Marathi News LIVE Updates : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अद्यापही अनेक खुलासे समोर येत आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. यातच आता आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. बीडमधील मारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी काल उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला अटक केली. यातच खोक्या भोसले याच्या वन विभागाच्या जमिनीवर केलेल्या अनाधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. आज खोक्या भोसलेला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या बरोबरच राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरु आहे. राज्याच्या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या बरोबरच राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
Maharashtra Highlights News Today, 14 March 2025 : राज्यातील राजकीय व इतर सर्व घडामोडी जाणून घेऊयात.
कोस्टल रोडवरील विजेच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरीला, वर्षा गायकवाड यांची पालिका प्रशासनावर टीका
"चोर… चोर… चोर… चोर… ऐकलंत का? कोस्टल रोडवरील विजेच्या खांबांवरील तांब्याच्या तारा चोरीला गेल्या, आणि त्यामुळं तिथे गेल्या महिन्याभरापासून अंधार आहे. जिथे पादचाऱ्यांना चालण्याचीही परवानगी नाही, तिथे चोर सहज आत घुसतो, इतक्या जाडजूड तांब्याच्या तारा उचलून नेतो, आणि आपल्या सरकारी यंत्रणेला याची साधी खबरही लागत नाही! किती अजब परिस्थिती आहे! निष्काळजीपणाची एखादी ऑलिंपिक स्पर्धा असती, तर आपल्या महापालिकेला आणि सरकारला हरवणं अशक्यच झालं असतं!" अशी पोस्ट काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे.
"चित्र विचित्र चारोळी करत 'बुरा ना मानो होली है' म्हणणं सोप्पं आहे...पण देव, देश, धर्म ह्यांची स्वयंघोषित मक्तेदारी घेतलेल्या पक्षाचे पदाधिकारी काय दिवे लावत आहेत त्यावर पण एक नजर टाकणे गरजेचे आहे !!! आता राज्य सरकार, महिला आयोग पीडित अल्पवयीन मुलीला आणि तिच्या पालकांना जाऊन 'बुरा ना मानो होली है' न म्हणो म्हणजे मिळवली," रोहिणी खडसे यांनी एक्सवर नाशिकमधील अत्याचाराच्या घटनेच्या वृत्ताचा फोटो पोस्ट करत राज्य सरकार आणि महिला आयोगावर टीका केली आहे.
"भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी आमच्याबरोबर यावं", उपमुख्यमंत्री शिंदे यांचं विधान, नाना पटोलेंनाही दिलं प्रत्युत्तर
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असं पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी शिंदे व पवार या दोघांना मुख्यमंत्रिपदाची खुली ऑफर दिली आहे. आता यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले की, "भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी सोबत यावं. भगवा रंग हा हिंदुत्वाचा रंग आहे. भगवा रंग हा वैश्विक आहे. भगवा रंग हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाणारा आहे", असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
‘माझं काही खरं नाही’ या विधानावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी नाराज नाही, मला आता बाहेर…”
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानाची मोठी चर्चा रंगली. ‘माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर ते पक्षात नाराज आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. दरम्यान, यानंतर अखेर जयंत पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपल्याला आता बाहेर बोलण्याचीही चोरी झाली असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
पिंपरी- चिंचवड: मोशीत वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड!
मोशी मध्ये दोन टोळक्यांनी काही वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी भोसरी एम.आय.डी.सी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे. नागरिकांमधील भीतीच वातावरण कमी करण्यासाठी या नऊ जणांची घटनास्थळावरून धिंड काढण्यात आली. सविस्तर वाचा
जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यासह तिघांविरुद्ध गुन्हा; बांधकाम ठेकेदाराकडे लाचेची मागणी
बांधकाम ठेकेदाराकडून सादर केलेले देयक मंजूरी, तसेच कामाची पाहणी करून अहवाल देण्यासाठी अडीच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता महिलेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला. सविस्तर वाचा
अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार लवकरच विवाह बंधनात….
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच लग्न बंधना मध्ये बांधले जाणार आहेत, जय पवार यांचा विवाह ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे, सविस्तर वाचा
अमेरिकेतील बड्या तंत्रज्ञान कंपनीची पुण्यात गुंतवणूक! हजारो उच्चशिक्षित तरुणांना नोकरीची संधी
पुणे : अमेरिकेतील तंत्रज्ञान आणि डिजिटल परिवर्तन उपाय क्षेत्रातील ‘यूएसटी’ कंपनीने पुण्यात गुंतवणूक केली आहे. कंपनीने पुण्यात नवीन कार्यालय सुरू केले आहे. यामुळे कंपनीचे भारतातील जाळे अधिक मजबूत होणार आहे. या कार्यालयीन विस्तारातून पुढील ३ ते ५ वर्षांत पुण्यात सुमारे ३ हजार ५०० ते ६ हजार नोकऱ्या निर्माण करण्याची योजना कंपनीने आखली आहे.
सतीश वाघ खून प्रकरणात: गुन्हे शाखेकडून आरोपपत्र; अक्षय जावळकर, मोहिनी वाघ मुख्य सूत्रधार
पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. वाघ यांच्या खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर आणि वाघ यांची पत्नी माेहिनी असल्याचो पोलिसांनी केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार, रोहिणी खडसेंचा संताप; म्हणाल्या, “त्यांचा आका…”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला शाखेच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी आज (१४ मार्च) जळगावात धुलीवंदन सण साजरा केला आणि राज्यातील जनतेला होळी व धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्या म्हणाल्या, “राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावं. महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडेच एक सर्वेक्षण झालं, ज्या सर्वेक्षणाच्या अहवालात असं म्हटलं आहे की आशिया खंडातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित देशांपैकी भारत एक आहे. या यादीत भारताची गणना होणं हे भारतासाठी खूपच दुर्दैवी आहे.”
असंसर्गजन्य आजारावरील पहिले केंद्र नागपुरात; एम्समध्ये युनिसेफतर्फे…
नागपूर: भारतात प्रौढांप्रमानेच लहान मुलांमध्येही लठ्ठपना, अस्थमा, मधूमेहासह इतरही असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे विविध गुंतागुंतीतून मोठ्या प्रमाणावर मृत्यूही होतात. या आजारावर नियंत्रणासाठी युनिसेफने पुढाकार घेत भारतात काही असंसर्गजन्य आजारावरील केंद्र विकसित करण्याचे निश्चित केले आहे.
खोक्या भोसलेच्या बहिणीची उद्विग्न प्रतिक्रिया; म्हणाल्या, “कायदेशीर चौकशी मान्यच आहे, पण…”
बीड पोलिसांनी गुरुवारी आमदार सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक केली असून शुक्रवारी सकाळी त्याला बीडमध्ये आणण्यात आलं. एकीकडे त्याची अटक झाली असताना दुसरीकडे बीडमधील वनविभागाच्या एका जमिनीवर बांधण्यात आलेलं त्याचं मोठं घर आणि घराला लागून असणारं कार्यालय बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आलं. त्यामुळे आरोपी वा गुन्हेगारांच्या घरांवर पाडकाम कारवाई होत असल्याचं दिसत असताना खोक्या भोसलेच्या बहिणीनं उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनात वाढ; सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ३०,५२० रुपये किमान वेतनाची घोषणा
नागपूर: राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावे वगळता इतर सर्व ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यात येणार आहे. यासंदर्भात कामगार विभागाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेवर पुढील दोन महिन्यांत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
कल्याण, डोंबिवलीत मटण खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; धुळवडीनिमित्त मटणाच्या रश्यावर ताव मारण्याची तयारी
धुळवडीचा आनंद घेत असताना उधळलेले रंग, मौजमजेत गाण्यांच्या तालावर ठेका धरून झाल्यानंतर दुपारच्या वेळेत पोटात पडणारी वखवख भरून काढण्यासाठी भोजनपण झणझणीत पाहिजे. म्हणून शुक्रवारी पहाटेपासून कल्याण, डोंबिवलीतील नागरिकांनी सकाळ, दुपारनंतर मटण मिळते की नाही या भीतीने मटण विक्रेत्यांच्या दुकानासमोर रांगा लावल्या होत्या.
धुळवळीला नागपुरात कापले पंधरा हजारांवर बोकड, दोनशे रुपयांनी भाव वाढले, दहा टनांहून अधिक चिकनची विक्री
नागपूर: होळीच्या दिवशी मटण, चिकनची विक्रमी विक्री वाढली. शुक्रवारी होळीचा आनंद घेणाऱ्यांचा मांसाहारी होण्याचा उत्साह महागडा चिकन आणि मटणाने कमी केला नाही. नियमित किमतीपेक्षा धुलीवंदनाच्या दिवशी जास्त होती. शहरातील विविध भागात चिकन आणि मटणाच्या दुकानांवर रांगा लागल्या होत्या आणि ते होळीच्या दिवसाचे वैशिष्ट्य राहिले.
अखेर… वनविभागामुळे बिबट माता, पिल्लाची भेट!; नांदुऱ्यात 'आई' अन शावक ची झाली होती ताटातूट
बुलढाणा: नांदुरा तालुक्यातील जवळा बाजार परिसरात बिबट माता आणि तिच्या पिल्लाची ताटातूट झाली. वियोगामुळे माता कासावीस, अस्वस्थ झाली तर दिडेक महिन्याचे शावक भयभीत झाले होते. दुसरीकडे जवळा बाजार मधील गावकरी आणि शेतकरी भयभीत झाले होते... मात्र वनविभागाने अखेर माता आणि तिच्या लेकराची भेट घडवून आणली.
सव्वा तीन हजार ग्राहकांवर कोसळली कारवाईची ‘वीज’; वाचा नेमकं प्रकरण काय?; २६४ कोटींच्या वसुलीसाठी ‘बत्तीगुल’
अकोला : वीज वापर करून त्याचे देयक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या अकोला परिमंडळातील सव्वा तीन हजारावर ग्राहकांवर कारवाईची ‘वीज’ कोसळली आहे. थकबाकीदार ग्राहकांची ‘बत्तीगुल’ केली. २६४ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. देयक भरण्यासाठी प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील तीन हजार २८३ वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील ५१८ गुन्हेगारांवर गावबंदी
चंद्रपूर: पोलिस शिपाई दिलीप चव्हाण यांच्या हत्येनंतर पोलिस दल सक्रीय झाला आहे. होळी व धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी व शांततेचे वातावरण राहावे यासाठी जिल्ह्यातील ६४१ नोंद असलेल्या गुन्हेगारांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १६३ अन्वये तडीपार व गाव परिसरात प्रत्यक्ष अटक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली
सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पोलिसांनी सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातून अटक केलं आहे. तसेच सतीश भोसलेचं घर वनविभागाने पाडलं आहे. मात्र, हे घर पाडल्यानंतर घर जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आता सतीश भोसलेचं हे घर कोणी जाळलं? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, आज सतीश भोसले उर्फ खोक्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने सतीश भोसले उर्फ खोक्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नागपूर : एअर कॉम्प्रेसरचा स्फोट, प्रसिद्ध राम भंडारला आग
नागपूर : नागपूरचे प्रसिद्ध मिष्ठान्न भंडार आणि लोकपसंतीस उतरले रेस्टॉरंट्स राम भंडार ( प्रतापनगर) मध्ये एअर कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन आग लागली. या हॉटेलमधील ही दुसरी घटना आहे.
दादर स्थानकात मद्यधुंद प्रवाशाकडून महिलेचा विनयभंग
दादर रेल्वे स्थानकात मद्यधुंद व्यक्तीने एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. मात्र या घटनेनंतर प्रवाशांनी महिलेचा विनयभंग करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला. सविस्तर वाचा…
"गावगुंडांना अटक करा आणि आम्हाला...", खोक्याच्या नातेवाईकांनी केली मोठी मागणी
सतीश भोसले उर्फ खोक्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. पोलिसांनी सतीश भोसलेला उत्तर प्रदेशातून अटक केलं आहे. तसेच सतीश भोसलेचं घर वनविभागाने पाडलं आहे. मात्र, हे घर पाडल्यानंतर घर जाळण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आता सतीश भोसलेचं हे घर कोणी जाळलं? याबाबतची माहिती समोर आलेली नाही. मात्र, यावरून आता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या नातेवाईकांनी मोठी मागणी केली आहे. "गावगुंडांना अटक करुन आम्हाला न्याय मिळवून द्यावा", अशी मागणी खोक्याच्या नातेवाईकांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
अवैध शिकार : वाघांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी ‘थर्मल ड्रोन’
वाघांची अवैध शिकार थांबविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तसेच तपास करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरासह थर्मल ड्रोन चा वापर करण्याचा निर्णय जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत घेण्यात आला. सविस्तर वाचा…
म्हाडा कार्यालय पैशांची उधळण प्रकरण : ११ अर्जदारांची २१ मार्चला पुन्हा सुनावणी
विक्रोळी, कन्नमवार नगर संक्रमण शिबिरातील ११ संक्रमण शिबिरार्थींना नवीन संक्रमण शिबिरातील घरे नाकारण्यात आल्याचा आरोप करीत एका महिलेने पैशांची माळ घालत, पैशांची उधळण करीत आंदोलन केले होते. सविस्तर वाचा…
पूर्व द्रुतगती मार्गावर ऑइल सांडल्याने वाहनांचा अपघात
पूर्व द्रुतगती मार्गावर शुक्रवारी पहाटे टँकरमधून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती झाली. पूर्व द्रुतगती महामार्गावर सांडलेल्या ऑइलमुळे अनेक वाहनांचे अपघात झाले. सुदैवाने या अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही. सविस्तर वाचा…
मान्यता नसतानाही नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेशप्रक्रिया, ५० लाख दंड…
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील मनुष्यबळ विकास व संशोधन बहुउद्देशीय संस्था संचालित एसआरव्ही नर्सिंग कॉलेजला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ५० लाख रुपयांचा दंड ठोठावत दणका दिला. या महाविद्यालयाने जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी मान्यता न घेता विद्यार्थ्यांना प्रवेश दिला होता.
दूध दरात दोन रुपयांनी वाढ; जाणून घ्या, दरवाढ का आणि कधीपासून
उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. आईस्क्रीमसह अन्य दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे. सविस्तर वाचा…
नाना पटोलेंची एकनाथ शिंदे-अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर! म्हणाले, “त्यांचे पक्ष टिकणं…”
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. “आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ”, असं पटोले यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांनी शिंदे व पवार या दोघांना मुख्यमंत्रिपदाची खुली ऑफर दिली आहे. आता यावर महायुतीच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकनाथ शिंदे आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. त्यांची नव्या सरकारचं नेतृत्व करण्याची इच्छा होती. तसेच अजित पवारांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शिरुर: उसतोड मजुर पत्नीचा खून करून फरार झालेल्या आरोपीस अटक
शिरुर : गणेगाव खालसा ,ता. शिरूर जि. पुणे येथे ११ फेबृवारी २०२५ रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ झालेश्वर आत्माराम गांगुर्डे रा. दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव यांची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय २७ वर्ष यांनी नाशिक येथे त्यांचे नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून मीनाबाई यांना रस्सीने लोखंडी बाजेला बांधून गळा आवळून खून केला होता.
वाहतूक पोलिसांची गेल्या तीन वर्षातील विक्रमी चालान कारवाई; ६७२ वाहनचालकांवर चालान कारवाई
नागपूर : वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम सुरु केली. एका दिवसातच विरूद्ध दिशेने वाहन चालविणे (राँग साईड), सिग्नल मोडणाऱ्या (जम्पींग) करणाऱ्या ६७२ जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. गेल्या तीन वर्षांतील ही विक्रमी चालान कारवाई आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्याला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली. (फोटो-संग्रहित छायाचित्र)