा तक्रारी आहेत. सायंकाळी सहा नंतर आलेल्या रूग्णांना दाखल करून घ्या, असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी एम्सच्या अधिकाऱ्यांना सुनावले.

सविस्तर वाचा

16:48 (IST) 19 Sep 2022
रेटींग देण्याचे काम पडले महागात; आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख रूपयांना फसवणूक

पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर चांगले गुणांकन (रेटींग) दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

सविस्तर वाचा

16:46 (IST) 19 Sep 2022
ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घेतले वारली चित्रकलेचे प्रशिक्षण;  समता विचार प्रसारक संस्थेचा अभिनव उपक्रम

समता विचार प्रसारक संस्थेतर्फे ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी वारली चित्रकलेचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. वारली चित्रकलेत प्रविण असलेल्या कलाकार शहनाज शेख आणि येऊर येथील आदिवासी समाजातील विद्यार्थी करीना साऊद यांच्या मार्गदर्शनाखाली दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये नुकतेच हे शिबीर पार पडले.

सविस्तर वाचा

16:33 (IST) 19 Sep 2022
ठाणे शहरात बुधवारी पाणीपुरवठा नाही

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला आलेल्या पुरामुळे पिसे येथील पंपाच्या मुखाजवळ कचरा अडकल्याने महापालिकेला पुरेशा प्रमाणात पाणी उचलणे शक्य होत नसून हा कचरा काढण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंदिरानगर संप येथील जलवाहीनी जोडणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 19 Sep 2022
मुखपट्टी परिधान न करणाऱ्यांकडून दंडवसुली का?; महापालिकेला दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

करोना काळात मुखपट्टीसक्ती न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कोणत्या कायदेशीर तरतुदीअंतर्गत केली ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी महापालिकेकडे केली. तसेच त्याबाबत दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. करोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने नागरिकांना मुखपट्टी वापरणे बंधनकारक केले असेल किंवा ती परिधान न करणाऱ्यांकडून दंड वसूल केला असेल, तर ते व्यापक सार्वजनिक हितासाठी होते असे मानून आम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश देताना प्रामुख्याने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 19 Sep 2022
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय पक्ष नाही – आशिष शेलार

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस हा दोन अडीच जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे. तो राज्यस्तरावरचा पक्षच नाही.” असं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

16:12 (IST) 19 Sep 2022
महाराष्ट्राचे अहित करणे हेच भाजपचे कर्तृत्व – खासदार अरविंद सावंत

अकोला : महाराष्ट्रासह संपूर्ण देश नासवण्याचे कार्य भाजपकडून सुरू आहे. महाराष्ट्राचे अहित करणे हेच भाजपचे कर्तृत्व आहे, अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली. रविवारी अकोल्यात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बातमी वाचा सविस्तर ...

15:53 (IST) 19 Sep 2022
दारुच्या नशेत असल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवलं? आरोपांमुळे खळबळ

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल आहे. दारुच्या नशेत असल्याने भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा केला जात असून, अकाली दलने हा मुद्दा लावून धरला आहे. भगवंत मान फ्रँकफूर्टहून दिल्लीला येत असताना शेवटच्या क्षणी त्यांचं विमान चुकलं आणि प्रवास एक दिवस पुढे ढकलण्यात आला. ‘द हिंदू’ने जर्मनी दौऱ्यावर असणाऱ्या भगवंत मान यांची प्रकृती ठीक नसल्याने विमान प्रवास लांबला असल्याचं वृत्त दिलं आहे. मात्र सोशल मीडियावर भगवंत मान यांच्याबाबत इतर दावे होत असून आम आदमी पक्षानेही त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सविस्तर बातमी

15:52 (IST) 19 Sep 2022
नाशिक : पुलावरुन तोल गेल्याने युवती दुचाकीसह पाण्यात गेली वाहून

निफाड तालुक्यातील उगाव येथील पुलावरून दुचाकीवरून जात असताना तोल जाऊन पडल्याने महाविद्यालयीन युवती वाहनासह पाण्यात वाहून गेली. स्थानिकांनी धाव घेऊन तिला बाहेर काढले. परंतु, तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सोमवारी सकाळी सात वाजता ही घटना घडली.

सविस्तर वाचा

15:47 (IST) 19 Sep 2022
तीन वर्ष उलटुनही प्रतिनियुक्तीवरील शहर अभियंतांचा कल्याण-डोंबिवलीत मुक्काम

राज्य शासनाकडून महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या वर्ग एक अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती ही तीन वर्षासाठी कालबध्द असते. तीन वर्षानंतर किंवा अशा अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्याची त्या पालिकेतून बदली केली जाते. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली कल्याण डोंबिवली पालिकेत नोव्हेंबर २०१८ मध्ये येऊन, त्यांचा प्रतिनियुक्ती तीन वर्षाचा कालावधी संपुनही शासनाने त्यांची आतापर्यंत बदली न केल्याने शासकीय, पालिका अधिकारी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

सविस्तर वाचा

15:26 (IST) 19 Sep 2022
वर्धा : पंतप्रधान मोदींबाबतच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद; नाना पटोलेंचा पुतळा जाळला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहेत. तैलिक महासभेने आज त्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदवला. एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी ‘नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत,’ असे वक्तव्य केले होते. यामुळे ओबीसी व तेली समाजाच्या भावना दुखावल्याचा सूर उमटला.

सविस्तर वाचा

14:55 (IST) 19 Sep 2022
‘फॉक्सकॉन’ प्रकरणी मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले - जयंत पाटलांनी साधला निशाणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन'चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता, तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले.” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

14:54 (IST) 19 Sep 2022
“…तर राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील” ‘त्या’ विधानावरून भास्कर जाधवांची खोचक टीका

रविवारी दापोलीमध्ये शिंदे गटाची सभा झाली आहे. या सभेतून माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली आहे. येत्या काळात मी चिपळून आणि गुहागर येथे सभा घेऊन भास्कर जाधवांची पळता भुई थोडी करणार आहे, असं रामदास कदमांनी आपल्या भाषणात म्हटलं. रामदास कदमांच्या टीकेनंतर शिवसेना नेते भास्कर जाधवांनी त्यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. सविस्तर बातमी

14:46 (IST) 19 Sep 2022
वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून दहशत माजविणारा गजाआड; समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित

वाढदिवसाचा केक कोयत्याने कापून समाजमाध्यमावर चित्रफीत प्रसारित करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेने अटक केली. आतिष जालिंदर लांडगे (वय २६,रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लांडगे याने वाढदिवसानिमित्त कासेवाडीत हातात कोयता घेऊन भरचौकात दहशत माजविली.

सविस्तर वाचा

14:40 (IST) 19 Sep 2022
घाटंजीत अस्वलाचा धुमाकूळ; वन विभागाने केले जेरबंद

घाटंजी शहरात रविवारी रात्रीच्या सुमारास एका अस्वलाने चांगलाच धुमाकूळ घातला. शहरातील जंगल परिसरातून रात्री ९ वाजताच्या सुमारास हे अस्वल न्यायालय परिसरात आले. रात्री अस्वल बघायला नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती.

सविस्तर वाचा

14:31 (IST) 19 Sep 2022
लेटलतीफ पालिका कर्मचाऱ्यांचे गांधीगिरीने स्वागत; उल्हासनगर पालिका प्रशासनाकडून पुष्प देत करून दिली जाणीव

कार्यालयीन वेळ चुकवत कायमच उशिराने कार्यालयात येणाऱ्या उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांचा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंचलित हजेरी पद्धत असतानाही हे कामगार उशिराने येत असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत होता. त्यात विभाग प्रमुखही कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते.

सविस्तर वाचा

14:22 (IST) 19 Sep 2022
संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला

पत्राचाळ प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. आता संजय राऊतांचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी १४ दिवस वाढला आहे. आज त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली होती. वाचा सविस्तर बातमी...

14:20 (IST) 19 Sep 2022
डोंबिवली : लोढा हेरिटेजमध्ये पेट्रोल चोरी करणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला रहिवाशांनी पकडले

डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा, नवनवीत नगर, लोढा हेरिटेज भागातील सोसायट्यांच्या आवारात रात्रीच्या वेळेत येऊन तेथील दुचाकींमधील पेट्रोल चोरुन काळ्या बाजारात विकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणाला लोढा हेरिटेजमधील रहिवाशांनी दोन दिवसापूर्वी पकडून मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. बातमी वाचा सविस्तर ...

14:16 (IST) 19 Sep 2022
प्रकल्प पळवापळवीतून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव; छगन भुजबळ यांचा आरोप

महाराष्ट्रात होणारा वेदांता प्रकल्प गुजरातला हलविण्यात आला आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्याचा घाट घालून मुंबई, महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप माजीमंत्री छगन भुजबळ यांनी केला. ही दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 19 Sep 2022
चायनीज स्टॉल चालवून राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

पुणे : समाजातील बेरोजगारीच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे बेरोजगारी व महागाईविरोधी प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. बातमी वाचा सविस्तर ...

13:59 (IST) 19 Sep 2022
लोकसभेसाठी भाजपचे ‘मिशन ४५’; केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलढाण्यात

बुलढाणा : ‘मिशन ४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील आपल्या पहिल्या दौऱ्यात केंद्रीय श्रम, वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी रविवारी बैठकींचा सपाटा लावला. त्यांनी खामगाव मतदारसंघात आयोजित विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसह विविध समाजघटकांचे विचार ऐकून घेत आपल्या मार्गदर्शनात ‘शत प्रतिशत भाजप’वर भर दिला. बातमी वाचा सविस्तर ...

13:47 (IST) 19 Sep 2022
अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद कबूल केलं होतं? राज ठाकरे स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे यावर इतका गोंधळ मी इतक्या वर्षाच्या राजकारणात पाहिलेला नाही असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. राज ठाकरे पाच दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपा-शिवसेनेची युती तुटण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या मुद्द्यावरही भाष्य केलं. भाजपा-शिवसेना युतीमध्ये १९८९ साली मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्यूला ठरला होता याची आठवणही त्यांनी करुन दिली.

सविस्तर बातमी

13:46 (IST) 19 Sep 2022
दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे-शिंदे गट आमने-सामने असताना शरद पवारांचं विधान, म्हणाले “शिंदेंनाही अधिकार, पण…”

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान मिळविण्याकरिता शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या गटामध्ये रस्सीखेच सुरू असून मुंबई महापालिकेने कोणाला परवानगी द्यायची याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावे याकरिता बंडखोर आमदारांच्या गटाने केलेला अर्ज ‘एमएमआरडीए’ने स्वीकारला आहे. त्यामुळे शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळणार की नाही याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

13:13 (IST) 19 Sep 2022
घरबसल्या ऑनलाईन खोटे रेटींग देण्याचे काम पडले महागात

ठाणे : पर्यटन कंपन्यांच्या संकेतस्थळावर खोटे रेटींग दिल्यास दिवसाला एक हजार रुपये मिळतील असे सांगून काही भामट्यांनी एका आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख ५० हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:22 (IST) 19 Sep 2022
पुण्यातील रंगपंढरी संस्थेची ‘विषाद’ एकांकिका ठरली प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी

पुणे : रंगपंढरी, पुणे या संस्थेच्या कलाकारांनी सादर केलेली ‘विषाद’ एकांकिका सांघिक विजेतेपदासह विनोदमूर्ती प्रकाश इनामदार करंडकाची मानकरी ठरली. विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत कलादर्शन संस्थेच्या ‘यशोदा’ आणि मुक्ताई फाऊंडेशनच्या ‘उरूस’ एकांकिकेने अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. बातमी वाचा सविस्तर ...

12:09 (IST) 19 Sep 2022
काँग्रेसच्या राजस्थान अधिवेशनातील निर्णयाला बगल

चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या राजस्थान येथे झालेल्या अधिवेशनात एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना पदे न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, प्रदेश काँग्रेस समितीत प्रदेश प्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, राजुराचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी आमदार अविनाश वारजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतिश वारजूरकर या एकाच कुटुंबाला संधी देण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

11:39 (IST) 19 Sep 2022
“…देशातील ८ राज्यांनी,” खरी शिवसेना आणि दसरा मेळाव्यावरून भाजपा खासदाराचे विधान

भाजपाचे खासदार प्रसाद लाड यांनी खरी शिवसेना कोणाची? तसेच शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर भाष्य केले आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे मत जनतेचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे. त्यामुळे जनतेला शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामध्येच विचारांचे सोने लुटायला आवडेल, असे लाड म्हणाले आहेत. ‘एबीपी माझा’ने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे. वाचा सविस्तर

11:24 (IST) 19 Sep 2022
बांबूची उत्पादने विकण्यासाठी ‘ई-मार्केटिंग’ची स्वतंत्र व्यवस्था

नागपूर : राज्यातील बाबू कारागिरांना एकत्र करून त्यांनी तयार केलेली बांबूची विविध उत्पादने विकण्यासाठी ई-मार्केटिंगची स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याची योजना आहे. शिवाय बुरुड येथे ‘कॉमन फॅसिलिटी सेंटर’ सुरू करणार असल्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांना होईल, असे प्रतिपादन प्रधान मुख्य वन संरक्षक (वनबल प्रमुख) वाय. एल. पी. राव यांनी केले. बातमी वाचा सविस्तर ...

11:09 (IST) 19 Sep 2022
पुणे जिल्ह्यात १७६ जणांना नव्याने करोनाचा संसर्ग

रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील १७६ जणांना करोना संसर्गाचे निदान झाले. राज्याच्या साथरोग सर्वेक्षण विभागाने याबाबत माहिती दिली. मात्र, बहुसंख्य करोना रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते घरच्या घरी बरे होत असल्याने घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

10:52 (IST) 19 Sep 2022
‘लंपी’ आजाराचा प्रभाव वाढतोय ; ३ जनावरांचा मृत्यू, ३८ बाधित

नागपूर : जिल्ह्यामध्ये सावनेर, हिंगणा, मौदा, पारशिवनी, नागपूर ग्रामीण या पाच तालुक्यात ‘लंपी’ आजाराचा अधिक प्रादुर्भाव असून आतापर्यंत तीन जनावरे मृत्युमुखी पडली तर ३८ जनावरे बाधित झाली आहेत. बातमी वाचा सविस्तर ...

10:41 (IST) 19 Sep 2022
झवेरी बाजारात बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई : मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून झवेरी बाजार व अहमदनगर येथे बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याप्रकरणी लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी २४ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून मोबाइल संच जप्त करण्यात आला असून त्याच मोबाइलच्या साहाय्याने आरोपीने धमकी दिल्याचा पोलिसांना संशय आहे. बातमी वाचा सविस्तर ...

10:30 (IST) 19 Sep 2022
फाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : कांदिवली (पश्चिम) येथे प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दांडिया क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

10:11 (IST) 19 Sep 2022
नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत

सर्वच धरणे तुडूंब असताना पावसाचा जोर कायम असल्याने या हंगामात नाशिकमधून जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत तब्बल १०४ टीएमसी पाणी प्रवाहीत झाले आहे. मराठवाड्यातील जायकवाडी हे १०२ टीएमसी क्षमतेचे विशाल धरण आहे. बातमी वाचा सविस्तर ...

09:56 (IST) 19 Sep 2022
“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान

"अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील," असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. येथे क्लिक करुन जाणून घ्या नेमकं प्रकरण आहे तरी काय...

09:55 (IST) 19 Sep 2022
‘संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद द्यावा’ – कलापिनी कोमकली यांची भावना

पुणे : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डाॅ. प्रभा अत्रे यांच्या नावाचा पुरस्कार त्यांच्याच हस्ते स्वीकारला याचा आनंद वाटतो. त्यांच्याप्रमाणेच माझे संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद मला द्यावा. हा आशीर्वादच माझा मार्ग प्रशस्त करेल, अशी भावना प्रसिद्ध गायिका कलापिनी कोमकली यांनी रविवारी व्यक्त केली. बातमी वाचा सविस्तर ...

09:35 (IST) 19 Sep 2022
रेल्वे स्थानकाबाहेर प्रवासी महिलेच्या खूनातील रहस्य उलगडले

पनवेल : चार दिवसांपूर्वी पनवेल रेल्वेस्थानकातील पूर्वबाजूस नवीन पनवेल वसाहतीमध्ये स्थानक परिसरात ३९ वर्षीय प्रियंका रावत या प्रवासी महिलेचा अनोळखी मारेक-यांनी खून केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली होती. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस दलाने वेगवेगळी शोधपथक स्थापन करुन मारेक-यांचा तपास सुरु केला होता. बातमी वाचा सविस्तर ...

09:30 (IST) 19 Sep 2022
बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा काही संशय आहे का? रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रेच्या माध्यमातून केलेल्या टीकेला आता शिंदे गटाकडून उत्तर दिलं जात आहे. दापोलीमध्ये शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं. बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? अशी विचारणा रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना केली.

सविस्तर बातमी

09:29 (IST) 19 Sep 2022
“…तर मी व्हिडीओ बाहेर काढणार”, नितीश देशमुख यांचा शिंदे गटाला इशारा

शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. सूरत आणि गुवाहाटीमधील अनेक व्हिडीओ आपल्याकडे असून, ते समोर आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नितीन देशमुख एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. मात्र नंतर ते तेथून परत आले होते. अकोल्यात शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी शिंदे गटासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही लक्ष्य केलं.

सविस्तर बातमी

09:28 (IST) 19 Sep 2022
पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, सहाजण जखमी

पुणे-सासवड रोडवरील ऊरळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे.

सविस्तर बातमी

09:07 (IST) 19 Sep 2022
“राज्यात पैशांनी सत्तांतर झालं, ...तर विधानसभेत आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही”

नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत, जे गुवाहाटी येथून उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले होते. याच नितीन देशमुखांनी आता राज्यातील सत्तांतरावर मोठे विधान केले आहे. राज्यात पैशांच्या मदतीने सत्तांतर झाले असून मी ते सिद्ध करू शकलो नाही, तर महाराष्ट्राच्या विधानसभेत आत्महत्या करेन, असे नितीन देशमुख म्हणाले आहेत. ते रविवारी (१८ सप्टेंबर) अकोला जिल्ह्यात एका सभेला संबोधित करत होते. वाचा सविस्तर

Maharashtra-News-Live-Updates-19-september

मुंबई महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज अपडेट, महाराष्ट्र न्यूज अपडेट