मुंबई : राज्यात रब्बी हंगामात कांद्याचे सरासरी क्षेत्र ५.५ लाख हेक्टर आहे. तर यंदाच्या हंगामात ६ लाख ५९ हजार ९४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. सरासरीच्या तुलनेत एक लाख हेक्टरने तर गतवर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने लागवड वाढली आहे. दरात मोठी पडझड होऊनही लागवड वाढल्याचे दिसून आले आहे.

राज्यात खरीप, उशिराचा खरीप आणि रब्बी, अशा तीन हंगामात लागवड होते. रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र ५.५ लाख हेक्टर आहे. २०२४-२५ पासून सरासरीपेक्षा जास्त लागवडीचा कल कायम आहे. २०२४-२५ मध्ये ६.५२ लाख हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा लागवड क्षेत्र ६.५९ लाख हेक्टरवर गेली आहे. रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत एक लाख हेक्टरने लागवड वाढली आहे. तर गतवर्षाच्या तुलनेत ७० हजार हेक्टरने क्षेत्र वाढ झाली आहे.

नाशिक विभागात २.५९ लाख हेक्टर, पुणे विभागात २.६९ लाख हेक्टर, कोल्हापूर विभागात ११,१५१ हेक्टर, छत्रपती संभाजीनगर विभागात ८३,५७७ हेक्टर, लातूर विभागात १०,२४५ हेक्टर, अमरावती विभागात २,४३७ हेक्टर, नागपूर विभागात ६९८ आणि कोकण विभागात ५३४ हेक्टरवर कांदा लागवड झाली आहे. यंदा नाशिकपेक्षा पुणे विभागात लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध असल्यामुळे वर्षभर दर दबावाखाली राहिले. कांदा सरासरी १५ ते २१ रुपये किलो दराने विकला गेला. सध्या कांद्याचे दर १० ते १५ रुपये प्रति किलो आहेत. त्यामुळे दरात पडझड होऊनही कांदा लागवड का वाढली, असा प्रश्न जाणकारांना पडला आहे.

गत काही वर्षांतील लागवड क्षेत्र (लाख हेक्टर)

वर्ष (हंगाम)लागवड क्षेत्र (लाख हेक्टरमध्ये)
२०२५-२६६.५९
२०२४-२५६.५२
२०२३-२४४.६५
२०२२-२३५.५३
२०२१-२२४.०७

सरकारने आपले काम करावे

कांदा बऱ्याच शेतकऱ्यांचे पारंपरिक पीक आहे. त्या शेतकऱ्यांना पर्याय नाही. चांगल्या पावसाळ्यामुळए दुष्काळी भागातही पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे लागवड वाढली आहे. अन्य वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या तुलनेत कमी खर्च आणि कांद्याकडे नगदी पीक म्हणून पाहिले जात असल्यामुळे लागवड वाढली आहे. शेतकऱ्याने शेतकऱ्यांचे काम केले आहे. आता सरकारने आपले काम करावे. बफर स्टॉक करावा, निर्यातीला प्रोत्साहन द्यावे. जेणेकरून दर चांगले राहतील,अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.