Maharashtra Breaking News Updates: महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले. तसंच या प्रकरणात समित कदम यांचंही नाव घेतलं. ज्यानंतर समित कदम यांनी माध्यमांसमोर येत देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं आहे. तर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांचे आरोप योग्य आहेत, मला त्याची खात्री आहे असा दावा केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आणि कळीचा नारद आहेत अशीही टीका केली आहे. महाराष्ट्रात मणिपूर सारखी स्थिती निर्माण होऊ शकते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Live Updates

Rain Update Live Today: देवेंद्र फडणवीस कळीचा नारद, संजय राऊत यांची टीका; इतर महत्वाच्या घडामोडी

19:18 (IST) 29 Jul 2024
पनवेलमध्ये २५ ठिकाणी डासांचे पैदास केंद्र; महापालिकेची विकसक आणि गृहनिर्माण सोसायटीला नोटीस

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात जून महिन्यात डेंग्यूचे १५ आणि मलेरियाचे ३९ रुग्ण आढळले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने पावसाळ्यात डासांची पैदास होणा-या ठिकाणांचा शोध घेण्यासाठी पथक नेमल्यावर पालिकेतील १० गृहनिर्माण सोसायटी आणि १५ इमारत बांधकामाच्या ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये डेंग्यूच्या अळ्या तयार झाल्याचे दिसले. पालिकेच्या आरोग्य विभागाने डासांच्या अळ्या सापडलेल्या १५ बांधकाम ठिकाणच्या विकासकांना कारणे दाखवा नोटिसा बजावली. तसेच पालिकेने नोटीस बजावल्यानंतर सुद्धा बांधकाम ठिकाणी पुन्हा डासांच्या अळ्या सापडल्यास ही बांधकाम क्षेत्रे बंद करण्यात येईल असा इशारा पनवेल पालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी दिला. विकासकांसोबत १० गृहनिर्माण सोसायट्यांना पालिकेने कारणे दाखवा नोटीसा बजावली आहे. नागरिकांनी गृहनिर्माण सोसायटी, घरांच्या परिसरात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पालिकेने केली आहे.

18:55 (IST) 29 Jul 2024
जीव धोक्यात घालून पर्यटन; लोणावळ्यात २६ पर्यटकांवर गुन्हे; प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई

जीव धोक्यात घालून सहारा पूल परिसरातील धबधब्याच्या परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या २६ पर्यटकांविरुद्ध लोणावळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भुशी धरण परिसरातील धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली.

सविस्तर वाचा…

18:10 (IST) 29 Jul 2024
३३ टक्के आरक्षणासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यां रस्त्यावर

नागपूर : महिलांच्या ३३ टक्के आरक्षणाची अंमलबाजवणी, प्रचंड वाढलेली महागाई व महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. महिलांचे हे तीन ज्वलंत प्रश्न घेऊन शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ॲड. नंदा पराते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी व्हॅरायटी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले. राज्यातील महायुती सरकार व केंद्रातील भाजपा सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाचा सविस्तर...

16:23 (IST) 29 Jul 2024
डोंबिवली : निळजे ते लोढा संकुल दरम्यानच्या बोगद्यातील पाण्याने प्रवासी त्रस्त

डोंबिवली : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील निळजे गाव हद्दीत रेल्वे प्रशासनाने निळजे ते लोढा गृहसंकुल दरम्यान एक बोगदा नागरिकांना येण्या जाण्यासाठी बांधून दिला आहे. या बोगद्यात पाऊस सुरू झाल्यापासून पाणी तुंबत आहे.

सविस्तर वाचा...

15:57 (IST) 29 Jul 2024
आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता: लवकरच प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती, एमएमआरडीएकडून निविदा

मुंबई : ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) आनंद नगर ते साकेत उन्नत रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या  प्रकल्पाच्या बांधकामासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहे.

सविस्तर वाचा

15:56 (IST) 29 Jul 2024
खेड भेलसई येथे दोन लाखांपेक्षा जास्त किंमतीचा गोवा बनावटीचा मद्यसाठा पकडला

पोलिसांनी झायलो कारसह चौघांना घेतले ताब्यात

खेड : तालुक्यातील भेलसई गावाजवळ दोन लाख ऐक्तीस हजार रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यासह दोन लाख पन्नास हजार रुपये किंमतीची झायलो कार असा एकूण चार लाख ऐक्यानशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सोमवारी पहाटे पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सुमित संतोष गोरिवले (२७, रा. भेलसई-गोरिवलेवाडी), राजाराम तानाजी जोईल (५२, रा. खेर्डी-चिपळूण), दिनेश दगडू कदम (४०, रा. वालोपे-बेंडकरवाडी, चिपळूण), सुधाकर कदम (रा. भेलसई- गंगवाडी) या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. झायलो कारमधून (एमएच ०४/इएफ-८९०१) ते गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून चौघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

15:07 (IST) 29 Jul 2024
तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये? सरन्यायाधीशांचा अजित पवारांना सवाल

राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अजित पवार गटाला थेट सवाल केला आहे. सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं? याबाबत ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिली आहे. अजित पवारांना विचारलं आहे की तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये, असा सवाल धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला केला असल्याचं ॲड. सिद्धार्थ शिंदे यांनी ही माहिती दिली.

14:08 (IST) 29 Jul 2024
पक्षांतरे आणि फुटीनंतर मराठवाड्यातील राजकीय चित्र बदलणार, २२ मतदारसंघांमध्ये नवे चेहरे?

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील प्रमुख पक्षांमध्ये झालेल्या फुटींमुळे व पक्षांतरांमुळे मराठवाड्यातील ४६ जांगापैकी जिंकलेल्या २२ जागांवरील उमेदवार प्रमूख पक्षांना बदलावे लागणार आहेत. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटास नऊ जागांवर, शरद पवार यांना सहा ठिकाणी उमेदवार बदलावे लागतील. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे तसेच विधान परिषदेतील फुटीनंतर काँग्रेसला जिंकलेल्या तीन जागांवर उमेदवार बदलावे लागणार आहेत.

वाचा सविस्तर...

13:21 (IST) 29 Jul 2024
“शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा”, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका; म्हणाले…

नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा शरद पवार करीत आहेत. खरे तर महाराष्ट्राचे ते ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे वेगळे-वेगळे आंदोलन निर्माण करून समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना थांबवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. मात्र, त्यांच्याकडून दंगल घडवण्याची भाषा का केली जाते? त्यांच्या मनात काय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

वाचा सविस्तर...

13:15 (IST) 29 Jul 2024
सिडको महागृहनिर्माणातील लाभार्थ्यांना हजारो रुपयांचा मालमत्ता कराचा भुर्दंड

पनवेल : सिडको महामंडळ आणि पनवेल महापालिका यांच्यातील असमन्वयाचा फटका सिडकोने बांधलेल्या महागृहनिर्माण योजनेतील सामान्य लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे. या लाभार्थ्यांना इमारतीच्या भोगवटा प्रमाणपत्र दिल्याच्या तारखेपासून मालमत्ता कर आकारणी पालिकेने केली आहे.

सविस्तर वाचा...

12:48 (IST) 29 Jul 2024
डोंबिवलीत घराच्या छतावर चढलेल्या विद्यार्थ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू

डोंबिवली : मुसळधार पावसामुळे घर गळतेय म्हणून एका महिलेने एका बिगारी कामगाराच्या शाळकरी मुलाला आपल्या घराच्या छतावर गळके छत दुरूस्तीसाठी चढविला. छत दुरुस्तीचे काम करताना विद्यार्थ्याला विजेचा जोरदार धक्का लागून तो जागीच मरण पावला.

सविस्तर वाचा...

12:30 (IST) 29 Jul 2024
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन

मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु स्नेहलता देशमुख यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून त्यांची कारकीर्द चर्चेत राहिली होती. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या, शिक्षण पद्धतीतले नवे बदल स्वीकारणाऱ्या कुलगुरु म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. तसंच त्यांना अनेक मानसन्मानही मिळाले होते. याच स्नेहलता देशमुख यांचं आज सकाळी निधन झालं. कुलगुरु या पदावर असताना अनेक धडाडीचे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेत सक्षम युवा पिढीच्या निर्मितीसाठी त्यांनी पुढाकार घेतला. प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक म्हणून त्यांनी केलेले कार्य आणि ‘दुग्धपेढी’ ही त्यांची संकल्पना वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच स्मरणात राहिल यात शंका नाही.

12:27 (IST) 29 Jul 2024
लोकसभेत यश मिळूनही कोकणात महायुतीत धुसफूस वाढली

अलिबाग : राज्यातील इतर भागांच्या तुलनेत महायुतीला कोकणात चांगेल यश मिळाले. मात्र हे यश मिळूनही लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत धुसफूस वाढल्याचे पहायला मिळत आहेत. घटक पक्षांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा मित्रपक्षांसाठी अडचणीच्या ठरू लागल्या आहेत.

वाचा सविस्तर...

12:26 (IST) 29 Jul 2024
कल्याणमधील बैलबाजारातील कंपनीत तरूणीचा कामगारांकडून विनयभंग

कल्याण : कल्याण पश्चिमेतील बैलबाजार भागातील एका टिश्युपेपर कंपनीत तरूणीचा गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या कंपनीतील मालकासह दोन कामगारांनी विनयभंग केला. या तरूणीला पर्यटनासाठी जाण्याचे आमिष दाखवून तिला उत्तरप्रदेशात नेऊन तिचा तेथेही विनयभंग केल्याची तक्रार या तरूणीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात केली आहे.

सविस्तर वाचा...

12:20 (IST) 29 Jul 2024
मुठा नदीपात्रातला विसर्ग वाढणार

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २२८८० क्युसेक्स विसर्ग वाढवून दुपारी १२ वा. २५०३६ क्यूसेक्स करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. कृपया नोंद घ्यावी अशी माहिती देण्यात आली आहे.

12:11 (IST) 29 Jul 2024
पीएमपी कर्मचाऱ्यांचा संप; प्रवाशांचे हाल

पुणे : पीएमपी कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून संप सुरू केला आहे. या संपाला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. या संपामुळे पीएमपीच्या संचलनातील गाड्या कमी झाल्याने शहरातील हजारो नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले.

सविस्तर वाचा...

12:10 (IST) 29 Jul 2024
वर्धा : मातृत्वाचा सौंदर्यपूर्ण सोहळा! गर्भवती महिलांचा ‘फॅशन शो’मध्ये ‘रॅम्प वॉक’

वर्धा : मातृत्व म्हणजे स्त्री जन्माचे सार्थक, अशी पारंपरिक भावना आजही समाजमान्य आहे. विशेष म्हणजे, विवाहित स्त्री पण यावर अढळ श्रद्धा ठेवत असल्याचे चित्र नवे नाही. मात्र गर्भधारणेच्या आनंदापासून वंचित राहण्याची आपत्ती पण काहींवर ओढवते.

सविस्तर वाचा...

12:04 (IST) 29 Jul 2024
शरद पवारांकडून मराठवाड्यात नव्याने पेरणी

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारनेच सोडवावा असे म्हणत शरद पवार यांनी मराठवाड्यात पुन्हा एकदा समर्थक आणि कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यास सुरुवात केली आहे. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली नाही अशा काही जुन्या कार्यकर्त्यांना परत येण्याची संधी आहे. पण सरसकट प्रवेश दिले जाणार नाहीत, असे सांगायला ते विसरले नाहीत.

वाचा सविस्तर...

12:04 (IST) 29 Jul 2024
नागपुरात घरात पाणी, संतप्त नागरिकांनी रस्ताच तोडला

नागपूर : २० जुलै रोजी नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे दहा हजारांवर घरात पाणी शिरले होते. पावसाच्या या प्रकोपासाठी सिमेंट रस्ते बांधणी कारणीभूत असल्याचा आरोप सार्वत्रिकरित्या केला जात आहे. मानेवाडा-बेसा मार्गावर सिमेट रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे पावसाचे पाणी अडल्याने नागरिकांनी जोड रस्ता तोडून पाण्याला मार्ग मोकळा करून दिला. त्याचा व्हीडीओ आता व्हायरल झाला.

वाचा सविस्तर...

11:50 (IST) 29 Jul 2024
अपघाती मृत्यू झालेल्या महापालिका कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना ‘इतक्या’ लाखांची मिळणार नुकसान भरपाई…

पुणे : दुचाकीस्वार महापालिका कर्मचाऱ्याच्या अपघाती मृत्यूप्रकरणात त्याच्या कुटुंबीयांना ५८ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय लोकअदालतीत घेण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बी. पी. क्षीरसागर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. जी.डोरले आणि ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनेलने तडजोडीत दावा निकाली काढला.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 29 Jul 2024
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वात अमरावतीकर आर्या जाधवची दमदार एन्ट्री

अमरावती : ‘एमटीव्‍ही’ या वाहिनीवरील ‘हॅसल-२’ या कार्यक्रमात रॅप प्रकारातील गायनातून आपली स्‍वतंत्र ओळख निर्माण करणारी अमरावतीकर आर्या जाधव ही आता ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्‍या पर्वातील स्‍पर्धक म्‍हणून समोर आली आहे. तिच्‍या या कामगिरीबद्दल अमरावतीकरांनी आनंद व्‍यक्‍त केला आहे.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 29 Jul 2024
पुणे : भिडे आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली

पुणे : खडकवासला धरण साखळीत संततधार पाऊस सुरू असल्याने रविवारी रात्री मुठा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. धरणातून विसर्ग सुरू झाल्यानंतर सोमवारी सकाळी भिडे पूल आणि शिवणे पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 29 Jul 2024
नवी मुंबई : शहाबाज दुर्घटनाग्रस्त इमारतीचा विकासक व जागा मालक फरार ! एनआरआय पोलिसांचा शोध सुरु

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील बेलापूर विभागात शहाबाज गावात शनिवारी इंदिरा निवास ही बेकायदा अनधिकृत इमारत कोसळून शनिवारी झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा बळी गेला. या इमारतीचा विकासक महेश कुंभार व जागा मालक शरद वाघमारे दोघेही फरार असून एनआरआय पोलीस मागील तीन दिवसापासून त्यांचा शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा...

11:46 (IST) 29 Jul 2024
गंज पेठेतील हाणामारीचे मूळ पनवेलच्या बारमध्ये!

पुणे : महापालिकेच्या ठेक्यावरून झालेल्या वादावादीत परस्परांवर दाखल झालेल्या गुन्हे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. परस्परांत झालेल्या हाणामारीचे मूळ प्रत्यक्षात पनवेलमधील एका बारमध्ये झालेल्या भांडणात असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा...

11:45 (IST) 29 Jul 2024
खारघरमध्ये सराफाच्या दुकानात शिरुन लूट

पनवेल : खारघर वसाहतीमधील सेक्टर ३५ ई मधील बी. एम. ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री १० वाजता तीन चोरांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सोन्याचे चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले. ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

सविस्तर वाचा...

What Sannjay Raut Said?

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर आरोप केले. तसंच या प्रकरणात समित कदम यांचंही नाव घेतलं. ज्यानंतर समित कदम यांनी माध्यमांसमोर येत देवेंद्र फडणवीस यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असं म्हटलं आहे. तर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांचे आरोप योग्य आहेत, मला त्याची खात्री आहे असा दावा केला आहे.