Maharashtra Breaking News, 11 August 2022 : राज्यात सत्तांतरानंतर आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तारही झालाय. मात्र, अद्याप खातेवाटप झालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर शाब्दिक हल्ले होत आहे. दुसरीकडे सरकारकडून लवकरच खातेवाटप होईल आणि माध्यमांचे अंदाज खोटे ठरवणारं खातेवाटप असेल, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. राजकीय घडामोडींशिवाय राज्यात पावसाने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…

Live Updates

Maharashtra Breaking News Today : एकूणच पावसासह राज्यातील इतर सर्व राजकीय घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…

17:54 (IST) 11 Aug 2022
आधार जोडणी झालेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ

राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमध्ये आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांनाच आता शालेय पोषण आहाराचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या डिसेंबरपर्यंत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढून ते शालेय पोषण आहाराशी जोडण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले असून, अद्याप आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याचे काम शिक्षकांना करावे लागत आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:45 (IST) 11 Aug 2022
पुणे : पीक कर्ज मंजुरीसाठी उद्या जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये खास शिबिराचे आयोजन

पीक कर्ज वितरण, प्रधान मंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) आणि कृषी पायाभूत सुविधा निधी (ॲग्री इन्फ्रा फंड-एआयएफ) प्रकल्प प्रस्तावांना गती देण्यासाठी शुक्रवारी (१२ ऑगस्ट) खास शिबिर जिल्ह्यातील सर्व बँकांच्या शाखांमध्ये आयोजित करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत. वाचा सविस्तर बातमी…

17:33 (IST) 11 Aug 2022
नागपूर : ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला १४ आणि १५ ऑगस्टला नागरिकांसाठी खुला

ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला नागरिकांना बघण्यासाठी १४ आणि १५ ऑगस्टला खुला करण्यात येत आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पर्यटकांना किल्ला बघता येणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:28 (IST) 11 Aug 2022
नागपूर : गुंगीचे औषध देऊन रेल्वे प्रवाशांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

प्रवासादरम्यान रेल्वे प्रवाशांना खाद्यपदार्थ, पेयातून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील म्होरक्यांना नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अनुक्रमे बिहार व दिल्ली येथून अटक केली. वाचा सविस्तर बातमी…

17:16 (IST) 11 Aug 2022
मुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारीपद प्रथमच महिलांकडे

नैसर्गिक, मानवनिर्मित आपत्तीकाळात संकटमोचक बनून नागरिकांच्या मदतीला धाऊन जाणाऱ्या मुंबई अग्निशमन दलातील महत्त्वाच्या पदावर महिलांना नियुक्तीचा मान मिळाला आहे. सहाय्यक केंद्र अधिकारी सुनीता खोत आणि एस. व्ही भोर या दोन महिला अधिकाऱ्यांना केंद्र अधिकारी पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. खोत आणि भोर या दोघी अग्निशमन दलातील पहिल्या केंद्र अधिकारी ठरल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

15:10 (IST) 11 Aug 2022
नागपूर : पारडी हत्याकांड प्रकरणी आणखी एका आरोपीला तामिळनाडूतून घेतले ताब्यात

पारडी हत्याकांडात आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला तामिळनाडूतून ताब्यात घेण्यात आले असून गणेशराम राजेश कुर्रे असे आरोपीचे नाव आहे. या हत्याकांडात मायलेकींच्या प्रियकरासह पाच जणांचा समावेश आहे. वाचा सविस्तर बातमी…

14:24 (IST) 11 Aug 2022
असलं काही बोलून पंतप्रधानपदाची पातळी घसरवू नका, राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘काळी जादू’ विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. नरेंद्र मोदींनी अंधश्रद्धेच्या गोष्टींचा उल्लेख करत पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा कमी करु नये अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसने ‘काळी वस्त्रे’ परिधान करून आंदोलन केलं होतं. या आंदोलनाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काळी जादू’ असं केलं आहे. काँग्रेसने कितीही ‘काळी जादू’ करण्याचा प्रयत्न केला तरी जनतेच्या मनात ते विश्वास निर्माण करू शकत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

सविस्तर बातमी

13:25 (IST) 11 Aug 2022
पुण्यात १५० लिटर बनावट भेसळयुक्त तुप जप्त; एका आरोपीला अटक

पुण्यातील कात्रज आंबेगाव परिसरात तब्बल १५० लिटर भेसळयुक्त तुप जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महेंद्रसिंह देवरा या आरोपीस भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. वाचा सविस्तर बातमी…

13:10 (IST) 11 Aug 2022
पुणे : मुख्यमंत्र्यांनी उद्धाटन केलेले ‘एमटीडीसी’चे सिंहगड निवासस्थान एक वर्षानंतरही बंदच

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमटीडीसी) पुणे विभागांतर्गत सिंहगड आणि अक्कलकोट ही दोन निवासस्थाने वर्षभरानंतरही बंदच आहेत. सिंहगड येथील निवासस्थानाचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. एमटीडीसी पुणे विभागाकडून मात्र, पाणी, वीज आणि अपुरे बांधकाम अशा तांत्रिक कारणांमुळे दोन्ही निवासस्थाने अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात येत आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:54 (IST) 11 Aug 2022
मुंबई : विनाहेल्मेट दुचाकीचालकांना लुटणारा तोतया पोलीस अटकेत

पावसाळ्यात पोलिसांसारखा रेनकोट घालून, हातात फायबरची काठी घेऊन विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या एका ३६ वर्षीय तोतया पोलिसाला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:46 (IST) 11 Aug 2022
‘बेस्ट बेकरी’ खटला मुंबईतच चालणार; अन्य न्यायालयात वर्ग करण्याची दोन आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळली

गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या दंगलीत जाळून टाकण्यात आलेल्या बेस्ट बेकरी हत्याकांडाशी संबंधित खटल्यातील दोन आरोपींनी मुंबईतील खटला चालवणाऱ्या न्यायाधीशांवर विश्वास नसल्याचा दावा करून खटला अन्य न्यायालयाकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांच्या मागणीचा अर्ज प्रधान न्यायाधीशांनी फेटाळला. त्यामुळे प्रकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील आरोपींवर मुंबईतच खटला चालणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:34 (IST) 11 Aug 2022
Ganeshotsav : ‘एसटी’च्या आरक्षणासाठी राजकीय पक्षांची धावाधाव; मुंबई महानगरातून ६५० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाने २,५०० गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्याचबरोबर मुंबई महानगर प्रदेशातील राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर एसटीच्या गाड्या आरक्षित केल्या आहेत. विविध राजकीय पक्षांनी मुंबई, ठाण्यातून कोकणात जाण्यासाठी ६५० गाड्यांच्या आरक्षणाची मागणी केली असून त्यापैकी ५०० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. वाचा सविस्तर बातमी…

12:16 (IST) 11 Aug 2022
अंबरनाथ : कानशिलात लगावली म्हणून तरूणाची हत्या; दोघांना अटक

गेल्या आठवड्यात अंबरनाथ पश्चिमेतील जावसई येथील तलावात एका २० वर्षीत तरूणाची हत्या करून मृतदेह बांधून फेकण्यात आला होता. मृताची ओळख पटली असली तरी आरोपींची माहिती नव्हती. अखेर अंबरनाथ पोलिसांनी या हत्येची उकल केली असून कानशिलात लगावत धमकी दिल्याने ही हत्या झाल्याचा खुलासा अंबरनाथ पोलिसांनी केला आहे. प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून यात अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. यात आणखी तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. वाचा सविस्तर बातमी…

12:08 (IST) 11 Aug 2022
ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का! सीबीआयने अनुब्रत मंडल यांना केली अटक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे सहकारी आणि पक्षाचे बिरभूम जिल्ह्याचे अध्यक्ष अनुब्रत मंडल यांना सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. २०२० मधील जनावरांची तस्करी केल्याप्रकरणी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ११ ऑगस्टला बिरभूममधील त्यांच्या घरातून सीबीआयने त्यांना अटक केली.

सविस्तर बातमी

11:54 (IST) 11 Aug 2022
गडचिरोली : पुरामुळे छत्तीसगड-तेलंगणा राज्य महामार्गासह १७ मार्ग बंद

सिरोंचा-हैद्राबाद तथा सिरोंचा-जगदलपूर या तेलंगणा व छत्तीसगड राज्य महामार्गासह १७ मार्ग पुरामुळे बंद आहेत. वैनगंगा, वर्धा, इंद्रावती, पर्लकोटा, गोदावरी या नदीचे पाणी दुथडी भरून वाहत असल्याने नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे १७ मार्ग बंद आहेत. वाचा सविस्तर बातमी…

11:37 (IST) 11 Aug 2022
नागपूर : डोंगरदऱ्यातील आदिवासी विद्यार्थींनींनी अनुभवला मेट्रो सफरची आनंद

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपूर मेट्रो सहलीचाचा आनंद लुटला. ही मुले प्रथमच नागपूरसारख्या महानगरात आली होती. उंच इमारती, डबल डेकर पुल, शहरी धावपळ या सर्व बाबी पाहून अचंबित झाली होती. आदिवासी दिनानिमित्त आदिवासी ग्रामीण भागातील इयत्ता चौथी ते दहावीचे ३५० विद्यार्थी नागपूर दर्शनासाठी चंद्रपूर येथून नागपुरात आले होते. वाचा सविस्तर बातमी…

11:36 (IST) 11 Aug 2022
दोन महिन्यानंतरही हजारो विद्यार्थी गणवेशाविना; पिंपरी पालिकेकडून केवळ साचेबद्ध उत्तरे

पिंपरी पालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना अद्याप शालेय गणवेश मिळालेले नाहीत. शाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होत आला, तरीही विद्यार्थी गणवेशाविना आहेत. याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, अशीच साचेबद्ध उत्तरे महापालिकेकडून दिली जात आहेत. वाचा सविस्तर बातमी…

11:35 (IST) 11 Aug 2022
वर्धा : पूरतडाख्यामुळे शेकडो गावे संकटात; उपमुख्यमंत्री फडणवीस उद्या विशेष पाहणी दौऱ्यावर येणार

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूरस्थिती असून शेकडो गावे संकटाच्या सावटात आहे. १०० टक्के भरलेल्या दहा मोठ्या व मध्यम प्रकल्पाच्या ७५ दारांतून तसेच २० छोट्या प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असून नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. ही भीषण स्थिती लक्षात घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या १२ ऑगस्टला वर्धा तालुक्याच्या विशेष पाहणीसाठी येणार आहेत. वाचा सविस्तर बातमी…

11:35 (IST) 11 Aug 2022
मुंबई : डिसेंबरपर्यंत ५०० वातानुकूलित बस ताफ्यात; मिडी, मिनी ऐवजी १२ मीटर लांबीच्या बस घेण्यावरच भर

येत्या डिसेंबरपर्यंत मुंबईकरांसाठी टप्प्याटप्याने भाडेतत्त्वावरील ५०० हून अधिक वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. मिडी, मिनीऐवजी १२ मीटर लांबीच्या या बसगाड्या असतील. यामध्ये एकमजली बसची संख्या अधिक असेल. तर काही वातानुकूलित दुमजली बसचाही समावेश असेल. त्यामुळे गारेगार प्रवासाबरोबरच प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढणार आहे. वाचा सविस्तर बातमी…

11:34 (IST) 11 Aug 2022
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद डोंबिवलीकडे?; कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागण्याची शक्यता

ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व समसमान पध्दतीने अबाधित ठेवायचे असेल तर आपल्या विश्वासातील अधिकारी व्यक्तिीच ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नेमावा लागेल. हा दूरदृष्टीचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील डोंबिवलीचे आमदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. वाचा सविस्तर बातमी…

11:34 (IST) 11 Aug 2022
“…म्हणून संजय राठोड यांना मंत्रीपद दिले”; दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यावेळी बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांच्यावरील आरोप अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. तसेच संजय राठोड ज्या समाजातून येतात, त्या समाजी मागणी असल्याने त्यांना मंत्रीपद दिले असल्याचेही ते म्हणाले.

सविस्तर बातमी…

11:34 (IST) 11 Aug 2022
शपथविधीनंतर शिंदे गटातील आमदार बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी, पदभार स्वीकारण्यापूर्वी घेतले आशीर्वाद

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील शपथ घेतलेले सर्व मंत्री दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी पोहोचले आहेत. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कामाला सुरुवात करण्यापूर्वी बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण येथे आल्याचं आमदारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तब्बल महिनाभरानंतर मंगळवारी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून, भाजपा आणि शिंदे गटातील प्रत्येत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. दरम्यान आता खातेवाटपावर सर्वांचं लक्ष आहे.

सविस्तर बातमी

11:33 (IST) 11 Aug 2022
मंत्रीपद मिळताच संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आतापर्यंत शांत होतो, पण आता…”

संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांच्या टीकेला संजय राठोड यांनी उत्तर दिलं आहे.

सविस्तर बातमी

11:30 (IST) 11 Aug 2022
देशातील मोजक्या नागरिकांनाच संविधानिक अधिकारांची माहिती असणं दुर्दैवी – सरन्यायाधीश

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मोजक्या नागरिकांनाच आपल्या संविधानिक अधिकाराची माहिती आहे, हे देशाचे दुर्देव असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांनी व्यक्त केले आहे. देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपले संविधानिक अधिकार आणि कर्तव्य माहित असणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. ईस्टर्न बुक कंपनीच्या ‘सुप्रीम कोर्ट केस प्री-१९६९’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान ते बोलत होते.

सविस्तर बातमी…

11:28 (IST) 11 Aug 2022
पुणे : पानशेत धरण १०० टक्के भरले; खडकवासला धरणातून दुपारनंतर विसर्ग

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात सुरू असलेला मुसळधार पाऊस गुरुवारी सकाळपर्यंत कायम होता. त्यामुळे पानशेत धरण १०० टक्के भरले असून या धरणातून खडकवासला धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. परिणामी खडकवासला धरणातून दुपारी बारा वाजल्यानंतर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

सविस्तर बातमी…