Marathi News Updates: महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात नुकताच अजित पवारांनी ११व्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातील तरतुदींवर सध्या विरोधकांकडून सरकारला घेरलं जात असताना बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण व त्यानिमित्ताने थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यापर्यंत पोहोचलेलं राजकीय प्रकरण यावरही सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.
Maharashtra News Live Today, 12 March 2025 : महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या घडामोडी...
खटले दाखल असणाऱ्यालाच पोलीस ठाणे बांधकामाचे कंत्राट, उच्च न्यायालयात…
नागपूर: यवतमाळमधील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे बांधकाम पोलिसांनी स्थानिक गुन्हेगारांच्या आर्थिक सहाय्याने केली तसेच बांधकामासाठी कुठलीही रीतसर परवानगी घेतली नाही. पोलिसाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकाराची कबूली उच्च न्यायालयात दिली.
नागपुरात अपंगांची मोजणी होणार, महापालिकेतर्फे लवकरच सर्वेक्षण…
नागपूर : अपंगांचा एकत्रित डाटा उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक अपंग व्यक्तीपर्यंत योजना पोहोचविण्यात अडचण निर्माण होत असल्याने महापालिका लवकरच शहरातील अपंगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. महापालिकेच्या आरोग्य आणि समाज विकास विभागाद्वारे बुधवारी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये महात्मा गांधी सेवा संघ यांच्या माध्यमातून अपंग सर्वेक्षणाबाबत आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षण घेण्यात आले.
छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकरला १७ मार्चपर्यंत दिलासा
नागपूर: राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करीत इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करणारा कथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला असून पुढील सुनावणी येत्या १७ होणार आहे.
रेडी रेकनरच्या दरामध्ये वाढ? महसूल मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले…
नागपूर: रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर वाढले, तर काही ठिकाणी दर स्थिर ठेवण्यात आले. २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. काही माध्यमांमध्ये १०-१५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत, मात्र त्या सर्व चर्चा निराधार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केले.
“विकासासाठी फडणवीस काय करतात ते पाहा”, इन्फोसिसच्या माजी अधिकाऱ्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला
मोहनदास पै यांनी कर्नाटकच्या आर्थिक दृष्टिकोनाची तुलना महाराष्ट्राच्या आक्रमक विकास धोरणांशी केली, यावेळी त्यांनी विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. “फडणवीस काय करत आहेत, त्यांचे विचार, त्यांची धोरणे, त्यांची दृष्टी आणि मुंबईतील गुंतवणूक पहा आणि बेंगळुरूसाठी आमच्या सरकारच्या दृष्टीकोणाकडे पहा. हे खूप दुःखद!”
दोन मिनिटांच्या उशीरामुळे स्पर्धा परीक्षा हुकली; विद्यार्थिनीची व्यथा
नाशिक - स्पर्धा परीक्षेसाठी अवघ्या दोन मिनिटांचा उशीर झाल्याने महिला उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
साडेचार दशकांनंतर ‘छावा’ आता इंग्रजीतही, उदंड मागणीमुळे कादंबरीचा अनुवाद अमराठी वाचकांसाठी खुला
पुणे : ‘छावा’ चित्रपटाच्या भरघोस यशानंतर देशभरातील वाचकांकडून होत असलेल्या मागणीमुळे तब्बल साडेचार दशकांनंतर ‘छावा’ कादंबरी इंग्रजी अनुवादाच्या माध्यमातून अमराठी वाचकांसाठी खुली झाली आहे.
कृष्णा आंधळेला पाहिल्याच्या दाव्याने पोलिसांची धावपळ
नाशिक - बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार संशयित कृष्णा आंधळे नाशिक येथील गंगापूर रोड परिसरात दिसल्याची माहिती काही स्थानिकांनी दिल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. गंगापूररोड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा पथकांकडून स्थानिकांनी सांगितलेल्या भागात तपास करण्यात आला. परंतु, हाती काहीही लागलेले नाही.
अर्थसंकल्पात नवीन महाबळेश्वर प्रकल्पासह पर्यटनाला चालना
सातारा : राज्याच्या अर्थसंकल्पात साताऱ्यात पर्यटनाला चालला देण्यात आली आहे. याबरोबरच सावित्रीबाई फुले स्मारकाची घोषणा करण्यात आली आहे. मुनावळे,कोयना हेळवाक जलपर्यटन, नेहरू उद्यान, कोयना नगरला रोपे वे, स्कायवॉकची घोषणा करण्यात आली आहे.
धक्कादायक! चक्क मुख्यमंत्री शब्द वापरून योजनेची अफवा, अनाथांसाठी बाल आशीर्वाद…
अकोला : राज्यात मुख्यमंत्री शब्द वापरून चक्क बनावट योजनेची अफवा पसरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ बालकांसाठी 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' या नावाने राज्य शासनाची योजना असल्याचे भासवून समाज माध्यमांद्वारे संदेश प्रसारित केले जात आहेत.
ठाण्यातील मध्यवर्ती भागात १० ते १२ दुकानांत चोरी
ठाणे : ठाण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या चरईमध्ये १० ते १२ दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. एकाच चोरट्याने ही चोरी केली असल्याचा संशय असून नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या प्रकरणात किती रुपयांचा ऐवज चोरीला गेला याबाबतची माहिती अद्याप समजू शकली नाही.
चरई येथील एका भागात व्यवसायिक दुकाने आहेत. बुधवारी सकाळी व्यवसायिक दुकाने उघडण्यास आल्यानंतर त्यांना गाळ्यांमध्ये चोरी झाल्याचे आढळून आले. १० ते १२ दुकानांमध्ये अशाच प्रकारे चोरी झाली. घटनेची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाल्यानंतर नौपाडा पोलीस आणि गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गाळेधारकांचे जबाब नोंदविले जाणार असून त्यानंतर किती मुत्तेमाल चोरीला गेला. याबाबतची माहिती मिळणार आहे.
वृक्षतोड करण्यात आलेला परिसर वन विभागाकडे हस्तांतरित करा, पर्यावरणप्रेमींची वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे मागणी
नेरुळ सेक्टर ५२ ए परिसरात जवळजवळ २०० पेक्षा अधिक झाडे तोडल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर याबाबत पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली .
सिडकोच्या कंत्राटी कामगारांचे वेतन वेळेवर, तांत्रिक अडचणींमुळे अजूनही २५ जण वेतनाविना
नवी मुंबई : सिडको महामंडळामधील ३२५ हून अधिक कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात त्यांचे जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे वेतन १० मार्चला जमा झाले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सिडकोच्या कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने ‘लोकसत्ता’ने त्यांची व्यथा मांडली होती.
आधी पुनर्वसन मगच काळू धरण; जलसंपदा मंत्र्यांसोबतचे बैठकीत आमदार कथोरेंची भूमिका
ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवायची असेल तर काळू धरण तातडीने उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत. मात्र ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ अशी भूमिका स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी घेतली आहे. सविस्तर वाचा…
भिवंडीत मटका जुगार अड्ड्यावर क्राईम ब्रांचची कारवाई, १२ जणांविरोधात गुन्हा
ठाणे : भिवंडी येथील खाडीपार भागात अवैधपणे सुरू असलेल्या मटका या जुगार अड्ड्यावर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. या प्रकरणी १२ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात निजामपूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाडीपार भागातील अजयनगर परिसरात एका गाळ्यामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनीटला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, भिवंडी युनीटच्या पथकाने जुगार अड्ड्यावर कारवाई केली. त्यावेळी तेथे मटका हा जुगार खेळला जात होता. पोलिसांच्या पथकाने जुगार अड्डा चालविणाऱ्यांसह १२ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी ११ हजार ३१० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणात जुगार अड्डा चालविणारे आणि खेळण्यासाठी आलेल्या एकूण १२ जणांविरोधात पोलिसांनी निजामपूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.
पनवेल पालिकेची महिनाभरात ३५ कोटी रुपयांची कर वसुली
पनवेल : पनवेल महापालिकेने थकीत मालमत्ता करवसूलीसाठी अटकावणी करण्याची मोहिम हाती घेतल्यामुळे एका महिन्यात तब्बल ३५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पनवेल महापालिकेचा १८०० कोटी रुपयांचा कर थकीत आहे.पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी कर वसूलीचे उदिष्ट पालिका अधिकाऱ्यांना दिल्यानंतर १४ वेगवेगळी पथके महापालिकेच्या पाचही प्रभागात सक्रिय झाली आहेत.
गुंतवणूक परिषदेत १४२ सामंजस्य करार; १४ हजारहून अधिक रोजगार निर्मिती
नाशिक - उद्योग संचालनालयाच्यावतीने येथे आयोजित गुंतवणूक परिषदेत १४२ उद्योगांशी सामंजस्य करार झाले. यातून सहा हजार ४०४ कोटींची गुंतवणूक झाली असून त्यामुळे १४ हजार ४०३ रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. यातील काही उद्योगांनी जागा घेतल्या असून काहींचा जागेचा शोध प्रगतीपथावर आहे.
राज्य विधान परिषद निवडणूक : नांदेड भाजपामधून तिघांचा उमेदवारीसाठी दावा
राज्य विधान परिषदेतील पाच रिक्त जागा भरण्यासाठी येत्या २७ मार्च रोजी होणार्या निवडणुकीत भाजपाने अमरनाथ राजूरकर यांना संधी द्यावी, यासाठी खा.अशोक चव्हाण यांनी पक्षाकडे प्रयत्न चालवलेले असतानाच नांदेडमधून अॅड.चैतन्यबापू देशमुख यांच्यासह संजय कौडगे या जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचे समोर आले आहे.
गुन्हेगार प्रसारमाध्यमांशी बोलतात, पण पोलिसांना सापडत नाही हा सरकारचा गजब कारभार; रोहित पवारांचा टोला
बीडमधील अनेक गुन्ह्यांमधील फरार आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याने अटकेपूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली होती. अनेक दिवस पोलीस त्याच्या शोधात होते. पोलीस त्याला पकडण्यात असमर्थ ठरत असतानाच खोक्याने प्रसारमाध्यमांना बाईट दिले. यावरून आमदार रोहित पवार म्हणाले, "गुन्हेगार प्रसारमाध्यमांशी बोलतात, पण पोलिसांना सापडत नाही हा सरकारचा गजब कारभार आहे. या खोक्याच्या घरी गांजासुद्धा सापडला आहे. खोक्या मिडीयाला बाईट देतो, पण पोलिसांना सापडत नाही. आमदाराचा मुलगा बँकॉकला चालला होता त्याला मात्र लगेच शोधलं. सामान्य पत्रकार जो सामान्य माणसांचा आवाज म्हणून लढत होता त्याचा आवाज दाबला, त्याला जेल मध्ये टाकलं. पत्रकाराने आवाज उठवला तर मकोका लावण्याचा प्रयत्न केला जातो. आज एका पत्रकाराबाबतीत हे झालं उद्या इतरांबाबतीत होईल. "
हापूसची आवक वाढल्याने दरात घसरण, उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर
नवी मुंबई : वाशीतील एपीएमसी बाजारात हापूसची आवक वाढली असून बाजारभाव उतरले आहेत. वातावरणात उष्मा वाढल्याने आंब्याची तोडणी लवकर केल्याने मंगळवारी बाजारात हापूसच्या सहा हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. परंतु हापूसची लवकर तोडणी केल्याने बहुतांशी आंबे लहान आकाराचे आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वेश्या व्यवसाय चालविणारा उल्हासनगरचा ‘टोप्या अटकेत, टोप्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल
कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ मागील काही वर्षापासून वेश्या व्यवसायाचा अड्डा चालविणाऱ्या उल्हासनगरच्या तौफिक हिमायद सैय्यद उर्फ टोप्या (२६) याला महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री त्याच्या साथीदारांसह अटक केली. सविस्तर वाचा…
यशवंतरावांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला काहीजणांची व्यक्तव्य न परवडणारी : अजित पवार
शिवशाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरागामी महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची शिकवण आहे. आज मात्र, काही वक्तव्य होत असताना ती विरोधकांची असू द्यात अथवा सत्ताधारी पक्षाच्या व्यक्तीची असू द्यात यशवंतरावांच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला सहन होणार नसून, परवडणारी सुध्दा नसल्याची तीव्र नाराजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. सविस्तर वाचा…
मुनगंटीवारांच्या मागणीला यश, सरकार कडून मोठा दिलासा
चंद्रपूर : मातामहाकाली यात्रेकरूंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे हा निर्णय झाला असून, कार्यकर्त्यांच्या मागणीनंतर त्यांनी स्वतः झरपट नदीची पाहणी केली. यात्रेकरूंच्या सुविधांसाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत विशेष बैठक घेतली आणि त्यांच्या समोर यात्रेकरूंना आवश्यक असलेल्या सुविधांसाठी आग्रही मागणी केली. या प्रयत्नांनंतर हा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नंदुरबारसह धुळे जिल्ह्यात मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता, महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात निर्णय
नंदुरबार : मंदिरांमध्ये अनेक जण तोकडे कपडे परिधान करुन प्रवेश करत असल्याने मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी येथे झालेल्या पहिल्या महराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनात नंदुरबार आणि जिल्ह्यातील मंदिरांमध्ये लवकरच वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरातील श्री दंडपाणेश्वर संस्थानात झालेल्या या अधिवेशनास जिल्ह्यासह परिसरातील ८५ मंदिरांचे सुमारे १६१ विश्वस्तांसह पदाधिकारी तसेच हिंदू जनजागृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
नैना प्रकल्पग्रस्तांची लवादासमोर सुनावणी सुरू, विधिमंडळातील चर्चेनंतर तत्काळ सिडकोची माहिती
नवी मुंबई</strong> : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्रातील (नैना) शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवा, त्यानंतर विकासाला सुरूवात करा असा आक्रोश नैनाबाधितांच्यावतीने राज्याच्या विधिमंडळात आमदारांनी व्यक्त करुन २४ तास उलटले, तोच सिडको मंडळाने मंगळवारी प्रसिद्धी पत्रक काढून नैना प्रकल्पातील नगररचना ८ ते १२ योजनेतील भूधारकांसाठी नेमलेल्या लवादासमोर सुनावणी सुरू झाल्याची माहिती प्रसिद्ध केली.
चंद्रपूर : फुले दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची आहे. सात वर्षापूर्वी ७ ऑगस्ट २०१८ रोजी मुंबई येथे झालेल्या तिसऱ्या राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनातच ही मागणी लावून धरण्यात आली होती असा दावा भाजपा ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे यांनी केला आहे.
वाशीकडून मुंबईकडे जाणारा नवा उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
वाशी येथील ठाणे खाडीवर मुंबई-पुणे, पुणे-मुंबई अशा दोन्ही दिशांना दोन नवीन बहुचर्चित उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुलाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. सविस्तर वाचा…
'हवामान बदल जागतिक समस्या, अनेक दुष्परिणाम; प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी…
अकोला : गत काही वर्षांपासून हवामान बदल एक जागतिक समस्या म्हणून समोल आली आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत. प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करणे ही जमेची बाजू असल्याचे मत कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केले.
बांगलादेशी अटक वाशी आणि एपीएमसी पोलिसांची कारवाई; बांगलादेशी नागरिकांना अटक
नवी मुंबई : एपीएमसी आणि वाशी पोलिसांनी बेकायदा पद्धतीने राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली. वाशी सेक्टर ३१ येथील झोपडपट्टीत राहणाऱ्यांवर वाशी पोलिसांनी तर कोपरी गावात राहणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीवर एपीएमसी पोलिसांनी कारवाई केली. वाशी सेक्टर ३१ येथील शिवमंदिर परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या राजू सय्यदुल गाझी उर्फ मसूद शेख (वय ३८) याच्याकडे भारतीय नागरिक असल्याचा पुरावा नसल्याने त्याला अटक केली. तो बांगलादेशातील जसत जिल्ह्यातील शामतारा गावाचा रहिवासी आहे. घुसखोरीच्या मार्गाने त्याने भारतात प्रवेश केला होता. दुसऱ्या प्रकरणात कोपरी गावातील सैदुल मोहम्मद शेख (वय २१) याला अटक केली. तो बांगलादेशातील कालिया जिल्ह्यात नोडाई गावाचा तो रहिवासी असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
सिडकोच्या घरांच्या चटई क्षेत्रात तफावत; इरादा पत्रांमधील माहितीने विजेते संभ्रमात
नवी मुंबई सिडको महामंडळाने २६ हजार घरांच्या महासोडतीत १९,५१८ विजेत्यांना चार दिवसांपूर्वी घराचे इरादा पत्र (लेटर ऑफ इंटेंट) पाठवले. या पत्रात ३२२ चौरस फुटांच्या घराचे क्षेत्रफळ २७.१२ चौरस मीटर दर्शविण्यात आल्यामुळे विजेत्यांना धक्का बसला आहे.
आष्टीचे आमदार सुरेश धस
Maharashtra News Live Today, 12 March 2025 : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या बीडमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.